पुणे : निलंबित पोलिस अधिकाऱ्याच्या पत्नीचा आत्महत्येचा प्रयत्न

पांडूरंग सरोदे
गुरुवार, 11 एप्रिल 2019

पुणे : पोलिसांकडे दाखल तक्रारीबाबत चौकशी करण्याकडे दुर्लक्ष करत असल्याच्या कारणावरुन एका निलंबित पोलिस अधिकाऱ्याच्या पत्नीने गुरूवारी सकाळी साडे नऊ वाजता हडपसर पोलिस ठाण्यासमोर अंगावर रॉकेल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

पुणे : पोलिसांकडे दाखल तक्रारीबाबत चौकशी करण्याकडे दुर्लक्ष करत असल्याच्या कारणावरुन एका निलंबित पोलिस अधिकाऱ्याच्या पत्नीने गुरूवारी सकाळी साडे नऊ वाजता हडपसर पोलिस ठाण्यासमोर अंगावर रॉकेल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. संबंधित महिलेविरुद्ध हडपसर पोलिस ठाण्यात आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. 

प्रेरणा दत्तात्रय मदने असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या महिलेचे नाव आहे. मदने यांनी हडपसर पोलिस ठाण्यामध्ये तीन एप्रिलला वाहतूक शाखेतील एका पोलिस कर्मचाऱ्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. संबंधित पोलिस कर्मचाऱ्यावर कारवाई करावी, असे त्यांनी अर्जामध्ये नमूद केले होते. याप्रकरणी पोलिस दुर्लक्ष करत असल्याच्या कारणावरुन मदने यांनी गुरूवारी पोलिस ठाणे गाठले. त्यानंतर त्यांनी अंगावर रॉकेल ओतुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र तेथील पोलिसांनी त्यांना वाचवून रुग्णालयामध्ये हलविले. 

हडपसर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुनील तांबे यांनी याबाबत दिलेल्या माहितीनुसार, मदने यांचे पती दत्तात्रय मदने यांच्याविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात एका महिलेने तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी फिर्यादी दिली होती. त्यावरुन मदने यांना पोलिस प्रशासनाने निलंबित केले होते.संबंधीत प्रकरणातील फिर्यादी महिलेचा भाऊ वाहतुक शाखेमध्ये पोलिस कर्मचारी आहे. त्या कारणामुळे मदने यांच्या पत्नीने त्या पोलिस कर्मचाऱ्याने आपल्यावर अत्याचार केल्याची तक्रार दिली. त्याबाबत आम्ही सीसीटीव्ही, तोंडी पुराव्यांद्वारे चौकशी केल्यानंतर संबंधीत तक्रार खोटी असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे आता मदने यांच्याविरुद्धच आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

Web Title: Suspended police officer's wife attempted suicide