उन्हाळ्यात निसर्गाचा रसरशीत खाऊ (व्हिडिओ)

नीला शर्मा 
सोमवार, 20 मे 2019

उन्हाचा मारा, उष्ण वाऱ्याच्या झळा, घामाच्या धारा असे असतानाही उन्हाळ्याच्या सुटीचा मनमुराद आनंद तर घ्यायचाय. यासाठी निसर्गाने मोहक रंग, सुवास व चवींची लयलूट फळांमधून करून ठेवली आहे. वैविध्यपूर्ण नैसर्गिक खाऊची ही शिदोरी स्वादाबरोबरच आरोग्य जपणारीही आहे.

पुणे - उन्हाचा मारा, उष्ण वाऱ्याच्या झळा, घामाच्या धारा असे असतानाही उन्हाळ्याच्या सुटीचा मनमुराद आनंद तर घ्यायचाय. यासाठी निसर्गाने मोहक रंग, सुवास व चवींची लयलूट फळांमधून करून ठेवली आहे. वैविध्यपूर्ण नैसर्गिक खाऊची ही शिदोरी स्वादाबरोबरच आरोग्य जपणारीही आहे.

खास उन्हाळ्यात मिळणारी करवंदं, जांभळं ही फळं आपल्याला खुणावतात. डाळिंब व कलिंगड खाल्ले की तहान भागते. फळांचा राजा आंबा कोकणातून हापूसच्या रूपात येतो. त्याच्या मधुर वासाचा घमघमाट आपल्याला त्याच्या दिशेनं ओढून नेतो. 

त्याच्या फोडी खाताना, रसाचा आस्वाद घेताना, ‘सुख म्हणजे नक्की हेच असतं,’ असं वाटल्यास नवल नाही.

बच्चे कंपनीनं मुद्दाम उन्हाळ्याच्या सुटीत आपला खाऊ आपणच खरेदी करायची सवय लावून घ्यावी. निसर्गाच्या या खाऊनं भरलेल्या टोळ्यांच्या जगात जावं. मंडई किंवा आठवडे बाजारात फेरफटका मारणं, ताज्या भाज्या आणि फळं पाहणं यातली मौज अनुभवायलाच हवी. आपण जे काय खात आहोत, ते चवीबरोबरच पौष्टिकही आहे ना, याचा विचार करायची सवय लागणं अवघड नाहीच. 

‘सकाळ’च्या बालवाचकांना सोमनाथ, रोहित, मनोज, अमित व अभिजित या फळविक्रेत्या दुकानदारांनी उत्तम फळं ओळखण्याच्या काही युक्‍त्या सांगितल्या आहेत. अन्विषा व अद्वितशी बोलताना हे काका म्हणाले, ‘‘फळ नैसर्गिक पद्धतीने पिकवलेलंच खा. रसायनं वापरून पिकवलेली फळं वेगळीच ओळखू येतात. नैसर्गिकरीत्या पिकवलेल्या व रत्नागिरीहून आलेल्या हापूस आंब्यावर सुरकुत्या दिसतील. देवगड आंब्याच्या देठापाशी खळगा दिसेल. 
कलिंगडावर हाताच्या बोटांनी ठोकून पाहिल्यास टणकपणा आवाजातून कळतो. बद्द वाजणारं कलिंगड वाजवीपेक्षा जास्त पिकल्यानं ते घेऊ नका.

जांभळं कच्ची नकोत व अतिशय मऊ 
पडलेलीही नकोत.’’रसरशीत फळांमधून निसर्ग आपल्याला जीवनसत्त्व व खनिजांचा खजिनाच तर भरभरून देत असतो. निरनिराळ्या चवी व स्वादांच्या या खाऊची तुलना झगमगत्या पाकिटात बंद चटपटीत, पण पौष्टिक मूल्य नसलेल्या पदार्थांशी कशी करायची? या सुटीत आपल्याला आयुष्यभर उपयोगी ठेवणाऱ्या खाऊची सवय सहज लावता येईल. जाहिराती सांगतील तशी खरेदी करण्यापेक्षा स्वतः विचारपूर्वक आरोग्यपूर्ण खाऊ खरेदी करणं शिकूया. उत्तम खाऊ योग्य ठिकाणी जाऊन योग्य दरात खरेदी करणं शिकून घेणंही फार मजेचं ठरू शकतं.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Summer Holiday Mango Fruit Cold