पाच मुलींकडून वजीर सुळका सर

sachin-tupe
sachin-tupe

पुणे - दुर्गम परिसर, उंच टेकड्या, घनदाट जंगल, निसरडी गवताळ पाऊलवाट, दोन्ही बाजूस खोल दरी यातून मार्ग काढत अवघ्या नऊ वर्षांच्या स्वानंदी तुपेसह पाच मुलींनी ठाणे जिल्ह्यातील वजीर सुळका सर केला. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्‍वभूमीवर ‘बेटी पढाओ, बेटी बचाओ’चा संदेश देण्यासाठी ही मोहीम राबविण्यात आली. आठ वर्षांच्या आर्यन बेनकरचा मोहिमेत समावेश होता.

वजीर सुळक्‍याच्या पायथ्याशी पोचण्यासाठीसुद्धा वांद्रे गावातून तीन तासांचे अतिशय खडतर पदभ्रमण करून पोचावे लागते. त्याच्या पूर्वेकडील दरीचा उतार ६०० फुटांचा आहे. हा सुळका सर करण्यासाठी कुंजीरवाडी येथून प्रवासास सुरुवात करण्यात आली.

मोहिमेचा लीडर अनिल वाघ याने लीड क्‍लायंबिंग सुरू केले. पहिला टप्पा, दुसरा टप्पा पार करीत अनिल वर जाऊ लागला. संदीप अजबे याने त्याला बिले दिला. अनिलने सर्व कठीण टप्पे सहज पार करीत वजीरच्या माथ्यावर पाऊल ठेवले. त्यानंतर स्वानंदी सचिन तुपे या नऊ वर्षांच्या चिमुरडीने वजीर माथ्यावर पाऊल ठेवले. त्या ठिकाणी तिरंगा ध्वज फडकविला आणि राष्ट्रगीत गायले. या मोहिमेतील काही सदस्य दीड ते दोन तासांचे प्रस्तरारोहण करून माथ्यावर पोचले. या मोहिमेत सचिन तुपे, पंडित झेंडे, करिष्मा राणा, डॉ. मनीषा सोनावणे, प्रियांका चव्हाण, आरती शिंदे, स्नेहा सुरवसे, महेश पवार, गिरीश डेंगाने, श्रीतीज भावसार, सागर कारंडे, रोहित जाधव, तुषार होले, आर्यन बेनकर, संदीप तुपे, अमोल धुमाळ, राजेंद्र गायकवाड यांनी सहभाग घेतला.

याआधी मी कोकणकडा चढले होते. माझ्यासाठी वजीर चढण कठीण वाटत होती. सुरुवातीला मी चढण्याआधी रडले. पण, वर गेल्यानंतर मस्त वाटलं. आम्ही मुली काही कमी नाहीत, हे दाखवून दिलं. अजून अनेक मोहिमा करायच्या आहेत.
- स्वानंदी तुपे

मुली व महिलांना वजीर चढण हे खूप कठीण असतं. आज त्यांनी ते करून दाखवलं. मुली कुठंच कमी नाहीत, असा संदेश द्यायचा होता. तो आज त्यांनी दिला. आशा जिगरबाज महिला व मुलींसाठी वेगवेगळ्या मोहिमा बनविणार आहे.
- अनिल वाघ, मोहीम प्रमुख

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com