esakal | ‘पंच’नामा : बायकोची धमाल, नवऱ्याची कमाल
sakal

बोलून बातमी शोधा

Panchnama

पहिलाच महिना होता, त्यामुळे खाडे कापले नाहीत. पुढच्या महिन्यापासून कामात टंगळमंगळ केली किंवा खाडे केले तर पगार कापला जाईल.

‘पंच’नामा : बायकोची धमाल, नवऱ्याची कमाल

sakal_logo
By
सु, ल. खुटवड

पुणे : कडक निर्बंध लागू झाल्यामुळे गेल्या महिनाभरापासून पंकज बनियन आणि बर्मुडा या ‘राष्ट्रीय पोशाखात’ घरीच आहे. स्वाती सांगेल ती कामे निमूटपणे करणे आणि तिच्या धाकात राहणे यामुळे तो वैतागून गेला आहे. त्यातच काही दिवसांपासून स्वाती त्याला ‘दादा’ म्हणून हाक मारू लागल्याने, त्याचे उरलेसुरले अवसानही गळाले. ‘‘अगं, मी तुझा नवरा आहे. मला दादा काय म्हणतेस’’? अशी तक्रार त्याने केली. ‘‘तुमच्या या पोशाखामुळे मला दादा कोंडके यांची आठवण येते. त्यामुळे तुम्हाला मी ‘दादा’ म्हणून हाक मारते,’’ असा खुलासा तिने केला.

एकदा सकाळीच पंकज बनियन आणि बर्मुडा घालून लादी पुसण्यात मग्न होता. त्यात दोन-तीन वेळा बेल वाजल्याचे त्याच्या लक्षातही आले नाही. ‘‘अहो, बहिरे-बिहिरे झालात काय? मघापासून बेल वाजतेय. लक्ष कुठंय तुमचं’’? असं म्हणत स्वातीने दरवाजा उघडला. नेमक्या शेजारच्या सुमनवहिनी आल्या होत्या. त्यांनी आपल्याला या अवतारात पाहिल्याचे लक्षात आल्यानंतर पंकज अवघडून गेला. त्याने लगेचच समोरची चटई अंगावर ओढून घेतली. मात्र, तोपर्यंत फार उशीर झाला होता. स्वातीशी काहीतरी खुसपूस करून, त्या जायला निघाल्या.

हेही वाचा: "कोरोनापासून वाचण्यासाठी फक्त लसीकरण हाच उपाय"

‘‘दादा, तेवढा दरवाजा बंद करा,’’ स्वातीने असं म्हटल्यावर सुमनताई चमकून गेल्या. थोड्या वेळाने पंकजच्या मोबाईलवर दीड हजार जमा झाल्याचा ‘एसएमएस’ आला. ते पैसे पाहून त्याला आनंद झाला. अखेर मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्‍वासनानुसार दीड हजार रुपये अनुदान जमा केल्याचे पाहून त्याने त्यांचे फेसबुकवर आभारही मानले. ‘‘मी सध्या काही कमवत नाही म्हणून मला काहीबाही कामे सांगतेस ना? मुख्यमंत्र्यांना आमची काळजी आहे, त्यांनी खर्चासाठी दीड हजार रुपये जमा केलेत.’’ असे म्हणून त्याने मेसेज दाखवला.

‘‘एवढे हुरळून जाऊ नका. हे पैसे मी जमा केले आहेत. तो तुमच्या एप्रिलच्या घरकामाचा पगार आहे. पहिलाच महिना होता, त्यामुळे खाडे कापले नाहीत. पुढच्या महिन्यापासून कामात टंगळमंगळ केली किंवा खाडे केले तर पगार कापला जाईल.’’ हे ऐकून पंकजचा चेहरा पडला. दिवसभर घरकाम करूनही फक्त दीड हजारच मिळाल्याने त्याने नाराजी व्यक्त केली.

हेही वाचा: मोठी बातमी : राज्यातील दीड लाख बालकांना कोरोना

‘‘अहो खाऊन-पिऊन तुम्हाला घरकामाचा दीड हजार पगार खूप झाला,’’ असे स्वातीने म्हटल्यावर त्याला राग आला.

‘मुख्यमंत्रीसाहेब, आम्हाला अनुदान नाही दिलं तरी चालेल; पण हे कडक निर्बंध लवकर उठवा. नाहीतर घरकामाने आणि बायकोचे टोमणे खाऊन आमचा जीव जायचा,’’ असे तो पुटपुटला. तेवढ्यात शेजारच्या सुमनवहिनी परत आल्या आणि त्यांच्या कामवालीबाईविषयी तक्रार करू लागल्या.

‘‘वहिनी, तुमची कामवाली बाई खूप खाडे करते ना? आणि व्यवस्थित कामही करत नाही ना? माझ्याकडे एक चांगला पर्याय आहे,’’ असे म्हणत पंकज थांबला.

‘‘सांगा ना भावोजी. मी तीन हजार रूपये पगार द्यायला तयार आहे.’’ सुमनवहिनींनी असं म्हटल्यावर पंकजचा चेहरा उजळला.

‘‘वहिनी, मी तुमच्या घरची धुणी-भांडी करू का? मला आमच्या घरचा महिनाभराचा अनुभव आहे. शिवाय काम करताना टोमणे ऐकायचीही सवय आहे,’’ पंकजने असे म्हटल्यावर वहिनी हसत-हसत निघून गेल्या. त्यानंतर स्वातीने घर डोक्यावर घेतलं.

‘‘घालवली ना माझी इज्जत ! आता ती बाई ही गोष्ट सगळ्या सोसायटीत करील. मला कोठे तोंड दाखवायला जागा ठेवली नाही. उद्यापासून तुम्ही साधी कपबशीही विसळायची नाही. फक्त खायचं-प्यायचं आणि लोळायचं.’’ स्वातीच्या या वाक्यावर पंकजने खुशीतच शीळ घातली.

पुणे शहर आणि जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.