
Video:नरवीर तानाजी मालुसरे यांचे वंशज सध्या कोठे आहेत?
खडकवासला (पुणे) : नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या जीवनावरील आधारित तान्हाजी चित्रपट रिलीज झालाय. सिनेमा सगळीकडेच गर्दी खेचतोय. या निमित्ताने नरवीर तानाजी मालुसरे आणि त्यांच्या वंशजांविषयी कुतूहल आहे. त्यांचे वंशज कोण आहेत? ते काय करतात? त्यांचे वास्तव्य कोठे आहे? याबाबत माहिती मिळवण्यासाठी अनेकजण प्रयत्न करीत आहे.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
नरवीर तानाजी मालुसरे यांचे थेट बारावे वंशज कै. शिवराज बाळकृष्ण मालुसरे यांच्या पत्नी डॉ. शीतल मालुसरे व त्यांचे पुत्र रायबा हे सध्या रायगड जिल्ह्यातील महाड येथे वास्तव्याला आहेत. डॉ. शीतल मालुसरे महाड येथे शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. तर, मुलगा पुण्यात शिक्षण घेत आहे. डॉ. शीतल यांनी नरवीर तानाजी मालुसरे यांच्या इतिहासावर पीएचडी पूर्ण केली आहे. तसेच त्या राज्यात आणि राज्याबाहेर छत्रपती शिवाजी महाराज, नरवीर तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर व्याख्याने देतात. तसेच कवियत्री म्हणून त्यांनी साहित्य क्षेत्रात स्वतःचा असा ठसा उमटवला आहे.
आणखी वाचा : या ठिकाणी अजूनही आहे तानाजीची तलवार आणि माळ
तानाजींचे मूळ गाव कोणते?
मालुसरे परिवार मुळचा कुठला? त्यांची पार्श्वभूमी काय? तानाजी मालुसरे यांच्या परिवाराचे पुढे काय झाले? याबद्दल जाणून घेण्याची अनेकांमध्ये उत्सुकता आहे. मालुसरे परिवार हा मूळचा पाचगणी जवळील गोडोली गावचा. तानाजी मालुसरे यांचे वडील काळोजीराव यांचे तेथे वास्तव्य होते. तानाजी मालुसरे यांचे बालपण गोडोली येथे गेले. शिवरायांनी बालपणातच स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली तेव्हापासूनच तानाजी मालुसरे शिवरायांच्या सोबतच होते. तेथून पुढे शिवरायांच्या अनेक मोहिमा, लढायांमध्ये विश्वासू सहकारी म्हणून तानाजी सहभागी असत. त्यांच्यातील स्वराज्यनिष्ठा व लढवय्येपणा हेरून शिवरायांनी त्यांना महाबळेश्वर-पोलादपूर परिसरातील बंदोबस्ताची जबाबदारी सोपवली होती. त्यावेळी, या भागात दरोडेखोरांचा मोठा उपद्रव वाढला होता. त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी उमरठ या गावी ते आपल्या परिवारासह स्थायिक झाले. नंतर 1659 मध्ये प्रतापगडावर शिवराय व अफजलखान यांच्याबरोबर झालेल्या युद्धात त्यांनी अफजल खानाच्या सैन्याचा समाचार घेतला होता. नरवीर तानाजी अजरामर झाले ते सिंहगडाच्या लढाईत. 1665 मध्ये झालेल्या पुरंदराच्या मिर्झाराजे जयसिंगाबरोबर झालेल्या तहानुसार स्वराज्यातील 23 गड-किल्ले औरंगजेबाला द्यावे लागले होते. त्यात सिंहगडाचा देखील समावेश होता. परंतु, पुढे महाराज मोठ्या शिताफतीने आग्र्याच्या कैदेतून सुटून आले. तहात दिलेले सर्व गड-किल्ले परत स्वराज्यात सामील करण्याचा सपाटा त्यांनी लावला.
राजगड मुक्कामी असताना राजमाता जिजाऊ व शिवरायांना समोरील सिंहगड पारतंत्र्यात असल्याची खंत होती. त्यावेळी गडाचे नाव कोंढाणा होते. महाराजांचा मनसुबा ऐकून लढवय्या तानाजी मालुसरे यांचा मराठी बाणा जागृत झाला. 'आधी लगीन कोंढाण्याचे मग माझ्या रायबाचे' असे म्हणत सिंहगड स्वराज्यात आणण्याचा विडा त्यांनी उचलला. अष्टमीच्या काळोखात तानाजी मोजक्या मावळ्यांसह गड घेण्यासाठी डोणागिरिच्या कड्याला बिलगले. युद्धात तानाजी व उदयभान हे दोन वीर समोरासमोर आले. या दोन लढावया योद्धामध्ये घनघोर युद्ध झाले. उदयभानूच्या एका वाराने तानाजी धारातीर्थी पडले. भाऊ सूर्याजी व शेलार मामा यांनी चवताळून उदयभानाच्या फौजेचा धुव्वा उडवला. उदयभानाचा खात्मा करून गडावर भगवा निशाण चढवून गड स्वराज्यात दाखल केला.
आणखी वाचा - अकोल्याच्या मुलीची तानाजी सिनेमात महत्त्वाची भूमिका
रायबाला मिळाली किल्लेदारी
स्वराज्यासाठी तळ हातावर शीर घेऊन लढणाऱ्या मावळ्यांना युद्धात वीर मरण आले, तर त्यांच्या पश्चात त्याच्या कुटुंबाची सर्व जबाबदारी महाराजंकडून नेहमीच घेतली जात असे. त्यानुसार, पुढील काही महिन्यातच तानाजी मालुसरे यांच्या मुलाचे रायबाचे लग्न यथोचित पार पाडले. त्यास बेळगाव जवळील पारगडची किल्लेदारी दिली. मालुसरे घराण्याचे व स्वराज्याचे नाते अधिक घट्ट केले. त्यावेळी उमरठचे मालुसरे कुटुंबीय व काही लोक पारगड येथे स्थलांतरित झाले. अलीकडच्या काळात पारगडचे मालुसरे कुटुंब शिक्षणासाठी व उदरनिर्वाहासाठी बेळगाव, महाडला स्थायिक झाले आहेत.
मालुसरे परिवाराकडे शिवरायांनी पारगडच्या किल्लेदारीची दिलेली जबाबदारी पुढे पेशवे व ब्रिटिश काळात या परिवाराकडे कायम राहिली. सध्या आमच्याकडे मालुसरे कुटुंबीयांना ब्रिटिशांनी गडाची किल्लेदारी पुढे चालू ठेवल्याची 15 मार्च 1864 ची सनद उपलब्ध आहे. आम्ही तानाजी मालुसरेंचे वंशज आहे. सनदेचे आम्ही जीवापाड जतन करीत आहेत. स्वराज्यासाठी शिवरायांनी दिलेली जबाबदारी नरवीर तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाचा 'तमाम मालुसरे घराण्यांना याचा अभिमान आहे.
- डॉ. शीतल मालुसरे, नरवीर मालुसरे घराण्यातील वंशज
शिवकाळात गावचा पाटील, कुलकर्णी बलुतेदार यांना दिलेले हक्क, सनदा पुढील काळात पेशव्यांनी, ब्रिटिशांनी कायम ठेवल्या होत्या. ते जुन्या मोडी कागद पत्रातून दिसून येते. पूर्वजांना मिळालेले हक्क सनदा चालू राहण्यासाठी तत्कालीन राज्यकर्त्यांकडे पुरावे सादर करावे लागत असे. जुने कागद गहाळ झाले किंवा घरे जळाल्यामुळे असे पुरावे नष्ट होत. त्यामुळे काही जणांना असे पुरावे देता येत नसत. अशा वेळी तत्कालीन राज्यकर्ते मागणीकर्त्याच्या विधानाची खात्री पटवून साक्ष घेऊन ते हक्क, सनदा नूतनीकरण करून देत असत. पारगडाच्या किल्लेदारी संदर्भात पेशवेकालीन सनद डॉ.शीतल मालुसरे यांच्याकडे उपलब्ध आहे.
- नंदकिशोर मते, पुरातत्व व सिंहगडचे अभ्यासक