हवामानाचा अचूक अंदाज लावण्यात यश - डॉ. एम. राजीवन

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 नोव्हेंबर 2019

नव्या प्रणालीची गरज का?
मागील काही वर्षांमध्ये अरबी समुद्रात अती तीव्र स्वरूपाच्या चक्रीवादळांची मालिकाच उभी राहिली होती. केरळमध्ये मॉन्सून हंगामात  ‘ओखी’ हे अती तीव्र चक्रीवादळ आले होते. यामुळे मोठ्या प्रमाणात मालमत्ता आणि जीवितहानी झाली होती. तसेच ऑगस्ट २०१८ मध्ये केरळमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे संपूर्ण राज्याला पुराचा तडाखा बसला. देशातील मुंबई, चेन्नई आदी महत्त्वाची शहरे समुद्रकिनारी आहेत. त्यामुळे अतिशय अचूक हवामान अंदाज वर्तविणाऱ्या प्रणालीची देशाला आवश्‍यकता आहे. तसेच कृषी प्रधान असलेल्या देशासाठी अचूक हवामान अंदाज नेहमीच महत्त्वाचा आहे.

पुणे - ‘मागील काही वर्षांमध्ये हवामानाचा अचूक अंदाज लावण्यात आम्हाला यश आले आहे. सुधारित कार्यप्रणाली आणि चांगल्या माहितीमुळे हे शक्‍य झाले. इतर देशांप्रमाणे भारत देशही या क्षेत्रात सक्षमरीत्या कार्य करू शकतो. यंदा मॉन्सून हंगामात पाच चक्रीवादळ निर्माण झाले होते. त्या सर्वांचे अंदाज या प्रणालीमुळे घेणे सोपे झाले होते,’’ अशी माहिती केंद्र सरकारच्या पृथ्वी विज्ञान विभागाचे सचिव डॉ. एम. राजीवन यांनी दिली. 

भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेत (आयआयटीएम) आंतरराष्ट्रीय कार्यशाळेच्या उद्‌घाटन समारंभात ते बोलत होते. अमेरिकेतील वातावरणीय विज्ञान संस्थेचे प्रा. केरी इमॅन्युअल, प्रा. ग्रॅम स्टिफन, आयआयटीएमचे संचालक आर. एस. नांजुनदिया आणि हवामान बदल संशोधन केंद्राचे कार्यकारी संचालक डॉ. आर. कृष्णन आदी उपस्थित होते. 

प्रा. इमॅन्युअल म्हणाले, ‘‘समुद्रकिनारपट्टीवर १९७१ च्या तुलनेत सध्या तिप्पट लोक राहतात. त्यामुळे चक्रीवादळाचे अंदाज लावणे किती आवश्‍यक आहे हे तेथील वाढत्या लोकसंख्येवरून अधोरेखित होते. पुढील चार दिवसांत जगभरातील विविध तज्ज्ञ यासंबंधित विषयांवर माहिती देणार आहेत. तसेच जागतिक स्तरावर विविध संस्थांमध्ये याचा वापर करण्यात येईल.’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Success in weather forecasting dr m rajeevan