esakal | Sakal - Read Latest Breaking Marathi News from Maharashtra India & Around the World
sakal

बोलून बातमी शोधा

सुनिल केदार

राज्याच्या नावलौकीकात भर घालणारे क्रीडा विद्यापीठ उभारणार : सुनिल केदार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औंध : खेळाडूंसाडी व एकूणच क्रिडाप्रकारातील सर्वोत्तम अभ्यासक्रम असलेले आणि देशाला अभिमान वाटेल असे आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ उभारण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री सुनिल केदार यांनी केले.म्हाळुंगे-बालेवाडी येथे क्रीडा व युवक सेवा संचालनालयातर्फे आयोजित आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाच्या नियामक परिषद सदस्यांच्या पहिल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा, क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे आयुक्त ओम प्रकाश बकोरिया उपस्थित होते.'नियामक परिषदेतील सर्व सदस्य आपल्या क्षेत्रात तज्ज्ञ असून त्यांच्या अनुभवाचा फायदा क्रीडा विद्यापीठाच्या उभारणीत होईल.

हेही वाचा: राज्याचा मोठा निर्णय; आमदारांना मिळणाऱ्या विकासनिधीमध्ये वाढ

जागतिक पातळीवर कौतुक होईल असे आणि राज्याच्या नावलौकीकात भर घालणारे क्रीडा विद्यापीठ उभारण्यात येणार आहे. त्यात खेळाडूंसाठी सर्वोत्तम अभ्यासक्रम सुरू करण्याचे प्रयत्न असून त्या संदर्भात युजीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात येईल. तसेच सर्व अडचणींवर मात करीत राज्याचे नाव उंचावणारे विद्यापीठ उभारण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न केले जातील अशी ग्वाही क्रिडा मंत्री सुनील केदार यांनी दिली. तर क्रीडा क्षेत्रात रोजगाराच्या अनेक नवीन संधी उपलब्ध आहेत. या आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाच्या माध्यमातून उत्तम खेळाडू व चांगले मार्गदर्शक घडविले जातील असा विश्वासही केदार यांनी व्यक्त केला.

आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ उभारण्याचा राज्य सरकारचा निर्णय कौतुकास्पद असल्याचे मत नियामक परिषदेच्या सदस्यांनी व्यक्त केले. तसेच पुढील पाच वर्षाचा विचार करून हे क्रिडा विद्यापीठ जागतिक पातळीवरील विद्यापीठ व्हावे अशी अपेक्षा सदस्यांनी व्यक्त केली.या बैठकीस भारतीय संघाचे माजी गोलकीपर व तांत्रिक समितीचे उपाध्यक्ष हेन्री मेनेझिस, आंतरराष्ट्रीय रग्बी खेळाडू राहुल बोस, सिम्बॉयसिसच्या प्र.कुलगुरू विद्या येरवडेकर, प्रा.रत्नाकर शेट्टी, आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू निलेश कुलकर्णी, प्राचार्य डॉ. अंजली ठाकरे, सहसंचालक चंद्रकांत कांबळे आदी उपस्थित होते.

यावेळी क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांच्या हस्ते टोकियो ऑलिम्पिक २०२० मधील सहभागी खेळाडूंचा सत्कार आणि एशियन गेम्स जकार्ता २०१८ मध्ये ब्रीज खेळातील पदक प्राप्त खेळाडू व क्रीडा मागर्दशकांचा रोख पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला.या कार्यक्रमास राज्यमंत्री अदिती तटकरे या व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे उपस्थित होत्या.

loading image
go to top