गवती चहाचा ‘सुगंध’ - सुधीर जोगळेकर

गवती चहाचा ‘सुगंध’   - सुधीर जोगळेकर
Published on

(टीप- सकाळ मनी जुलै २६)
----
(हा लेख २ पानांत बसवावा.)
-----------------------
सेक्शन
सक्सेस स्टोरी
-----------
गवती चहाचा ‘सुगंध’
------------------
सुधीर जोगळेकर
sumajo५१@gmail.com
----------------------------
लीड
----
‘‘रंगरंगुल्या, सानसानुल्या, गवतफुला रे गवतफुला;
असा कसा रे मला लागला, सांग तुझा रे तुझा लळा.’’
इंदिरा संत यांची गवताविषयीची ही कविता शालेय वयात बहुधा अनेकांनी पाठ्यपुस्तकात वाचली असेल. मात्र, त्या गवतफुलाशी आयुष्याचं नातं जोडण्याचा आणि संगणकशास्त्रातलं सारं ज्ञान व अभ्यास बाजूला ठेवून गवत हेच चरितार्थाचं माध्यम बनवण्याचा ध्यास ज्यांनी घेतला, ते गवतवेडं जोडपं म्हणजे दिलीप आणि गौरी परब. त्यांच्या ‘सुगंध’वेडाची ही यशकथा...
---------------------------------------------------------------------
चांगली नोकरी, भरभक्कम पगार आणि आरामदायी जीवनशैली असूनही अस्वस्थ मनांना शांत झोप लागत नाही, हेच खरं. दिलीप परब आणि गौरी परब हे असंच एक अस्वस्थ दाम्पत्य. दिलीप मूळचा देवगडचा, तर गौरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातल्या तिठवली गावची. दोघांचंही शिक्षण मुंबईत झालं. अभियांत्रिकी शिक्षण घेत असताना त्यांची ओळख झाली, मैत्री वाढली आणि स्वप्नं रंगू लागली. दोघांनीही २००८ मध्ये संगणक विज्ञानाचा अभ्यासक्रम पूर्ण केला आणि लार्सन अँड टुब्रोमध्ये नोकरीला लागले. काही वर्षे एकत्र काम केलं, लग्नही झालं. सर्व काही सुरळीत सुरू होतं; पण समाधान मिळत नव्हतं. गावाची ओढ सतावत होती.

मातीच्या ओढीने गावाकडे...
--------------------
नुसते पैसे कमावत राहायचं किती दिवस? गावी जाऊन आपल्याला जे शिकायला मिळालं ते इतर मुलांनाही द्यायला हवं, हा विचार त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. दोघांच्याही घरची शेती होती. त्या शेतीशी संबंधित काही करता येईल का, हा विचारही सतत डोक्यात होता. अखेर २००८ मध्ये त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला. दिलीपच्या देवगडमधील वडिलोपार्जित आंब्याच्या बागेकडे लक्ष द्यायचं आणि त्याचबरोबर गावातील मुलांना संगणक शिक्षण द्यायचं, असा निर्धार त्यांनी केला. त्यासाठी ‘युवालक्ष्य’ नावाची संस्थाही स्थापन केली. मात्र, तो काळ अखंडित इंटरनेट सेवेचा नव्हता. त्यामुळे अनेक अडचणी निर्माण झाल्या आणि अखेर ‘युवालक्ष्य’ला टाळं ठोकावं लागलं. पुढे काय, हा प्रश्न उभाच होता. केवळ आंब्याच्या बागेवर समाधान मानण्यात अर्थ नव्हता. तेवढ्यासाठी त्यांनी लार्सन अँड टुब्रोची नोकरी सोडली नव्हती. त्यांनी २०१५-१६ च्या सुमारास गारमेंट व्यवसायात उतरण्याचा विचार केला. केळ्याच्या बुंध्यातून तलम धागा काढून त्यापासून पैठणी तयार करण्याची कल्पना होती. त्यासाठी जागा, कच्चा माल आणि इतर तयारी सुरू असतानाच गवतापासून तयार होणाऱ्या ‘इसेन्शियल ऑइल’ला जगभर मोठी मागणी असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यानंतर सुरू झाला योग्य जमीन आणि उत्पन्नक्षम गवताच्या जातींचा अभ्यास. आयुर्वेदातील ग्रंथ वाचताना त्यांना लक्षात आलं, की कोकणची जमीन औषधी वनस्पतींसाठी अत्यंत उपयुक्त आहे. अनेक प्रकारच्या औषधी वनस्पती येथे नैसर्गिकरीत्या उगवतात. साऱ्या जगाची औषधी वनस्पतीची मागणी पुरी करता येईल इतक्या प्रकारच्या वनस्पती इथे निसर्गतःच पिकतात; पण आंबा-काजू या नगदी उत्पन्न देणाऱ्या पिकांच्या हव्यासात औषधी वनस्पती बेहिशेबी तोडल्या गेल्या. आंबा आणि काजूसारख्या नगदी पिकांच्या वाढत्या लागवडीमुळे या वनस्पती दुर्लक्षित झाल्या.

औषधी वनस्पतींचीच साद
----------------------
वेगळ्या व्यवसायासाठी अभ्यास करताना, दिलीप आणि गौरी यांना मात्र औषधी वनस्पतींचीच साद ऐकू येत होती. देवगडमधील दिलीपची जमीन जांभा दगडाची असल्याने तेथे गवत लागवड शक्य नव्हती. मात्र, गौरीच्या तिठवली गावातील जमिनीत हे पीक घेता येणार होतं. गवती चहा ही गवताच्या कुळातील बहुवार्षिक सुगंधी वनस्पती आहे. त्याच्या दोन प्रमुख जाती आढळतात. एक प्रकार खाद्य उपयोगासाठी, तर दुसरा सुगंधी तेलासाठी वापरला जातो. सर्दी-पडशासारख्या विकारांवर गवती चहा गुणकारी मानला जातो. त्यात ‘सिट्रल’ हे महत्त्वाचं घटकद्रव्य असतं. याच सुगंधी तेलासाठी उपयुक्त असलेल्या गवती चहाची लागवड करून त्यापासून ‘इसेन्शियल ऑइल’ तयार करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. उपलब्ध भांडवलातून एक एकर जमीन विकत घेतली. पुढे ती सहा एकरांपर्यंत वाढवली आणि आणखी दोन एकर जमीन भाड्याने घेऊन एकूण आठ एकरांवर ‘कृष्णा’ जातीच्या गवती चहाची लागवड केली.

संघर्षमय वाटचाल
----------------
या दोघांचा २०२१ मध्ये सुरू झालेला हा प्रवास सोपा नव्हता. गवती चहा हे असं पीक आहे, की ज्याची मुळासकट उपटणी करावी लागत नाही. जमिनीपासून चार-पाच इंच उंचीवर कापणी केली की ते पुन्हा जोमाने वाढते. उष्ण व दमट हवामान आणि चांगला निचरा असलेली जमीन या पिकासाठी उपयुक्त असते. वर्षभर लागवड करता येते आणि वर्षातून तीन ते चार वेळा कापणी मिळते. दिलीप आणि गौरी या दोघांनाही शेतीचा प्रत्यक्ष अनुभव नव्हता; पण जिद्द प्रचंड होती. गावातील अनेकांना त्यांचा निर्णय वेडेपणाचा वाटत होता. मात्र, त्यांनी माघार घेतली नाही. हातातली सर्व पुंजी गुंतवली होती आणि आता यशस्वी होण्याशिवाय पर्याय नव्हता. गवती चहाचं पीक चांगलं आलं; पण त्यापासून तेल काढण्यासाठी लागणारं डिस्टिलेशन युनिट उभारणं मोठं आव्हान होतं. त्यांनी तेही स्वीकारलं. आवश्यक खर्च करून यंत्रणा उभी केली आणि संपूर्ण प्रक्रिया आत्मसात केली. त्यांच्या मते, आज त्यांचं डिस्टिलेशन युनिट कोकणातील पहिलं अशा प्रकारचं युनिट आहे. केवळ गवती चहा विकण्यापेक्षा त्यापासून गवती चहा तेल, नैसर्गिक साबण, फ्लोअर क्लीनर यांसारखी मूल्यवर्धित उत्पादनं तयार करण्यावर त्यांनी भर दिला. त्यासाठी ‘सुगंध’ हा स्वतःचा ब्रँड विकसित केला. दहा ते पंधरा जणांना थेट रोजगार उपलब्ध करून दिला. पॅकेजिंगपासून उत्पादनापर्यंत प्रत्येक गोष्टीत पर्यावरणपूरक दृष्टिकोन ठेवला. प्लॅस्टिकऐवजी पर्यावरणस्नेही साहित्य, स्थानिक महिलांना रोजगार आणि रसायनांचा कमीतकमी वापर यांवर त्यांनी भर दिला. त्याचबरोबर ऑनलाइन विक्री, थेट ग्राहक संपर्क आणि घाऊक ऑर्डर यांचीही सांगड घातली. या प्रयत्नांना अपेक्षेपेक्षा अधिक प्रतिसाद मिळू लागला. उत्पादनक्षमता, गुणवत्ता आणि प्रभावी विपणन यांमुळे आज त्यांची वार्षिक उलाढाल ३० लाख रुपयांहून अधिक झाली आहे. त्यांच्या उत्पादनांना देशाबरोबरच परदेशातही बाजारपेठ मिळाली आहे. त्यांची शेतीपद्धती, डिस्टिलेशन प्रक्रिया आणि उत्पादनांच्या प्रयोगशाळा चाचण्या पाहण्यासाठी परदेशी ग्राहक तिठवलीत येतात. तेव्हा शहरातील ‘कंफर्ट झोन’ सोडून गावात परतण्याचा घेतलेला निर्णय योग्य ठरल्याचं समाधान त्यांच्या चेहऱ्यावर झळकत असतं. दिलीप आणि गौरी यांचं उदाहरण आज अनेक धाडसी तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. त्यांचा आत्मविश्वासही तितकाच ठाम आहे.

(लेखक ज्येष्ठ पत्रकार-संपादक आहेत. मोबाईल ९८२००१६६७४)
---
कोट
----
‘‘आता मागे जाण्याचा प्रश्नच नाही. योग्य तंत्रज्ञान, नियोजन आणि बाजारपेठेची समज असेल तर शेती हा सर्वाधिक नफा देणारा व्यवसाय ठरू शकतो, यावर आमचा पूर्ण विश्वास आहे.’’
- दिलीप व गौरी परब
------------------------पूर्ण----------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com