‘पुणेकरांनो, तुम्हाला पुढील दोन-चार दिवसांत सुटाबुटातले काही लोक भेटतील

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 जानेवारी 2020

अभियानाचा शेवटचा टप्पा असल्याने अचानकपणे केंद्राचे अधिकारी भेट देतील आणि पुणेकरांचा ‘फीडबॅक’ जाणून घेतील. त्याशिवाय काही प्रश्‍न ऑनलाइनही विचारण्यात येणार असल्याने पुणेकरांनी सहकार्य करावे. सार्वजनिक स्वच्छता राखण्याबाबतही नागरिकांनी पुढाकार घ्यावा.   
- ज्ञानेश्‍वर मोकळ, सहआयुक्त, पुणे महापालिका

पुणे - ‘पुणेकरांनो, तुम्हाला पुढील दोन-चार दिवसांत सुटाबुटातले काही लोक भेटतील. ते प्रश्‍न विचारतील. त्याची उत्तरे न टाळता नक्की द्या. तेव्हा नेमकी वस्तुस्थिती सांगा. तुमच्या उत्तरांत पुण्याच्या स्वच्छतेची गुणवत्ता ठरणार आहे; त्यावरून केंद्र सरकारच्या स्वच्छ अभियानाचा निकाल जाहीर होणार आहे. त्याकरिता महापालिकेला कल्पना न देताच सरकारने नेमलेल्या ‘एजन्सी’चे अधिकारी पुणेकरांच्या भेटीला येणार आहेत. परिणामी, महापालिकेच्या परीक्षेचा निकाल पुणेकरांच्या हाती राहणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

स्वच्छ भारत अभियानाची अंतिम फेरी सुरू असून, ती जिंकण्यासाठी अवघ्या २८४ चौरस किलोमीटरचे पुणे शहर चोवीस तास चकाचक ठेवण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे. त्यासाठी रस्त्यावरची अतिक्रमणे, बेकायदा जाहिरात फलके उतरवितानाच रस्त्यांवर कचरा करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्याचा सपाटा महापालिकेने लावला आहे. सार्वजनिक ठिकाणांची साफसफाई करतानाच वैयक्तिक स्वच्छतेवर महापालिकेने भर दिला आहे. अभियानाच्या मोहिमेत सामान्य नागरिकांचा सहभागही वाढविला आहे.

‘महारेरा’ने फेटाळली बिल्डरविरोधी तक्रार

या पार्श्‍वभूमीवर रस्ते, स्वच्छतागृहे, सरकारी-निमसरकारी कार्यालयांसोबत विमानतळ, रेल्वे आणि ‘एसटी’ स्थानकांची पाहणी होणार आहे. त्याशिवाय, थेट लोकांत जाऊनही स्वच्छतेच्या कामांचा आढावा घेण्यात येणार आहे. त्यासाठी विविध घटकांत सामावलेल्या पुणेकरांना स्वच्छतेसंदर्भातील १९ प्रश्‍न विचारले जाणार आहेत. त्याची उत्तरे जाणून लगेचच नियंत्रण कक्षाला अहवाल पाठविला जाणार आहे. पाहणी आणि अहवालासाठी केंद्राने तीन ‘एजन्सी’ नेमल्या असून, त्यातील अधिकाऱ्यांशी पुणेकरांनी मोकळेपणाने संवाद साधावा, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: swatch bharat abhiyan survey in pune