गृहलक्ष्मीचा राग अन्‌ अनुराग!

सु. ल. खुटवड 
Sunday, 15 November 2020

बायकोने सांगितलेली कामे आटोपून, आम्ही सोफ्यावर येऊन बसलो. "किती गुणाचा आणि कष्टाचा गं माझा नवरा', असं कौतुक बायको आता कधी करील, म्हणून आम्ही आता कान टवकारून बसलोय. 

""बाकीच्यांचे नवरे बघा, साफसफाईसाठी किती मदत करतात? नाहीतर तुम्ही? इकडची काडी तिकडे करत नाही. मी म्हणून टिकले. नाहीतर दुसरी असती तर कधीच पळून गेली असती.'' 

आज सकाळी बायकोनं फॅन पुसायला सांगितल्यानंतर "आमचं डोकं दुखतंय' असं आम्ही म्हटल्यानंतर तिने ठेवणीतील "अस्त्र' बाहेर काढले. दर दोन दिवसांनी "मी म्हणून टिकले' हे वाक्‍य एखादीने म्हटलं नाहीतर महिला मंडळाच्या बैठकीत मोठा दंड ठोठावत असतील काय, अशी शंका आम्हाला आहे. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

""अगं खरंच! डोकं दुखतंय. गेल्या दिवाळीला आख्खा हॉल साफ केला होता. विसरलीस काय?'' आम्ही म्हटले. 

""हॉल मी साफ करीत होते. तुम्ही फक्त स्टूल धरून उभे होतात.'' 

""मग ती तर केवढी मोठी जबाबदारी. आम्ही स्टूल नीट धरले नसते म्हणजे पडली असतीस ना! शिवाय तू केलेल्या फराळाला अजिबात नावे न ठेवता, तोंड न वेंगाडता पंधरा दिवस खात होतो, हे विसरलीस वाटतं. ही काय कमी कामे आहेत का?'' आम्ही खिंड जोरदार लढवली. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

"दिवाळी हा सण दोघांचा, मग साफसफाईचे काम फक्त बायकोचेच का,' फेसबुकवर अशी पाटी घेऊन उभी राहिलेली महिला पाहून आमच्या पोटात यंदा गोळाच आला. नवरा-बायकोमध्ये भांडण लावायचं काम या अशा पाट्या करतात. उरलेली कसर आमचे काही मित्र घरकामात केलेल्या मदतीचे फोटो फेसबुकवर टाकून भरून काढतात. त्यातीलच एक मित्र म्हणजे परेश. त्याचे नवीनच लग्न झाल्याने बायकोला प्रत्येक कामात तो मदत करतो. याला आमची काही हरकत नाही. मात्र, आपण काय काय मदत केली, हे आमच्या घरी येऊन ऐकवतो. 

""वहिनी, आज सगळा माळा झाडून घेतला. किचनमधील सगळी भांडी घासून-पुसून लख्ख केली. शिवाय हॉल, बेडरूम, सगळे पंखे एकदम चकाचक केले. बायको वर्षभर राबराब राबत असते. दिवाळीत तरी तिला सुटी नको का? अशी माझी भूमिका आहे. आजपासून फराळ करायला सुरुवात करतोय.'' परेशने आज सकाळी घरी येऊन फटाक्‍याच्या वातीला काडी लावली आणि नाश्‍ता आणि चहा पदरात पाडून घेतला. 

आमची "ही' देखील "काय सांगता भावजी', "व्वा ! छान भावजी' असे म्हणत परेशला दाद देत आमच्याकडे रागाने पाहत होती. आम्ही मात्र परेशवर मनातल्या मनात चरफडत होतो. पंधरा-वीस मिनिटांनंतर परेश आगीत तेल ओतून गेला आणि बायकोने पंखे पुसून द्यायची लगेच ऑर्डर काढली. 

मग आम्ही डोकेदुखीचे नाटक काढले; पण बायको काही बधेना. मग बळेबळेच स्टुलावर उभे राहून पंखा पुसू लागलो. 

""बाम आणि डोकेदुखीची गोळी आहे का गं घरात.?'' कपाळावर हात ठेवत आम्ही खालच्या आवाजात म्हणालो. त्यावर बायकोने चांगलेच नाक मुरडले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

""हे काम जमत नसेल तर तेवढे लाडू बांधा आणि कुकरला वरण-भात तरी लावा.'' बायकोने ही आज्ञा दिल्यानंतर आम्हाला हायसे वाटले. गोळी न घेताच आमची डोकेदुखीही पळाली. 

बायकोचा हुकूम पाळण्यासाठी आम्ही लगेचच किचनमध्ये गेलो. तिने सांगितल्याप्रमाणे ओट्यावर परातीत ठेवलेले लाडू आम्ही आज्ञेनुसार शब्दशः सुतळीने व्यवस्थित बांधले. त्यानंतर फ्रीजमधून काल रात्रीचे वरण आणि भात काढून कुकरला आतूनबाहेरुन खसाखसा घासला. अंगाला साबण लावावा, तसा. लाडू बांधणे आणि कुकरला वरण-भात लावणे, हे काम आम्हाला साफसफाईपेक्षा खरेच खूप सोपे वाटले. 

बायकोने सांगितलेली कामे आटोपून, आम्ही सोफ्यावर येऊन बसलो. "किती गुणाचा आणि कष्टाचा गं माझा नवरा', असं कौतुक बायको आता कधी करील, म्हणून आम्ही आता कान टवकारून बसलोय. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: SU L khutwad write article about GrahaLaxmi

Tags
टॉपिकस
Topic Tags: