

जुन्नरमध्ये ताग लागवडीचा प्रयोग
बोरी खुर्दमध्ये चार एकरांवर पीक; एकरी सुमारे १२ क्विंटल उत्पादनाची अपेक्षा
आळेफाटा, जि. पुणे ः जुन्नर तालुक्यात तागाचे पीक प्रामुख्याने हिरवळीचे खत अथवा कंपोस्ट खतासाठी घेतले जाते. त्यामुळे या पिकाकडे नगदी पीक म्हणून फारसे पाहिले जात नाही. मात्र, बोरी खुर्द येथील शेतकरी संपत गणपत चिंचवडे यांनी तागाच्या पिकाचा अभ्यास करून त्याचा व्यावसायिक पद्धतीने प्रयोग केला आहे. त्यांनी सुमारे चार एकर क्षेत्रावर तागाची लागवड केली असून, त्यातून एकरी सुमारे १२ क्विंटल किंवा त्यापेक्षा अधिक उत्पादन मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
तागाचा उपयोग केवळ जमिनीचा पोत सुधारण्यासाठी न करता त्यापासून बियाणे, तंतू, सुतळी आणि बारदान निर्मितीसाठीही करता येतो. पश्चिम बंगालमध्ये तागाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. तेथे तागाची लागवड बियाणे निर्मिती तसेच तंतू उत्पादनासाठी केली जाते. मात्र, जुन्नर परिसरात ताग प्रामुख्याने जमिनीत गाडून हिरवळीचे खत तयार करण्यासाठी वापरला जात असल्याने त्याच्या व्यावसायिक क्षमतेकडे शेतकऱ्यांचे फारसे लक्ष गेलेले नाही.
चिंचवडे यांनी या पिकाचा अभ्यास करून उपलब्ध बाजारपेठ आणि उत्पादन खर्चाचा विचार केला. सध्या तागाला सुमारे १३० ते १५० रुपये प्रति किलो दर मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे योग्य उत्पादन आणि बाजारपेठ मिळाल्यास हे पीक शेतकऱ्यांसाठी चांगला आर्थिक पर्याय ठरू शकते, असा त्यांचा अनुभव आहे.
कमी खर्चात उत्पादनाचा प्रयत्न
ताग लागवडीसाठी एकरी सुमारे आठ किलो बियाणे लागते. त्यासाठी अंदाजे १ हजार २०० रुपये खर्च येतो. पेरणीसाठी सुमारे १ हजार रुपये, निंदणीसाठी १ हजार रुपये, तर युरिया खताचा सुमारे २५ किलोचा वापर केला आहे. हार्वेस्टरद्वारे काढणीसाठी सुमारे ४ हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. अशा प्रकारे एकरी साधारण ६ ते साडेसहा हजार रुपये उत्पादन खर्च येत असल्याचे चिंचवडे यांनी सांगितले. एकरी १२ क्विंटल उत्पादन मिळाल्यास आणि अपेक्षित बाजारभाव मिळाल्यास या प्रयोगातून चांगले उत्पन्न मिळू शकते, अशी अपेक्षा चिंचवडे यांनी व्यक्त केली आहे.
‘जमिनीचा पोत सुधारण्याबरोबरच उत्पन्नाचा पर्याय’
‘‘आपल्या भागात तागाकडे प्रामुख्याने कंपोस्ट खतासाठी पाहिले जाते. मात्र, पश्चिम बंगालमध्ये या पिकाचा बियाणे आणि तंतू निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणावर उपयोग होतो. त्यामुळे त्याचा अभ्यास करून नगदी पीक म्हणून चार एकरांवर प्रयोग केला आहे. उत्पादन आणि बाजारभाव अपेक्षेप्रमाणे मिळाल्यास परिसरातील इतर शेतकऱ्यांनाही या पिकाचा पर्याय उपलब्ध होऊ शकतो. जमिनीचा पोत सुधारण्यासोबतच आर्थिक उत्पन्न मिळवून देणे हा या प्रयोगामागील उद्देश आहे,’’ असे संपत चिंचवडे यांनी सांगितले.
फोटो ओळी ---
बोरी खुर्द, ता. जुन्नर ः येथे घेतलेले तागाचे पीक दाखविताना संपत चिंचवडे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.