

Risk-Taking is Key to Effective Leadership
Sakal
प्रश्न ः भारतीय सैन्यात शारीरिक आणि मानसिक आरोग्य किती महत्त्वाचे आहे?
उत्तर ः ‘सैन्य म्हणजे फक्त बलाढ्य, स्नायूंनी भरलेल्या शरीरांची जमात आहे,’ हा अतिशय मोठा गैरसमज आहे. भारतीय लष्कर म्हणजे फक्त स्नायूंची ताकद नाही, तर मन आणि शरीराचा समतोल साधू शकणाऱ्या जवानांची फळी. हे सर्वप्रथम स्पष्ट केले पाहिजे. अनेक तरुण दिसायला तंदुरुस्त असतात, शरीर बांधणी छान, ताकदही चांगली, मात्र संकटसमयी योग्य निर्णय घेणे, धोका ओळखणे आणि विवेकाने कृती करणे यामध्ये ते परिपूर्ण असतीलच असे नाही. मी अनेक तरुणांना पाहिले आहे; ते तरुणपणात शरीर घडविण्यासाठी जिममध्ये तासन् तास घालवतात. मात्र, मानसिक शिस्त विकसित करण्याकडे फार कमी लक्ष देतात. लष्करी प्रशिक्षणाचा पाया हा प्रत्यक्षात मानसिक बळावर उभा आहे. सैनिकाला गोळीबाराचा आवाज, मृत्यूची सावली, अनिश्चिततेचा दाह या सगळ्यांना तोंड देऊनही शांत राहावे लागते. लष्करातील प्रशिक्षण म्हणजे शरीराला कष्ट देणे नाही, तर मानसिक शिस्त विकसित करणे. राष्ट्रीय संरक्षण संस्था (एनडीए), भारतीय सैन्य ॲकॅडमी (आयएमए) किंवा अधिकारी प्रशिक्षण ॲकॅडमी (ओटीए) या तीनही संस्थांमध्ये तरुणांना घडवताना शारीरिक प्रशिक्षणासोबतच अत्यंत बारकाईने मानसिक स्थैर्य, आत्मनियंत्रण, दबावाखाली निर्णयक्षमता आणि नेतृत्वगुण विकसित केले जातात.