केंद्र सरकारच्या बंदीमुळे साखर होणार ‘तिखट’

केंद्र सरकारच्या बंदीमुळे साखर होणार ‘तिखट’

सोमेश्वरनगर, ता. १५ : केंद्रसरकारची साखरेवरील संपूर्ण निर्यातबंदी, इथेनॉलनिर्मितीवरील काही बंधने यामुळे चालू साखर हंगामात तब्बल ३२१ लाख टन साखरनिर्मिती होणार आहे. साखरेची निर्यात न केल्यास तब्बल नव्वद लाख टन साखर अतिरिक्त ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे साखरेची निर्यात व्हावी, अशी मागणी साखरउद्योगातून होत आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ, इंडियन शुगर मिल असोसिएशन (इस्मा) या संस्थांनीही साखरनिर्यातीची मागणी केली आहे.
पाच राज्यांच्या लोकसभा निवडणुका आणि त्या पाठोपाठ आलेल्या विधानसभा निवडणुका यामुळे केंद्रसरकारने चालू साखर हंगामात साखरउद्योगाची चांगलीच कोंडी केली. चालू हंगामात साखरनिर्मितीत घट होईल म्हणून बेमुदत निर्यातबंदी लादली. शिवाय इथेनॉलनिर्मितीवर मर्यादा घातल्या. आता महाराष्ट्रात १०९ तर उत्तरप्रदेशात १०३ लाख टन साखरनिर्मिती झाली. परिणामी देशभरात ३२१ लाख टन साखरनिर्मिती हंगामाअखेर होईल, अशी खात्री झाली आहे.

हंगाम सुरू होताना देशात ५६ लाख टन साखरसाठा शिल्लक होता. त्यामध्ये ३२१ लाख टन नव्या साखरेची भर पडणार आहे. त्यातून २८५ लाख टन देशाची गरज भागून आगामी हंगामाच्या तोंडावर एक ऑक्टोबर २०२४ साठी ९० लाख टनांपेक्षा अधिक साखरसाठा शिल्लक उरेल. शिवाय पावसाळाही चांगला जाण्याचे अंदाज आहेत.


कारखान्याचे अर्थचक्र गाळात अडकण्याची शक्यता
साखरेचा बोजा वाढून कारखान्यांचे आधीच मंदावलेले अर्थचक्र आणखी गाळात अडकण्याची शक्यता आहे. चालू हंगामात जागतिक बाजारात ४५०० ते ५००० रुपये प्रतिक्विंटल साखर होती. निर्यात खुली असती तर शेतकऱ्यांना प्रतिटन चार हजार रुपये भाव मिळून कारखान्यांचेही अर्थचक्र गतिमान झाले असते. पण आतातरी निवडणुकांचे टप्पे संपत आल्याने केंद्रसरकारने निर्यातीचा निर्णय घ्यावा अशी मागणी होत आहे.

सर्वत्र अंदाजापेक्षा अधिक ऊस उत्पादन वाढले आणि साखरनिर्मिती वाढली. हंगामाच्या सुरवातीला ३७०० रुपये प्रतिक्विंटलवर गेलेले साखरेचे भाव ३५०० रुपये प्रतिक्विंटलच्या खाली आले आहेत. अशात आगामी हंगामासाठी सरकारने एफआरपी वाढविली आहे. ती देता यावी आणि चालू हंगामाची साखरही चांगल्या दराने विकली जावी यासाठी साखरनिर्यात करावी तसेच इथेनॉलवरील सर्व मर्यादा उठवाव्यात.
- राजेंद्र यादव, कार्यकारी संचालक, सोमेश्वर साखर कारखाना


देशाचा हंगाम अंतिम टप्प्यात असून ऐंशी लाख टनांपेक्षा अधिक अतिरिक्त साखर शिल्लक राहणार आहे. केंद्रसरकारने २० लाख टन निर्यातीची परवानगी द्यायला हरकत नाही. दरम्यान, इस्मानेदेखील केंद्रसरकारकडे वीस लाख टन निर्यातीची मागणी केली आहे.
- संजय खताळ, व्यवस्थापकीय संचालक, राज्य साखरसंघ

20264

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com