भोसरीत सुपर स्पेशालिटी रुग्णसेवा

पीतांबर लोहार
सोमवार, 21 जानेवारी 2019

पिंपरी - शहरातील नागरिकांना सुपर स्पेशालिटी वैद्यकीय सुविधा मिळाव्यात, या उद्देशाने महापालिकेने भोसरीत सुसज्य रुग्णालयासाठी प्रशस्त इमारत उभारली आहे. त्यात पिंपरीतील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात (वायसीएम) सध्या दिल्या जाणाऱ्या १६ प्रकारच्या स्पेशालिटी वैद्यकीय सुविधांसह न्यूरोलॉजी, प्लॅस्टिक सर्जरी, अशा सुपर स्पेशालिटी प्रकारातील तब्बल दहा सुविधा जास्तीच्या मिळणार आहेत.

पिंपरी - शहरातील नागरिकांना सुपर स्पेशालिटी वैद्यकीय सुविधा मिळाव्यात, या उद्देशाने महापालिकेने भोसरीत सुसज्य रुग्णालयासाठी प्रशस्त इमारत उभारली आहे. त्यात पिंपरीतील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात (वायसीएम) सध्या दिल्या जाणाऱ्या १६ प्रकारच्या स्पेशालिटी वैद्यकीय सुविधांसह न्यूरोलॉजी, प्लॅस्टिक सर्जरी, अशा सुपर स्पेशालिटी प्रकारातील तब्बल दहा सुविधा जास्तीच्या मिळणार आहेत.

महापालिकेचे शहरात आठ रुग्णालये व २७ दवाखाने आहेत. त्यातील वायसीएम रुग्णालय महत्त्वाचे आहे. महापालिकेची अन्य रुग्णालये व दवाखान्यांमधून पुढील उपचारासाठी रुग्ण वायसीएममध्ये पाठविले जातात. तसेच, लगतच्या ग्रामीण भागातील रुग्णही वायसीएममध्ये उपचार घेण्यासाठी येतात. कारण, येथे सर्जन, फिजिशयन, कार्डीओलॉजिस्ट, टीबी ॲण्ड चेस्ट फिजिशयन यांच्यासह स्त्रीरोग, कान-नाक-घसा, क्ष किरण, भूल, अस्थिरोग, त्वचा व गुप्तरोग, बालरोग आदी स्पेशालिटी प्रकारातील तज्ज्ञ डॉक्‍टर उपलब्ध आहेत. त्यांना आता सुपर स्पेशालिटी तज्ज्ञांची साथ मिळणार आहे. कारण, भोसरीतील रुग्णालय वायसीएमपेक्षाही सुसज्ज असेल. तिथे १६ प्रकारच्या स्पेशालिटी आणि दहा प्रकारच्या सुपर स्पेशालिटी वैद्यकीय सुविधा मिळणार आहेत. त्यात न्यूरोलॉजी, प्लॅस्टिक सर्जरी, कार्डीओ-थोरॅसिस, न्यूप्रोलॉजी, ऑन्कोलॉजी, एंडोक्रिनॉलॉजी, गॅस्ट्रो एंट्रोलॉजी, युरो सर्जरी, व्हॅस्क्‍युलर सर्जरी, पेडिएट्रिक सर्जरी यांचा समावेश आहे. सामान्य रुग्णांना सहजपणे वैद्यकीय सुविधा मिळाव्यात, यासाठी महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत रुग्णालयाची नोंदणी केली जाणार आहे. महापालिका हद्दीतील पिवळे व केसरी रेशनकार्ड व आधार कार्डधारक रुग्णांना मोफत वैद्यकीय सेवा व ३६८ प्रकारची औषधेही मोफत दिली जाणार आहेत. तसेच, रुग्णालयात जनऔषधी स्टोअर्स असेल. 

महापालिकेने भोसरीत उभारलेले सुपर स्पेशालिटी रुग्णालय सर्वसामान्य रुग्णांसाठी उपयुक्त ठरणार आहे. मात्र, वायसीएमप्रमाणे ते स्वतः चालवायला हवे. डॉक्‍टर व कर्मचारी दीर्घकाळ सेवेत टिकावेत व त्यांच्याकडून रुग्णांना चांगली सेवा मिळावी, यासाठी त्यांच्याकडे नोकर म्हणून बघू नये. वरिष्ठ व पदाधिकाऱ्यांकडून चांगली वागणूक व अन्य खासगी रुग्णालयांप्रमाणे वेतनश्रेणी मिळावी. 
- डॉ. रोहिदास आल्हाट, स्त्रीरोग व प्रसूतीतज्ज्ञ, वात्सल्य हॉस्पिटल, भोसरी.

डॉक्‍टर्स व कर्मचारी
वैद्यकीय अधीक्षक, डर्माटोलॉजिस्ट, कान-नाक-घसा तज्ज्ञ, नेत्रतज्ज्ञ, रेडिओलॉजिस्ट, मानसोपचार तज्ज्ञ, नेफ्रॉलॉजिस्ट, कार्डीओलॉजिस्ट, ऑन्कोलॉजिस्ट, एंडोक्रिनोलॉजिस्ट, न्यूरोलॉजिस्ट, गॅस्टोएंटेरोलॉजिस्ट व पॅथॉलॉजिस्ट प्रत्येकी १; शल्यचिकित्सक व अस्थिरोगतज्ज्ञ प्रत्येकी २; फिजिशियन, भूलतज्ज्ञ व आयुश फिजिशयन प्रत्येकी ३; वैद्यकीय अधिकारी ९ आणि निवासी वैद्यकीय अधिकारी १०, असे एकूण ४५ तज्ज्ञ डॉक्‍टर्स भोसरी रुग्णालयात असतील. पॅरामेडिकल व अन्य कर्मचाऱ्यांमध्ये परिचारिका ५०, सिस्टर इन्चार्ज व फार्मासिस्ट प्रत्येकी ६, वॉर्डबॉय ४०, प्रयोगशाळा तंत्रज्ञ ५, प्रयोगशाळा सहायक, रेडिओग्राफर व एक्‍स रे टेक्‍निशियन प्रत्येकी ३, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता व डायलिसिस टेक्‍निशियन प्रत्येकी २, नेत्रतज्ज्ञ सहायक, इसीजी टेक्‍निशियन, ऑडिओमेट्रीशियन, डाएटीशियन, फिजिओथेरपिस्ट, वैद्यकीय अभिलेख तंत्रज्ञ प्रत्येकी एक, अशा १२६ जणांचा समावेश असेल.

Web Title: Super Speciality Patient Service in Bhosari