esakal | ऑनलाईन नको, शाळाच पाहिजे! विद्यार्थ्यांवर होतोय परिणाम

बोलून बातमी शोधा

Students Want go school no online education}

सुरुवातीला ऑनलाइन वर्गात विद्यार्थ्यांची हजेरी वाखाणण्याजोगी होती; परंतु त्यानंतर प्रत्यक्ष वर्ग सुरू झाले आणि विद्यार्थ्यांचा ओढा शाळेकडे वळू लागला. मात्र आता पुन्हा शाळा बंद कराव्या लागल्याने विद्यार्थ्यांची निराशा झाली आहे. आता ऑनलाइन शिक्षण सुरू असले, तरीही विद्यार्थ्यांची हजेरी लक्षणीयरित्या कमी आहे, असे निरीक्षण शिक्षक व पालक नोंदवीत आहेत.

ऑनलाईन नको, शाळाच पाहिजे! विद्यार्थ्यांवर होतोय परिणाम
sakal_logo
By
मीनाक्षी गुरव

पुणे : ‘‘दररोज नियमितपणे शाळेत शिकविलेल्या अभ्यासाची उजळणी, गृहपाठ करणाऱ्या संकेतला आता ‘अरे अभ्यास कर’ असे सांगावे लागतेय. ऑनलाइन शिक्षणाबाबत त्याला सुरुवातीला प्रचंड आकर्षण वाटत होते; परंतु आता याच शिक्षणाचा त्याला कंटाळा येतोय; पण मोबाईल अधिकाधिक वेळ हाताळण्याची सवय लागली आहे. घरातील एखादे काम सांगितले, की यापूर्वी तो आवडीने करायचा. आता काम सांगितले, की तो चिडचिड करतो.’’हा अनुभव सांगत होते पालक संजय हुंबे.

शिक्षक असलेल्या हुंबे यांचा मुलगा संकेत नववीत शिकतो. त्यांनी संकेत याच्याबरोबरच अन्य विद्यार्थ्यांमध्ये जाणवणारे बदल अधोरेखित केले आहेत. कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने गेल्या वर्षी मार्चमध्ये शाळा बंद करण्यात आल्या. त्यानंतर शाळांनी ऑनलाइन शिक्षण सुरू केले. सुरुवातीला या शिक्षणाबाबात विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांच्यामध्ये प्रचंड उत्सुकता होती. सुरुवातीला ऑनलाइन वर्गात विद्यार्थ्यांची हजेरी वाखाणण्याजोगी होती; परंतु त्यानंतर प्रत्यक्ष वर्ग सुरू झाले आणि विद्यार्थ्यांचा ओढा शाळेकडे वळू लागला. मात्र आता पुन्हा शाळा बंद कराव्या लागल्याने विद्यार्थ्यांची निराशा झाली आहे. आता ऑनलाइन शिक्षण सुरू असले, तरीही विद्यार्थ्यांची हजेरी लक्षणीयरित्या कमी आहे, असे निरीक्षण शिक्षक व पालक नोंदवीत आहेत.

सोनं खरेदी करण्याचा गोल्डन चान्स ते आमच्या पुण्यात सगळंच भारी; वाचा एका क्लिकवर​

''विद्यार्थ्यांच्या नियमित शिक्षणास खीळ बसली. सध्या तरी ऑनलाइन शिक्षणात मुलांमध्ये निरुत्साह आणि आळस दिसून येतो. प्रत्यक्ष वर्गात आणि ऑनलाइन उपस्थितीत तफावत दिसते. सकाळी वेळेवर उठणे, कवायत करणे, शिकणे, वेळेत गृहपाठ करणे अशा मुलांच्या दैनंदिन सवयींमध्ये बराच फरक पडला आहे. दिव्यांग आणि विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.''
- संजय सोमवंशी, मुख्याध्यापक, सुंदरबाई मराठे विद्यालय

''ऑनलाइन तासाला विद्यार्थ्यांची उपस्थितीत अत्यंत कमी झाली आहे. ‘शाळा कधी सुरू होणार’ हे विद्यार्थी फोन करू विचारू लागले आहेत. शाळेत येऊन शिकण्याचा आनंद हा ऑनलाइन शिक्षणात येत नाही, असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. तसेच शाळेची परीक्षा कधी होणार, याबाबत विचारणा सुरू आहे.''
- तेजस्विनी राजपूत, मुख्याध्यापिका, गोपाळ हायस्कूल

''नऊ महिन्यानंतर आता कुठे ऑफलाइन वर्ग सुरू झाले होते; परंतु आता पुन्हा हे वर्ग बंद होऊन ऑनलाइन शिक्षण सुरू झाल्याने विद्यार्थ्यांचा हिरमोड झाला आहे. प्रत्यक्ष वर्गात विद्यार्थी मोठ्या उत्साहाने येत होते, तसेच कमीत कमी वेळेत सुद्धा चांगला अभ्यास करत होते; पण त्यांच्या आनंदावर आता विरजण पडले आहे; परंतु शिक्षण फक्त परीक्षेपुरते मर्यादित नाही, कौशल्यही महत्त्वाचे आहे, हे या काळात पालकांना कळू लागले आहे.''
-रूपाली अभंग, मुख्याध्यापिका, विश्वकर्मा साई व्हॅली इंग्लिश स्कूल, यवत

मोठी बातमी : गजा मारणे आणि साथीदारांचा अटकपूर्व जामीन कोर्टाने फेटाळला​


विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार...

हे झाले कमी
- आत्मविश्वास
- एकाग्रता
- समाधान

हे वाढले
- चंचलता
- चिडचिडेपणा
- एकलकोंडेपणा

मुलांमध्ये जाणवत असलेले बदल

- आळशीपणात वाढ : १७.६ टक्के
- दैनंदिन सवयींच्या वेळा बदलल्या : २५.९ टक्के
- कानाच्या तक्रारींत वाढ : १०.१ टक्के
- डोके दुखीची समस्या जाणवते : २०.२ टक्के
- पाठदुखीच्या त्रासाने हैराण : २०.२ टक्के
- वजनात वाढ : ५.९ टक्के

(स्रोत : भारतीय शिक्षण मंडळ या स्वयंसेवी संस्थेने राज्यातील विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन शिक्षणाबाबत केलेले सर्वेक्षण)