
पुण्यातील गोधड्या पोचणार सातासमुद्रापार !
पुणे : कोरोनामुळे पतीचे निधन झाले..... कोरोनामुळे व्यवसाय बंद पडला.... अशा विविध पद्धतीने कोरोनाचा फटका बसलेल्या महिलांसाठी बाणेरमधील ‘जिकोनी फाऊंडेशन’ने मदतीचा हात पुढे केला आहे. बावधन, भोरमधील करंदवडी आणि दौंड तालुक्यातील वरवंडमधील महिलांनी तयार केलेल्या गोधड्यांची (क्विल्ट) माहिती ट्विटरवरून जगभर पोचविली. त्या खरेदीसाठी जपान, अमेरिका, ग्रेट ब्रिटन, दक्षिण कोरिया, स्वीडन, केनियामधून नागरिकांनी मागणी नोंदविली आहे.
कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत निर्बंधांमुळे अनेकांना फटका बसला. विशेषतः कष्टकरी वर्गाला त्याचा मोठा फटका बसला. त्यातून त्यांना सावरण्यासाठी बाणेरमधील जिकोनी फाऊंडेशनने पुढाकार घेतला आहे. बावधन, करंदवडी आणि वरवंडमधील ३६ महिलांचा ग्रूप त्यांनी तयार केले. त्यांना गोधडी तयार करण्यासाठी साड्या, कापसाच्या लाद्या दिल्या आहेत. त्यांच्याकडून तयार करून घेतलेल्या गोधड्यांचे जिकोनीच्या संस्थापक रोनिता घोष यांनी ट्विटरवरून मार्केटिंग केले. त्यामुळे परदेशातूनही आता मोठ्या प्रमाणात त्यांना ऑर्डर येऊ लागल्या आहेत. आत्तापर्यंत सुमारे ८०० गोधड्या त्यांनी तयार केल्या आहेत. त्या तयार करणाऱ्या करणाऱ्या महिलांना आकारानुसार प्रत्येक गोधडीमागे १५०० ते २ हजार रुपये मिळतात. त्यामुळे त्यांनाही रोजगाराची संधी मिळाली आहे.
या गोधड्या त्या त्यांच्या घरातच काम सांभाळून करतात. त्यामुळे त्यांनाही ते सोयीचे पडत आहे. पुढच्या महिन्यापासून त्या गोधड्या परदेशात पोचण्यास सुरवात होईल. त्यासाठी आता पॅकिंगची तयारी सुरू असून या गोधड्या खासगी कुरिअरने नव्हे तर, इंडियन पोस्टद्वारे परदेशात पोठविण्याचे ‘जिकोनी’ने ठरविले आहे.
या बाबत घोष म्हणाल्या, ‘‘कोरोनामुळे ग्रामीण भागातील कष्टकरी महिलांना मोठा फटका बसला. त्यामुळे गोधड्या तयार कऱण्या कल्पना सुचली. मार्केटिंग हा अवघड प्रकार असतो. सुरवातीला आम्ही ट्विटरवरून गोधड्यांची माहिती दिली. काही दिवसांतच त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. त्यातून आमचा हुरूप वाढला. आम्ही तयार केलेल्या गोधड्यांचे दर कमी असल्यामुळे मागणी वाढू लागली आहे. त्यातून महिलांना रोजगारही मिळत आहे. भांडवलासाठी अनेकांनी वर्गणी दिली. त्यातून आता गोधड्यांचे उत्पादन सुरू आहे. परदेशातून मिळणारा प्रतिसाद आमचा उत्साह वाढविणारा आहे.’’
‘जिकोनी’च्या सहसंस्थापिका शिल्पा देशपांडे म्हणाल्या, ‘‘गोधड्या ही महाराष्ट्राची खासियत आहे. त्या तयार करण्यासाठी आम्ही दुकानदारांकडे शिल्लक असणाऱ्या नव्या साड्या वापरतो. आकर्षक डिझाईनसाठी खणाच्या साड्या वापरतो. आकर्षक झालेल्या गोधड्यांना मिळणारा प्रतिसाद आमच्या कष्टकरी महिलांचे मनोबल वाढविणारा आहे.’’
गरजूंना पौष्टीक खिचडी वाटप
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपासून ‘जिकोनी’तर्फे ससून रुग्णालयातील रुणांच्या नातेवाईकांना रोज पौष्टिक खिचडीचे डबे पुरविण्यास सुरवात केली आहे. रोज सुमारे ४०० ते ५०० डबे ते ससूनमध्ये पोचवितात. तसेच ससूनच्या बाहेर पदपथावर राहणाऱ्या निराधारांनाही ते खिचडीचे वाटप करतात. काही वेळा रोज दोनवेळाही ते गरजूंना डबे पुरवितात. गेल्यावर्षी २ एप्रिलपासून त्यांनी हा उपक्रम सुरू केला असून तो निरंतर सुरू आहे. बाणेरमधील अनेक रहिवासी यात सक्रिय आहेत.
Web Title: Successful Women In Business Of Quilt Will Export In International Market Pune
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..