१९ वर्षीय ऊस तोडणी युवकाचा अपघाती मृत्यु | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Accident

माळेगाव (ता. बारामती) साखर कारखाना कार्य़स्थळालगत वाघमोडे वस्ती येथे कार्य़ान्वित असेल्या २२ फट्यामध्ये आज उसाने भरलेली ट्रॅक्टर-गाडी उलटली.

Accident Death : १९ वर्षीय ऊस तोडणी युवकाचा अपघाती मृत्यु

माळेगाव - माळेगाव (ता. बारामती) साखर कारखाना कार्य़स्थळालगत वाघमोडे वस्ती येथे कार्य़ान्वित असेल्या २२ फट्यामध्ये आज उसाने भरलेली ट्रॅक्टर-गाडी उलटली. या अपघातात एका १९ वर्षीय ऊस तोडणी युवकाचा मृत्यु झाला. कृष्णा वसंत जाधव (रा. चाळीसगाव, जिल्हा जळगाव) हे मयत युवकाचे नाव आहे. कृष्णा हा त्याच्या आई-वडीलांचा एकटा मुलगा होता. त्यामुळे घटनास्थळी संबंधित जाधव कुटुंबियांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणार होता.

दरम्यान, माळेगाव कारखाना कार्य़स्थळावर २२ फाट्याच्या भराव्यावरील रस्त्याचे काॅक्रीटीकरण नव्याने झाले आहे. उसाने भरलेली गाडी रस्त्याच्या साइटपट्टीवर गेली असता सदरची मातीची साइडपट्टी खचली आणि वरील दुर्घटना घडली, अशी माहिती कारखाना प्रशासनाने दिली. विशेषतः ही दुर्घटना घडल्यानंतर कारखाना प्रशासनाच्यावतीने मदत कार्य़ हाती घेण्यात आले होते, परंतु मयत कृष्णाची त्याआगोदरच प्राणज्योत मावळली होती. स्थानिक रहिवाशांसमवेत शेतकी अधिकारी सुरेश काळे, अधिकारी श्री. वाघ यांच्यासह पोलिस यंत्रणेने शर्थिचे प्रयत्न केले, परंतु अपेक्षित यश आले नाही.

'माळेगाव हद्दीत सध्याला रस्त्यांची कामे सुरू आहेत. परंतु संबंधीत ठेकेदार या रस्त्यांच्या साइडपट्ट्या मजबूत करत नाहीत,परिणामी लहानमोठे अपघात घडत आहेत. अर्थात त्या समस्येमुळेच शुक्रवारी १९ वर्षाचा ऊस तोडणी करणारा युवक मृत्युमुखी पडला आहे,' अशी माहिती प्रत्यक्षदर्शनी घटना पाहणारे स्थानिक कार्य़कर्ते गैरव जाधव यांनी प्रसार माध्यमांपुढे मांडले.