ब्रिटिश काळातही पुण्यातल्या पेठा रिकाम्या केल्या होत्या; वाचा इंटरेस्टिंग इतिहास 

ब्रिटिश काळातही पुण्यातल्या पेठा रिकाम्या केल्या होत्या; वाचा इंटरेस्टिंग इतिहास 

इतिहासाचे अवजड ओझे,
डोक्यावर घेऊन ना नाचा
करा पदस्थल त्याचे आणिक,
चढुनी त्यावर भविष्य वाचा...

विंदा करंदीकर यांच्या कवितेतल्या या ओळींची आठवण आली ती कोरोना विषाणूच्या पुण्यातील पेठांमधल्या अन झोपडपट्ट्यांमधल्या धुमाकुळावर योजण्यात आलेल्या रामबाण उपायानं. पेठांमधली दाट वस्ती, त्यात एका आठ  बाय दहाच्या घरात दहा--बारा जणं राहताहेत. त्यांनी ठरवलं तरी त्यांना एकमेकांपासनं तीन-चार मीटर अंतरावर राहता येत नाहीये.  मुख्य रस्ते बॅरिकेडनं बंद केले तरी आतल्या गल्ल्यांमध्ये फिरता येतयं. मोमीनपुऱ्यासारख्या भागात तर त्या छोट्या गल्ल्यांच्या तोंडावरच बॅरिकेड उभी केली असली तरी आतल्या एका घराला चिकटून दुसरं घर असल्यानं शेजाऱ्याचा त्याच्या शेजाऱ्याशी आणि त्या शेजाऱ्याचा त्याच्या शेजाऱ्याशी सहजी संपर्क  होतोय. बरं, पेटणाऱ्या उन्हात एकमेकांजवळ चोवीस तास अन तीस दिवस नुसतं बसून राहणं शक्यच नाही. मग भाजी--दूध खरेदीच्या वेळेत आणि रात्री आग ओकणारा सूर्य शांत झाल्यावरही माणसंं थोडंस फिरणारच... मग अशा वेळी एखाद्या घरात सर्दी-खोकल्यासारखी आजाराची  लक्षण दिसताच  त्याला आणि  आजूबाजूला राहणाऱ्यांना तपासणीला नेलं जातं.  तो पॉझिटिव्ह आढळला तर वस्तीच्या त्या भागाची कडक तपासणी  केली जाते खरी, पण तोपर्यंत या मंडळींकडून  नकळत कोरोनाची लागण आणखी काहींना झालेली असते आणि काही काळानं त्यापैकी काही जणांना त्रास होऊ लागतो.

हे झालं लक्षण दिसत असलेल्या रूग्णांबाबत, पण भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेच्या म्हणजेच आयसीएमआरचे प्रमुख असलेल्या डॉ.  रमण  गंगाखेडकर यांच्या म्हणण्याप्रमाणं साठ टक्क्यांवर रूग्णांना कोणतीच लक्षण दिसत नाहीत. (हे गंगाखेडकर कोण, ते पुणेकरांपैकी अनेकांना आठवत  असतील. पुण्याच्या एड्सच्या प्रकल्पाचे अधिकारी म्हणून ते  नव्वदीच्या दशकात काम करत होते अन शिवाजी रस्त्यावरच्या गाडीखान्यात बसत होते. आता केंद्रातील मोदी सरकारची कोरोनाबाबतची धोरणं ठरवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे.)  आता लक्षणं न दिसताच कोरोना बाळगणाऱ्यानं लक्षण दिसेपर्यंतच्या काळात किती जणांना बाधित केलंय, ते तर कल्पनेच्या बाहेरचं आहे. त्यामुळंच या दाट वस्तीत कोरोना थैमान घालू लागला आहे आणि प्रशासन हतबल ठरत असल्याचं दिसू लागलं आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

यांवर उपाय काय...  कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासनानं काहीच  केलं नाही, असं कुणीच  म्हणणार नाही. हाताशी असलेल्या साधनांनिशी, मनुष्यबळानिशीप्रशासनानं अनेक पावलं उचलली. महापालिकेनं सात-आठ लाख पुणेकरांची घरोघर जाऊन विचारपूस केली अन कोणाला त्रास होतो आहे का, याची प्रश्नावली भरून घेतली. पोलिसांनी लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यात कोणतीच कसर ठेवली नाही. पुणं सील केलं, पेठांच्या  भागांना कडेकोट कुंपण घातलं, राज्य सरकारच्या यंत्रणेनं चाचणी संच अन अन्य पाठबळ पुरवलं....पण तरीही...

तरीही काही फटी राहिल्याचं, काही हाती असणारी अन काही हाती नसणारी काही आव्हानं शड्डू ठोकून पुढं उभी राहिली. त्यामुळं देशाच्या नकाशावर मुंबई, दिल्लीप्रमाणंच पुणं हाही हॉटस्पॉट दिसू लागला, राज्यात मुंबईपाठोपाठची  लागण पुण्यात झाली. त्यानं बाधितांचा आकडा भराभर हजाराच्या  पुढं सरकला, मृतांच्या संख्येनं पन्नासचा आकडा पार केला, पिंपरी आणि ग्रामीण भाग मिळून तो 80 वर गेला. रूग्णांची संख्या दुप्पट होण्याचा वेग देशात नऊ-दहा दिवस असताना पुण्यात अवघ्या सात दिवसांत रूग्णसंख्या दुप्पट झाली. त्यामुळंच कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याचा पु्ण्यातील वेग देशात सर्वाधिक असल्याचं केंद्रीय पथकानं जाहीर केलं.

घरातच राहा..., हा संदेश टीव्ही, वृत्तपत्रं, ई वृत्तपत्रं आणि सोशल मीडियापर्यंतचे सगळे देत असताना आणि त्याचं बऱ्याच अंशी पालन होत असताना संसर्ग कमी झाला, पण चालूच राहिला. चोवीसपैकी दोन तास खरेदीसाठी घराबाहेर पडण्याची सवलत असल्यानं त्या दोन तासांत एकमेकांना खेटून खरेदी होत असल्याचे रविवार पेठेपासनं ते कोंढव्यापर्यंतचे व्हिडिओ आपण पाहात  होतो. या दोन तासांत संसर्गाची देवाण-घेवाण करून  मग मंडळी बावीस तास घरात बसली तरी त्या दोन तासांच्या जोरावर कोरोना पुढं सरकत गेला. झोपडपट्ट्यांच्या छोट्या गल्ल्यांमध्ये फिरताना नाईलाजानं एकमेकांजवळूनच जावं लागत असल्यानं तिथंही संसर्ग होत गेला. दुसरा प्रश्न खरं म्हणजे  राष्ट्रीय प्रश्न आहे आणि तो म्हणजे चाचण्यांच्या संख्येचा. त्रास होऊ लागलेल्या व्यक्तीच्याच घशातला स्त्राव घेऊन त्याची तपासणी करण्याची सर्वोत्तम पद्धत किती संख्येनं वापरता येईल, याला मर्यादा होती आणि ही मर्यादाच काळ म्हणून पुढं उभी राहिली. ही सर्वोत्तम पद्धत कोणत्याही शहरातल्या सर्वच नागरिकांसाठी वापरणं अपेक्षित नसलं तरी किमान हॉट स्पॉटमधील लक्षणहीन रहिवाशांसाठी, दणादण रूग्ण आढळत असलेल्या एखाद्या संपूर्ण वस्तीसाठी तरी वापरणं योग्य ठरलं असतं, असं

तज्ज्ञ सांगतात. या चाचणीच्या यंत्रणेचा अपुरेपणाही भोवला आहे. आपल्याला अमेरिकेशी तुलना करता येणार नाही कारण त्या देशातील कोरोना विषाणूची तीव्रता आपल्यापेक्षा कितीतरी पटीनं अधिक आहे. पहिल्या पाच लाख चाचण्यांमध्ये अमेरिकेतील बाधितांची संख्या होती 80 हजार, ब्रिटनची एक लाख, इटलीची एक लाख 20 हजार आणि भारतातील केवळ 20 हजार, पण तरीही काही आकडे पाहायला हवेत. अमेरिकेत चाचण्या  झाल्या सुमारे 58 लाख आणि भारतात सात लाखांच्या आसपास. अमेरिकेत पन्नास हजारांवर माणसं आतापर्यंत मृत्यूमुखी पडली असून आपल्याकडे ती संख्या आतापर्यंत एकदम मर्यादित म्हणजे एक हजारच्या आसपासच आहे, हे मान्य करूनही भविष्यकाळातील दक्षता म्हणून चाचण्यांची ही संख्या वाढायला हवी, ही गरजही नमूद करायला हवी. याचं कारण ज्या गतीनं आता रूग्णसंख्या वाढते आहे, ती पाहता मे महिन्याच्या मध्यापर्यंत ती एक लाखाचा आकडा ओलांडू शकते.

महाराष्ट्रापुरतं आणि मग पुण्यापुरतं बोलायचं तर काही गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात. महाराष्ट्रातील सुमारे साडेनऊ हजार बाधितांपैकी (बुधवारपर्यंतचा आकडा)  मुंबई-पुण्याच्या पट्ट्यातच साडे आठ हजार रूग्ण आहेत. म्हणजेच एकूण बाधितांपैकी सुमारे आठशेच रूग्ण उर्वरित महाराष्ट्रात आहेत. याचाच अर्थ पुणे-मुंबईत आपली ताकद एकवटली तर महाराष्ट्र कोरोनाच्या विळख्यातून बाहेर येऊ शकतो. मग या दोन शहरांतील चाचण्यांची संख्या वाढवायला काय  हरकत आहे.

मुंबईच्या धारावीसारख्या भागात आणि पुण्याच्या भवानी पेठेसारख्या भागात, जिथं सर्वाधिक रूग्ण आहेत तिथे सरसकट वस्तीची चाचणी घेतली तर आगामी संसर्ग टळू शकेल. आता आपण लेखाच्या सुरूवातीला म्हटलेल्या विंदांच्या कवितेकडे म्हणजेच आता योजल्या जात असलेल्या रामबाण उपायाकडं वळू. रावणाविरोधात सर्व अस्त्रे वापरून झाल्यावर रामानं ब्रह्मास्त्र हाती घेतलं तसंच काहीसं हे झालंय. विंदा म्हणतात इतिहासाला ओझं करू नका तर त्याला पायाखाली घेऊन त्यावर चढून भविष्यात डोकवा, वर्तमानात कसं वागायचं, ते पाहा. इतिहासाची पुनरावृत्ती होत असते, हिस्ट्री रिपीट्स असं म्हणतात. इतिहास काय सांगतो... पुण्यात आतापर्यंत प्लेगच्या साथी अनेक वर्षे आल्या, एन्फ्लुएंझा म्हणजे फ्ल्यूची साथ आली. त्यावेळी ब्रिटिश सरकारनं केलेल्या आवाहनानुसार पुण्याच्या पेठांमधील रहिवासी फर्ग्युसनच्या मैदानावर झोपड्या उभारून त्यात राहायला जायचे. इतिहासाचे अभ्यासक मंदार लवाटे यांनी यूट्युबवर याबाबतची तपशीलवार माहिती दिली आहे. त्यांच्या माहितीनुसार मुंबईत 1896 मध्ये आलेला प्लेग 1897 च्या जानेवारीत पुण्यात आला.  ब्रिटिश सरकारनं पुणेकरांच्या तपासण्या सुरू केल्या. बाधित व्यक्तींना संगमावरच्या  रुग्णालयात म्हणजे आताच्या नायडू रूग्णालयात हलवले जायचे (हो... आताही कोरोनाचे पुण्यातील पहिले काही शे रूग्ण नायडूमध्येच हलवले...कारण संसर्गजन्य रोगांसाठीचं गावाबाहेरचं ते रूग्णालय  आहे...  इतिहासाची पुनरावत्ती...)  रूग्णांना संगमावरच्या रूग्णालयात आणि इतरांना स्वारगेटजवळच्या छावणीत हलवण्यात येई. बाधित व्यक्तीचं घर खणून काढून चीजवस्तू जाळून टाकल्या जात. मृतदेहांची संख्या वाढू लागली तशी त्यावेळच्या ओंकारेश्वरच्या स्मशानात नेण्याऐवजी घराजवळच त्यांना लोक पुरू लागले. काही मृतदेह तर झाडांवरच सोडले जात. नाती-गोती, प्रेम काहीच उरलं नाही, असा उल्लेख केसरीत आढळल्याचं लवाटे नमूद करतात.

पुढे सुमारे 1950 पर्यंत प्लेगची साथ येत-जात होती आणि वर्षातले ऑगस्ट ते फेब्रुवारी हे सहा महिने वस्ती खाली करून गावाबाहेर राहायला जायचे आणि  नंतरचे सहा महिने आपल्या घरी परतायचे, ही बाब पुणेकरांच्या अंगवळणी पडली होती जिवंत किंवा मेलेला उंदीर आणून दिला की ब्रिटिश सरकार रूपया बक्षीस देत असे. त्यामुळे उंदरांमुळं प्लेग होतो आणि स्वच्छता राखली की उंदीर येत नाहीत, हे हळूहळू नागरिकांना कळू लागले. त्यानंतर प्लेगची साथ ओसरत गेली. ... हा इतिहास थोडा विस्तारानं सांगण्याचं  कारण असं की आता कोरोनाच्या फैलावावरचा तोच ऐतिहासिक रामबाण उपाय  योजण्यात येणार असल्याचं जाहीर झालंय. प्लेगच्या साथीच्या वेळीही पुणं मुख्यतः आता कोरोना पसरलेल्या पेठांपुरतंच मर्यादित होतं आणि आताही प्रश्न त्याच भागाचा आहे. त्यामुळं इतिहासात केलेलाच इलाज करायचा, या दाट वस्तीवरचा भारच हलका करायचा. त्यामुळं सामाजिक-शारीरिक अंतर राखलं जाईल. याचबरोबर या हलवण्यात येणाऱ्या 71 हजार घरांतल्या साडेतीन लाख जणांची संपूर्ण तपासणी करण्याची जोडही त्याला दिली पाहिजे....

... वास्तविक, पेठा खाली करण्याचा उपाय करण्यास थोडा उशीरच झाला आहे. हा उपाय योजा, असं अनेक तज्ज्ञ गेले काही आठवडे औपचारिक-अनौपचारिकरित्या सांगत होते. तरीही देर आये, दुरूस्त आये... या रामबाणाची अंमलबजावणी
शिस्तबद्धरित्या करण्याकडे आता लक्ष द्यायला हवे. सध्याच्या प्रशासकीय वर्गाच्या क्षमतेवर कोणताही संशय न घेताही त्यांना आणखी काही आयएएस अधिकाऱ्यांची जोड देण्याची सूचनाही शेवटी का होईना, पण मान्य झाली आहे. पुण्यातील बाधितांची आणि बळींची संख्या आणखी वाढण्याआधी, कोरोनानं आपल्या अक्राळविक्राळ यमज्वाळा अधिक तीव्रतेनं पसरवण्याआधी या जाहीर घोषणा प्रत्यक्षात येतील, अशी आशा करूयात...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com