माझेही ऐका

माझेही ऐका
Published on

धग उन्हाची सोसवत नाही...

बघ ना, ऊन कसं हजार पायांनी पसरू लागलं आहे. कोरड्याठाक झालेल्या नदीत कोलांट्या मारत आहे. उन्हामुळे वाळू रणरण तापली आहे आणि त्या वाळूवर खेळणारे ऊन चक्क मोठ्याने हसू लागलं आहे. पांढऱ्या मिशीचे म्हातारबाबा मग डोळ्यावर हात आडवा लावून उन्हाच्या गडगडाटी हसण्याकडे बघत राहतात. त्याचं ते सात मजली हसणं पाहून म्हातारबाबा आम्हाला घरात पिटाळून लावतात. म्हणून मी आता त्या उन्हाला एका डबीत भरून ठेवणार आहे. ऊन असं भरून ठेवलं तर आपोआपच सावली येईल! हो ना आई? उन्हाला असं कोंडून घातल्यावर सावलीचं झाड मग अंगणात रुजत जातं. एरवी शांत असलेली सावली मात्र दंगा करू लागते. नव्हे नव्हे, सावलीने भरलेलं सारं घरच आता दंगा करू लागतं.

आळसावून लोळत पडलेली आजी लुगड्याचा पदर डोक्यावर अजूनच ओढून घेते आणि मिटल्या डोळ्यांनीच आम्हाला घराबाहेर हाकलू पाहते. आंब्याचिंचेची झाडं आता पसा पसा दाट सावली ओतत असतात. धूम तिकडे पळाल्यावर झाडांवर पाखरांना सोबत करायला आमची स्पर्धाच लागते जणू. झाडं मात्र मायेनं जवळ घेतात. अंगाखांद्यावर बागडू देतात. काही दिवसांपूर्वीच्या बाळकैऱ्या आता चांगल्याच करकरीत झालेल्या असतात. आमच्या झोक्यासोबत मग त्याही वाऱ्यासोबत झुलू लागतात. उन्हं उतरणीला येईपर्यंत पोरांचा कल्ला मग सावलीतच रेंगाळलेला असतो.

उन्हाची संगत नको वाटत असली तरी या सावलीची गडद साय त्याच्यामुळेच तर अनुभवता येतेय. ऊन अजून हसतच राहतं. पारावरच्या पिंपळाची कोवळी हिरवी तांबूस पानं लखलखत राहतात उन्हात. बिलोरी आरशासारखी. उन्हाला बांध घालताच येत नाही कधी. पिवळ्या माळावर ते भडाभडा वाहत राहतं. डोळ्यात मावत नाही इतकं सळसळत राहतं. वेड्यासारखं धावत सुटतं. डोंगरावरून... माळावरून... आणि शहरातील उंचच उंच इमारतींवर तर जास्तच नाचू लागतं. रस्ते तापू लागतात भट्टीसारखे. म्हणून मी हे ऊनच भरून ठेवणार आहे मोठ्या डबीत.


आणि हो, जेव्हा कधी गरज पडेल तेव्हा मीच शिंपून येईल जागोजागी हे कोंडून ठेवलेलं ऊन. उन्हाची चार बोटं गव्हाच्या शेतावर शिंपडली की वाऱ्यावर सळसळणाऱ्या ओंब्या सोनपिवळ्या होऊन उठून दिसतील. पडत्या पावसावर उन्हाची धार ओतली की सात रंग लगबगीने धावून येतील. वाकून वाकून गंमत बघतील. कसली गंमत बघतील ते? पडत्या पावसाची की तिरप्या उन्हाची? वाकून बघताना कमानच होईल मग रंगांची, केवढी गंमत होईल मग. उन्हाला आता थोडं मातीखाली पाठवेल म्हणतो.

जमिनीखाली बियांमध्ये झोपलेली हिरवी कोवळी रोपं त्याच्या आवाजानेच तर उठतात ना, आई? पाण्याखालच्या मासोळ्या चमचम करण्यासाठी... पानाफुलांवरचे देवथेंब लखलखण्यासाठी... उन्हाचे काही पाझर नक्की मोकळे करेन मी... पण तोवर हे ऊन डबीत भरून ठेवणार आहे. उन्हाची धग सोसवत नाहीये पक्ष्यांना, प्राण्यांना आणि माझ्यासारख्या उनाड मुलांना!

- वैशाली सूर्यवंशी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, खालप ता. देवळा जि. नाशिक (९४०३४०९६७७)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com