Pune News : बर्फाने केले डोके गरम; अस्वच्छतेमुळे मळमळ, उलट्या, डोकेदुखी वाढली

‘भर दुपारी उन्हात फिरताना थंड पाणी कधी मिळेल, असे झाले. त्यामुळे उसाचा रस घेतला. त्यात बर्फ टाकला. त्यानंतर तासाभराने डोके दुखायला लागले. मळमळ सुरू झाली.
Ice
Icesakal

पुणे - ‘भर दुपारी उन्हात फिरताना थंड पाणी कधी मिळेल, असे झाले. त्यामुळे उसाचा रस घेतला. त्यात बर्फ टाकला. त्यानंतर तासाभराने डोके दुखायला लागले. मळमळ सुरू झाली. लगेचच डॉक्टरांकडे गेलो. तुम्हाला रसाने नाही, तर त्यातील बर्फाने त्रास झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले...’ सागर गव्हाणे बोलत होते...

ते म्हणाले, 'रस प्यायल्यानंतर प्रथमच मला त्रास झाला. उन्हाचा चटका जास्त होता. त्यामुळे बर्फ जास्त टाकायला सांगितला. पण, हा बर्फ कुठून येतो, कसा आणला जातो, त्यासाठी कोणते पाणी वापरले जाते याची माहिती न घेता उसाच्या रसात टाकलेल्या बर्फामुळे डोकेदुखी वाढविली आणि एक दिवस आजारपणाची रजा घेऊन घरी बसावे लागले.'

शहरात उन्हाचा पारा चाळिशीपार नोंदला जात आहे. सकाळी ११ ते संध्याकाळी अगदी चार-पाच वाजेपर्यंत उन्हाचा चटका बसतो. कामानिमित्त सातत्याने बाहेर फिरणाऱ्या गव्हाणे यांनी हा अनुभव ‘सकाळ’ला सांगितला.

आरोग्याच्या तक्रारी वाढल्या

उन्हाचा चटका वाढल्याने भर दुपारी रस्त्यावर असलेल्या बहुतांश लोकांचे पाय शीतपेये विक्रेत्यांच्या दिशेने वळतात. मात्र, यात वापरल्या जाणाऱ्या बर्फाच्या गुणवत्तेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. कारण, बर्फ खाल्यानंतर आरोग्याच्या तक्रारी वाढल्याचे निरीक्षण वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. संतोष जगताप यांनी नोंदविले.

मळमळ, उलट्या, डोकेदुखी, थंडी वाजून ताप येणे अशी सर्रास लक्षणे दिसतात. ‘बर्फ खाल्ला होता का’ असा प्रश्न विचारल्यानंतर ७० टक्के रुग्णांचे उत्तर ‘हो’ असे येते. त्यामुळे बर्फामुळे पुणेकरांच्या आरोग्याच्या तक्रारी वाढल्याचे दिसून येते.

याचे भान ठेवा

उन्हाळ्यात शरीरातील पाण्याची पातळी कायम ठेवण्यासाठी ताक, सरबत, शीतपेय घेण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञ देतात. मात्र, आता आपण काय आणि कुठे पितोय याचे भान नक्की ठेवा, अशी भरही वैद्यकीय तज्ज्ञांनी आपल्या सल्ल्यात घातली आहे.

औद्योगिक बर्फाचे उत्पादन जास्त

शहर आणि परिसरात खाद्य बर्फापेक्षा औद्योगिक बर्फाचे उत्पादन करणाऱ्या कारखान्यांची संख्या जास्त आहे. पण, प्रत्यक्षात उन्हाळ्यात खाद्य बर्फाची मागणी वाढते. त्याचा मागणीप्रमाणे पुरवठा करणे शक्य होत नाही. त्यामुळे बहुतांश वेळा औद्योगिक बर्फ शीतपेयांच्या दुकानांमध्ये वापरला जातो, अशी माहिती बर्फ उत्पादकांनी दिली.

अखाद्य बर्फाला निळा रंग देण्याची मागणी

खाद्य आणि अखाद्य बर्फ ओळखण्यासाठी निळा रंग वापरण्याचा प्रस्ताव २०१८ मध्ये अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) राज्य सरकारला दिला आहे. त्यामुळे खाद्य रंग नैसर्गिक असेल, तर अखाद्य बर्फाचा रंग निळा असेल, असे यात प्रस्तावित केले आहे. मात्र, याबाबत अद्याप निर्णय झाला नसल्याचेही उत्पादकांनी सांगितले.

कसा होतो बर्फ दूषित

  • बर्फाच्या पाण्याबद्दल प्रश्नचिन्ह

  • अस्वच्छ पोत्यातून बर्फाची वाहतूक

  • रस्त्यावर टाकून बर्फ फोडला जातो

  • बर्फ फोडण्यासाठी दगडापासून ते टोकदार लोखंडी साहित्याचा वापर

  • थर्माकोलच्या अस्वच्छ खोक्यात होणारी साठवण

एका ठिकाणाहून बर्फाचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत. यापुढेही नमुने घेण्याच्या सूचना दिल्या असून, नागरिकांनी चांगल्या आणि स्वच्छ ठिकाणी थंड खाद्यपदार्थ घ्यावे. त्याचे बिल आवर्जून घ्यावे. यानंतरही नागरिकांना काही तक्रार करायची असल्यास आमच्या १८००२२२३६५ या टोल फ्री क्रमांकावर करावी.

- सुरेश अन्नापुरे, सहआयुक्त, अन्न व औषध प्रशासन, पुणे विभाग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com