
ऊस हे पीक आळशी लोकांचे नव्हे, तर कष्टकऱ्यांचे आहे: अजित पवार
माळेगाव : गतवर्षी समाधानकारक झालेले पर्जन्यमान, उत्तम ऊस बेणे निवड, पाणी आणि खत मात्राचे व्यवस्थापन केल्याने माळेगाव, सोमेश्वर, छत्रपतीसह सर्वज कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात सरासरी उसाचे एकरी टनेज यंदा वाढले. तसेच राज्यात एकरी शंभर टनापेक्षा अधिक ऊस उत्पादन काढण्यासाठी अनेक शेतकरी पुढे येत आहेत. ते शेतकरी शिवारात प्रचंड कष्ट करतात. त्यामुळे हे पीक आळशी लोकांचे नव्हेतर कष्टकऱ्यांचे आहे, असे सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कृषी विभागाचे ऊसाचे क्षेत्र नव्हे तर एकरी उत्पादन शंभर टनापर्यंत वाढविण्याचे अभियान निश्चिच फायद्याचे ठरेल सांगितले.
माळेगाव बुद्रूक (ता.बारामती) येथे अजित पवार यांच्या उपस्थितीत शासनाच्या कृषी विभागाच्यावतीने सुरू केलेल्या एकरी शंभर टन ऊस उत्पादन अभियानाचा शुभारंभ झाला. त्यानिमित्ताने आयोजित शेतकरी मेळाव्यात पवार बोलत होते. ते म्हणाले, `` पवारसाहेब आणि केंद्रीय मंत्री गडकरीसाहेबांचा ऊस पिकाचा मोठा अभ्यास आहे. अलिकडच्या काळात साखरेबरोबर इथेनाॅल निर्मितीला संबंधित नेत्यांनी प्रोत्साहन दिले आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनीही ऊस पिकाबरोबर आता शेतकऱ्यांनी इतर पिकांनाही शिवारात प्राधान्य देण्यासाठी पुढे आले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. हे जरी खरे असले, तरी शेतकरी शाश्वत पैसे मिळवून देणारे पिक म्हणून ऊस पिक घेण्यास प्राधान्य देतात. त्यानुसार आता शासनाच्या कृषी विभागाने ऊसाचे क्षेत्र नव्हे तर एकरी उत्पादन शंभर टनापर्यंत वाढविण्यासाठी जनजागृती अभियान सुरू केले आहे, त्याचा शेतकऱ्यांबरोबर सर्वच साखर कारखान्यांना फायदा होणार आहे.
'कृषी विभागाने शंभर टनापर्यंत उत्पादन वाढविण्यासाठी उपलब्ध तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोचण्याचा प्रय़त्न सुरू ठेवला आहे. माळेगाव, सोमेश्वर, छत्रपती कारखाना प्रशासनानेही याकामी पुढाकार घ्यावा, अशीही सूचना पवार यांनी केली. यावेळी माळेगावचे संचालक अनिल तावरे यांनी नदीकाठच्या क्षारपड जमिनीची गंभीर समस्या सोडविण्याची विनंती केली, तो धागा पकडत पवार यांनी बारामती आदी परिसरातील चाऱ्या स्वच्छतेसाठी शासनस्तरावर दीड कोटी रुपये मंजूर केल्याचे सांगितले. यावेळी माळेगावचे अध्यक्ष बाळासाहेब तावरे, सोमेश्वरचे अध्यक्ष पुरूषोत्तम जगताप, छत्रपतीचे अध्यक्ष प्रशांत काटे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी (पुणे) ज्ञानेश्वर बोटे, पाडेगाव संशोधन केंद्राचे डाॅ. भरत रासकर, पुणे कृषी महाविद्यालायाचे डाॅ. धर्मेंद्रकुमार फाळके, संभाजी होळकर, सचिन सातव, संदीप जगताप आदी उपस्थित होते. प्रस्ताविक उपविभागीय कृषी अधिकारी वैभव तांबे यांनी केले, तर आभार तालुका कृषी अधिकारी सौ. सुप्रिया बांदल यांनी मानले, कार्य़क्रमाचे सूत्रसंचालन प्रा.अनिल धुमाळ यांनी केले.
पवारांनी केला धोरणात्मक निर्णय जाहिर...!
बारामती तालुक्यातील भौगोलिक स्थितीचा विचार करून माळेगावचे ऊसाचे कार्य़क्षेत्र वाढविले जाईल आणि सोमेश्वर व छत्रपती कारखान्यांकडील बारामती लगतची गावे कमी होतील. तशापद्धतीच्या सूचना साखर आयुक्तांना दिल्या जातील. अर्थात ही प्रक्रिया पुर्ण होताच संबंधित शेतकऱ्यांना माळेगावच्या प्रशासनाने सभासद करून घ्यावे, असा धोरणात्मक निर्णय पवारांनी जाहिर करताच उपस्थितांनी टाळ्या वाजवून स्वागत केले.
Web Title: Sugarcane Is Crop Not Of Lazy People It Is Of Hard Workers Ajit Pawar Malegaon
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..