esakal | पुणे : म्युकरमायकोसिसवरील औषधांचा रुग्णालयांना पुरवठा सुरू
sakal

बोलून बातमी शोधा

 After corona Mucormycosis

पुणे : म्युकरमायकोसिसवरील औषधांचा रुग्णालयांना पुरवठा सुरु

sakal_logo
By
अनिल सावळे

पुणे : म्युकरमायकोसिस (काळी बुरशी) (black fungus) आजारावरील इंजेक्शनचा पुरवठा रुग्णालयांना करण्यास जिल्हा प्रशासनाने गुरुवारी सुरुवात केली. जिल्ह्यातील ३४ रुग्णालयांनी म्युकरमायकोसिसच्या ३१० रुग्णांसाठी अॅम्फोटेरेसिन-बी आणि इतर इंजेक्शनची मागणी नोंदवली. परंतु जिल्हा प्रशासनाला पहिल्या दिवशी गुरवारी केवळ १०८ इंजेक्शन वितरित करणं शक्य झालं. प्रत्यक्षात पुरेशा प्रमाणात ही इंजेक्शनच उपलब्ध नसल्यामुळे गंभीर स्थिती ओढवली आहे. (Supply of medicines for mucormycosis to Pune hospitals)

हेही वाचा: राज्याच्या कोरोना रुग्णसंख्येत घट, रिकव्हरी रेट 91 टक्क्यांवर

कोरोनाबाधित रुग्णांना बरे होताना काहीजणांना म्युकरमायकोसिस आजाराला सामोरे जावे लागत आहे. म्युकरमायकोसिसवरील इंजेक्शनचा पुरवठा केंद्र सरकारकडून राज्य सरकारला करण्यात येतो. त्यानंतर राज्याकडून जिल्ह्याला इंजेक्शनचा पुरवठा केला जातो. परंतू, जिल्ह्यातील रुग्णसंख्येच्या तुलनेत या इंजेक्शनचा पुरवठा कमी होत आहे. गैरप्रकार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने म्युकरमायकोसिसवरील इंजेक्शन रुग्णालयांना पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहेत. त्यानुसार दररोज रुग्णालयांना इंजेक्शनचा पुरवठा करण्यात येणार आहे. पहिल्या दिवशी जिल्ह्यातील ३४ सरकारी आणि खासगी रुग्णालयांकडून ३१० इंजेक्शनची मागणी नोंदविण्यात आली. या रुग्णालयांना १०८ इंजेक्शनचे वितरण करण्यात आले. एका रुग्णाला दररोज सरासरी सहा ते दहा इंजेक्शनची गरज भासते. त्यामुळे ते मोजक्या रुग्णांनाच उपलब्ध होणार आहेत.

एक जूनपासून पुरेसा पुरवठा शक्य

म्युकरमायकोसिस हा दुर्मिळ आजार होता. त्यामुळे औषध कंपन्यांनी त्यावरील इंजेक्शनचे उत्पादन कमी केले होते. अचानक मागणी वाढल्यानंतर कंपन्यांनी या औषधाचे उत्पादन पुन्हा सुरू केले आहे. राज्य सरकारने केंद्राकडे एक लाख ९१ हजार इंजेक्शनची मागणी नोंदविली आहे. येत्या एक जूनपासून या इंजेक्शनचा पुरेसा पुरवठा शक्य होइल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

गैरप्रकार रोखण्याचा प्रयत्न सुरु

"म्युकरमायकोसिसवरील उपचारासाठी सध्या अॅम्फोटेरेसिन-बी इंजेक्शन पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाहीत. या आजारावरील इतर तीन-चार प्रकारची औषधेही ताब्यात घेण्यात येत आहेत. जिल्हा प्रशासनाकडून या औषधांच्या वितरणातील गैरप्रकार रोखण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे," अशी माहिती अतिरिक्त जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख यांनी दिली.

loading image