Farmer Agitation | स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Farmer Agitation
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

वालचंदनगर - कृषी पंपाचा वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी भवानीनगर (ता. इंदापूर) येथे सुरु असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलक अचानक बारामतीच्या दिशेने निघाल्याने वालचंदनगर पोलिसांनी सुमारे २५ आंदोलकांना ताब्यात घेतले.

भवानीगरमध्ये आज गुरुवार (ता. २५) रोजी शेतकरी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचा बंद केलेला वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी आंदोलन सुरु होते. आंदोलनामध्ये छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अमरसिंह कदम, क्रांतीसिंह नाना पाटील बिग्रेड शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग रायते, संभाजीराव काटे, राजेंद्र सपकळ, नानासाहेब निंबाळकर, दत्तात्रेय वनवे, प्रकाश घोळवे, सुहास भोईटे, अशोक काळे, राहुल काळे, यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. यावेळी जाचक यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना वीज, पाणी व शेतीमालाच्या चांगला भाव मिळणे गरजेचे आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगला भाव मिळत नाही. जोपर्यंत शेतकऱ्यांनी संघटित होत नाहीत तोपर्यंत शेतकऱ्यांचे प्रश्‍न सुटणार नाहीत. गुजरातमध्ये उसाला तीन ते साडेतीन हजार रुपये प्रतिटन भाव मिळत आहे. गुजरातमध्ये साखर कारखानदारीमध्ये खासदार व आमदारांचा हस्तक्षेप नसतो.

हेही वाचा: राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या घरासमोर शेतकरी संघटनेचा ठिय्या

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना शेती परवडत नसून महाराष्ट्रात सध्या गुजरात पॅटर्नची मोठी चर्चा आहे. सध्या वीजपुरवठा खंडीत करुन शेतकऱ्यावर अन्याय केला जात असल्याचे जाचक यांनी सांगितले. यावेळी अमरसिंह कदम म्हणाले, जोपर्यंत शेतकऱ्यांच्या शेतीपंपांचा वीज पुरवठा सुरळीत करण्यात येत नाही तोपर्यंत शेतकरी संघटना आंदोलन करणार आहे. शेतकरी संघटित नसल्यामुळे शेतकऱ्यांचे शोषण होत असून शेतीमालाच्या उत्पादन खर्चामध्ये वीज बिल धरले जात नाही तोपर्यंत शेतकरी महावितरणला वीज बिल देणे लागत नसल्याचे सांगितले. भाषणे संपल्यानंतर रास्तारोको करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.

मात्र, जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश असल्याने जमावबंदीचा व रास्तारोको करण्यास पोलिसांनी परवानगी दिली नाही. शेतकरी संघटनेचे अमरसिंह कदम यांच्या नेतृत्वाखाली सुमारे २५ शेतकऱ्यांनी अचाने जोरदार घोषणाबाजी करुन काटेवाडी मधील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरासमोर व बारामतीमधील उर्जा भवनाच्या समोर आंदोलन करण्याचा निर्णय घेवून काटेवाडीकडे जात असताना काटेवाडीमध्ये शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेवून वालचंदनगर पोलिस ठाण्यामध्ये आणले.

यासंदर्भात वालचंदनगर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक नितीन लकडे यांनी सांगितले, शेतकरी संघटनेचे शिष्टमंडळ व महावितरणचे अधिकारी यांच्यामध्ये चर्चा घडवून तोडगा काढण्यात येणार असल्याचे सांगितले.

loading image
go to top