ऊसाचे पाचट न जाळता ते शेतात कुजवून जमिन सुपिकता व ऊस उत्पादन वाढवणे गरजेचे | Sugarcane | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ऊसाचे पाचट न जाळता ते शेतात कुजवून जमिन सुपिकता व ऊस उत्पादन वाढवणे गरजेचे

ऊसाचे पाचट न जाळता ते शेतात कुजवून जमिन सुपिकता व ऊस उत्पादन वाढवणे गरजेचे

इंदापूर - इंदापूर तालुका हा ऊसाचे आगार म्हणून ओळखला जात असून ऊसाचे एकरी ऊस उत्पादन वाढविण्यासाठी ऊसाचे पाचट न जाळता ते शेतात कुजवून जमिन सुपिकता व ऊस उत्पादन वाढवणे गरजेचे आहे असे प्रतिपादन इंदापूर तालुका कृषि अधिकारी भाऊसाहेब रुपनवर यांनी केले.

ऊस खोडवा उत्पादन व पाचट व्यवस्थापन अभियानांतर्गत कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याचे संचालक प्रवीण देवकर, माजी संचालक देवीदास पाटील यांच्या उपस्थितीत वरकुटे बूद्रुक, बळपुडी, राजवडी, गंगावळण येथे ऊस पाचट कार्यशाळा तसेच शेतकरी मासिक वाचन कार्यक्रम संपन्न झाले. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. भाऊसाहेब रुपनवर पुढे म्हणाले, ऊसाच्या पाचटात ०.५ टक्के नत्र, ०.२ टक्केस्फुरद , ०.७ ते १ टक्के पालाश, ३२ ते ४० टक्के सेंद्रिय कर्ब असते. त्यामुळे पाचटजाळल्यास त्यातील सेंद्रिय कर्बाचा पूर्णतः नाश होतो.

हेही वाचा: वर्षभरात 80 आगीच्या घटनांवर नियंत्रणl; तर 20 बचाव कार्य

पाचटातील नत्र आणि स्फुरदाचा ९० टक्के हून अधिक भाग जळून जातो.केवळ पालाश काही प्रमाणात शिल्लक राहते. एक हेक्‍टर क्षेत्रातून आठ ते दहा टन पाचट मिळत असून त्यातून ४० ते ५० किलो नत्र, २० ते ३० किलो स्फुरद, ७५ ते १०० किलो पालाश आणि ३ ते ४ टन सेंद्रीय कर्ब जमिनीत जाते. ऊस तोडणीनंतर उसाच्या बुडख्यावर असलेले पाचट बाजूला करून उसाचे बुडखे मोकळे केल्यास त्यावर सूर्यप्रकाश पडून येणारे कोंब जोमदार येतात. उसाचे मोठे बुडखे जमिनीलगत धारदार कोयत्याने छाटणीनंतर लगेचच ०.१ टक्के बाविस्टीन या बुरशी नाशकाची फवारणी करणे गरजेचे आहे. शेतात पसरलेल्या पाचटावर प्रति हेक्‍टरी ८० किलो युरिया, १०० किलो सिंगल सुपर फॉस्फेट टाकल्यानंतर १० किलो पाचट कुजविणारे जिवाणू संवर्धक खत सम प्रमाणात टाकून ऊसास पाणी देणे गरजेचे आहे. जमीन ओली असताना सरीतील पाचट पायाने थोडे दाबून घेतल्यास पाचटाचा मातीशी संबंधयेऊन हळूहळू कुजण्याची प्रक्रिया सुरू होते.

मंडळ कृषी अधिकारी आबासाहेब रुपनवर म्हणाले, ऊस तुटल्यानंतर उसाचे पाचट शेता मध्येच कुजवून जमिन सुपीकता व खोडवा ऊस उत्पादन वाढविणे गरजेचे आहे.

पाचटामुळे पाणी व वीज बिलात बचत होते, तण नियंत्रण करता येते, जमिन सुपीकता वाढुन उत्पादनात वाढ होते तसेच प्रदूषण घटते. त्यामुळे पाचट व्यवस्थापन करणे अतिशय गरजेचे असल्याचे कृषि सहाय्यक हनुमंत बोडके यांनी सांगितले.

यावेळी सुनील शिंदे, तानाजी शिंदे, विजय बालगुडे, तानाजी गायकवाड, राहुल देवकर, नवनाथ शिंदे, गणपत कुंभार, राहुल शिंदे, नागेश गलांडे, रमेश भांडवलकर, राहुल बोंगाणे, अंबादास खताळ, कृषी पर्यवेक्षक विलास बोराटे, कृषी सहाय्यक भारत बोंगाणे, गणेश भोंग, प्रशांत मोरे, अमोल लवटे, वैभव अभंग उपस्थित होते.

loading image
go to top