esakal | सोमेश्‍वर कारखान्यामुळे ऊस दराबाबत स्पर्धा
sakal

बोलून बातमी शोधा

Sugercane

सोमेश्‍वर सहकारी साखर कारखान्याने गतवर्षीच्या गळीत उसाला अंतिम दर प्रतिटन 3300 रुपये जाहीर करून माळेगावसह सर्वच कारखान्यांपुढे ऊस दराची स्पर्धा निर्माण केली. परिणामी ऊस दराबाबत माळेगाव कारखान्याकडून सभासदांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.

 

सोमेश्‍वर कारखान्यामुळे ऊस दराबाबत स्पर्धा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

माळेगाव (पुणे) : सोमेश्‍वर सहकारी साखर कारखान्याने गतवर्षीच्या गळीत उसाला अंतिम दर प्रतिटन 3300 रुपये जाहीर करून माळेगावसह सर्वच कारखान्यांपुढे ऊस दराची स्पर्धा निर्माण केली. परिणामी ऊस दराबाबत माळेगाव कारखान्याकडून सभासदांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.

माळेगावने आजवर एफआरपी 2776 रुपये अधिक शंभर रुपये कांडे पेमेंट असे एकूण 2876 रुपये अदा केले आहेत. त्यामुळे या कारखान्याची प्रतिदिनी वाढलेली गाळप क्षमता, उत्पादन खर्च कमी, पूर्वीपासून पैसे मिळवून देणारे उपपदार्थ निर्मिती प्रकल्पांचा विचार करता माळेगावने 3500 रुपये अंतिम दर जाहीर करावा, अशी मागणी राष्ट्रवादी पुरस्कृत सभासद बचाव कृती समितीने केली आहे.
माळेगाव, सोमेश्‍वर, भीमाशंकर, विघ्नहर, छत्रपती आदी सहकारी साखर कारखाने ऊस दराच्या बाबतीत अग्रेसर मानले जातात. विशेषतः सोमेश्‍वर कारखाना हा कर्जबाजारीतून बाहेर पडून यंदा अंतिम दरात उच्चांक गाठू शकतो, तर आर्थिक क्षमता उत्तम म्हणून सातत्याने गणना होत असलेला माळेगाव यंदाचा अंतिम दर सोमेश्‍वरच्या तुलनेत काढू शकतो, असे मत अनेकांनी वर्तविले आहे. साहजिकच सोमेश्‍वर व माळेगावमध्ये ऊस दराची स्पर्धा चांगलीच रंगणार असल्याचे दिसते.

दरम्यान, माळेगावने गतवर्षीपासून कारखान्याची प्रतिदिनी ऊस गाळप क्षमता आठ हजारपर्यंत वाढली आहे. त्या प्रक्रियेत कारखाना आधुनिकीकरण झाल्याने साखरेचे उत्पादन वाढले. शिवाय डिस्टिलरी व को-जनरेशनची विस्तारवाढ झाल्याने उत्पादन वाढले. साहजिकच आधुनिकीकरणामुळे उत्पादन खर्च कमी झाल्याचे सत्ताधारी सातत्याने सांगत आहेत. त्यामुळे माळेगावचे प्रशासनाने स्वतःहून सभासदांना इतरांपेक्षा अधिकचे पैसे देणे आवश्‍यक आहे, असे मत राष्ट्रवादीचे नेते व माजी अध्यक्ष बाळासाहेब तावरे यांनी व्यक्त केले. यावेळी संचालक तानाजी कोकरे, ऍड. एस. एन. जगताप, रामभाऊ देवकाते, संगीता कोकरे, माजी नगराध्यक्ष योगेश जगताप, जिल्हा बॅंकेचे संचालक मदनराव देवकाते आदी पदाधिकारी उपस्थित होते.

भाजप संचालकांच्या भूमिकेकडे लक्ष
सहकारी साखर कारखान्यांमध्येसुद्धा राज्यात प्रथम क्रमांकाचा दर दिला जातो, यांचे उत्तम उदाहरण सोमेश्‍वर कारखान्याने घालून दिले. तसेच माळेगाव कारखानाही राष्ट्रवादीकडे असतानाही बाळासाहेब तावरे यांनी विक्रमी दर दिल्याची नोंद आहे. त्या तुलनेत भाजपच्या विचाराचे सध्याचे संचालक मंडळ ऊस दराच्या बाबतीत काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेही "सोमेश्‍वर कारखान्याचे विक्रमी ऊस दराबाबत अभिनंदन केले आहे, अशी माहिती जिल्हाध्यक्ष राजेंद्र ढवाण यांनी दिली.

loading image
go to top