
Sugarcane Crop : कष्ट करुन ऊस पिकवला खरा पण आता करायचं काय?
सिंहगड : मोठा खर्च करून, मेहनत करून ऊस पिकवला खरा परंतु आता तोडीचा कालावधी उलटून गेला तरी साखर कारखाने टाळाटाळ करत असल्याने पश्चिम हवेली तालुक्यातील शेतकऱ्यांसमोर आता या ऊसाचे करायचे काय?
असा प्रश्न निर्माण झाला आहे. तोडीला उशीर झाल्याने ऊसाला तुरा आला असून मधेच फुटवे फुटण्यास सुरुवात झाली आहे. याबाबत 'सकाळ'ने साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्याशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी तातडीने साखर कारखान्याच्या व्यवस्थापकांशी चर्चा करुन संबंधित शेतकऱ्यांचा ऊस घेऊन जाण्यास सांगितले आहे.
पश्चिम हवेली तालुक्यातील गोऱ्हे बुद्रुक, गोऱ्हे खुर्द, खानापूर, मालखेड, सोनापूर या गावांतील खडकवासला धरणकाठचे शेतकरी पाण्याची उपलब्धता असल्याने ऊसाचे पीक घेतात. राजगड सहकारी साखर कारखाना भोर किंवा संत तुकाराम सहकारी साखर कारखाना मुळशी या कारखाण्यांकडून या भागातील ऊस नेला जात होता.
यावर्षी मात्र आमचे कार्यक्षेत्र नाही असे म्हणत कारखाण्यांकडून ऊस घेऊन जाण्यास टाळाटाळ सुरू असल्याने ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. सध्या ऊसाला तुरे आले असून फुटवे फुटू लागले आहेत. ऊन वाढत असल्याने कांड्या कडक होऊ लागल्याने या ऊसाला जणावरेही खात नाहीत. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले असून लवकरात लवकर ऊस घेऊन जावा यासाठी कारखाण्यांकडे विनवण्या करत आहेत.
"मागील वर्षी अनेक वेळा विनवण्या केल्यानंतर खुप उशीरा ऊस नेला. तेव्हा नुकसान झाले, ते यावर्षी भरुन निघेल असं वाटलं होतं परंतु आता तर आमचं कार्यक्षेत्र नाही असं सांगून ऊस नेण्यास टाळाटाळ होत आहे. दिड एकर ऊस आहे त्याचं करायचं काय असा प्रश्न आहे."
- भारत खिरीड, शेतकरी, गोऱ्हे बुद्रुक.
"कारखाण्याची वाट पाहून ऊस खराब होऊन चालला होता. अखेर दीड ते दोन लाख रुपयांचा ऊस केवळ पन्नास हजार रुपयांत जनावरांच्या चाऱ्यासाठी विकून टाकला. मशागतीचा खर्चही निघाला नाही."
- बंडाभाऊ टकले, शेतकरी, गोऱ्हे खुर्द.
"सिंहगड परिसर आमचं कार्यक्षेत्र नाही तरी आम्ही शेतकऱ्यांना सहकार्य करत आहोत. एकूण ऊसाचे क्षेत्र किती आहे त्याची माहिती मागवली असून लवकरच राहिलेला ऊस तोडण्याची व्यवस्था केली जाईल. शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही याची काळजी घेतली जाईल."
- साहेबराव पठारे, व्यवस्थापक, संत तुकाराम सहकारी साखर कारखाना.
"संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या व्यवस्थापकांशी चर्चा केली असून पश्चिम हवेलीतील संबंधित शेतकऱ्यांचा ऊस घेऊन जाण्याची तातडीने व्यवस्था करत असल्याचे त्यांनी सांगितले आहे."
- शेखर गायकवाड, साखर आयुक्त, पुणे.