esakal | कायदा हातात घेणाऱ्यां विरुद्ध कडक ॲक्शन घ्या : अजित पवार
sakal

बोलून बातमी शोधा

अजित पवार

कायदा हातात घेणाऱ्यां विरुद्ध कडक ॲक्शन घ्या : अजित पवार

sakal_logo
By
नितीन बारवकर

शिरूर : काही ठिकाणी, काही अविचारी तरूण कायदा हातात घेण्याचा, अशांतता माजवण्याचा प्रयत्न करताहेत. अशा तरूणांना आवरताना तो कुठल्या गटाचा, पक्षाचा किंवा कुणाच्या घरातील आहे हे पाहू नका, त्याच्याविरूद्ध कडक ॲक्शन घ्या, अशी ताकीद उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पोलिस दलाला दिली.

शिरूर येथील तरूण बांधकाम व्यावसायिक आदित्य संदीप चोपडा (वय २४) याच्या संशयास्पद मृत्युच्या पार्श्वभूमीवर पवार यांना आज शहरातील अनेक संघटनांनी निवेदने दिली. हा हत्येचा प्रकार असून, हल्लेखोरांना कठोर शासन झाले पाहिजे, अशी मागणी त्यांच्याकडे करण्यात आली. या दरम्यान, पवार यांनी आदित्यच्या कुटूंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार ॲड. अशोक पवार, माजी आमदार पोपटराव गावडे, नगर परिषदेचे सभागृह नेते प्रकाश धारिवाल त्यांच्यासमवेत होते. आदित्यचे वडील संदीप, आई छाया, बहिण दिशा व मामा मोहनलाल चंगेडीया व अतुल चंगेडीया यांनी अजितदादांसमोर भावना व्यक्त केल्या. 'दादा, तुम्ही माझ्या भावासारखे आहात, माझ्या एकूलत्या एका मुलाला आमच्यापासून हिरावून नेणारांना सोडू नका', असा आर्त टाहो आदित्यच्या आईने फोडल्यावर पवार यांनाही गहिवरून आले. त्यांनी तातडीने नगर चे पोलिस अधिक्षक मनोज पाटील व पुण्याचे पोलिस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्याशी संपर्क साधून या प्रकरणाचा तातडीने छडा लावण्याचे आदेश दिले.

हेही वाचा: Punjab : भाजपचे मदतनीस बनू नका; हरीश रावतांचा अमरिंदर सिंगांवर निशाणा

आज आदित्य गेला, पण पुढे अशा घटना होता कामा नये, असा सज्जड दम अजितदादांनी पोलिस दलाला दिला. कुठल्याही प्रकाराबद्दल कुणाच्या काही तक्रारी असतील तर पालकमंत्री म्हणून मला सांगा, असा दिलासा देत ते म्हणाले, शिरूर शहरातील सर्व समाजबांधव गुण्यागोविंदाने एकत्र राहात असताना त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी पोलिसांची आहे. अशा प्रकारांतून शांतता भंग करण्याचा प्रयत्न कुणी करीत असेल तर त्यांची पाळेमुळे खणून काढा. कायदा सुव्यवस्था कायम राखण्याला प्राधान्य देताना शहराच्या चांगल्या वातावरणाला कुणी गालबोट लावण्याचा प्रयत्न करीत असेल, शहरात बकालपणा आणण्याचा प्रयत्न कुणी करीत असेल, बेकायदेशीर गोष्टी करीत असेल तर त्याला सोडू नका.

आदित्य चोपडा याची हत्या झाल्याचा त्याच्या कुटूंबाचा दावा असल्याने त्यादृष्टीने पोलिसांनी तपास करावा व हल्लेखोरांचा शोध घेऊन त्यांना जरब बसेल असे शासन करावे, असे आदेशही अजित पवार यांनी दिले. ते म्हणाले, चूकीच्या प्रवृत्ती फोफावताना पोलिस दल सक्षम झाले पाहिजे. एमआयडीसीतील चूकीची ठेकेदारी, वाळूमाफीया यांचा बंदोबस्त करा. दारूभट्ट्या किंवा वेगळे चुकीचे व्यवसाय कुणी करीत असेल तर त्यांचा बिमोड करा. तुम्हाला सर्व साधनसामग्री आम्ही पुरवू. तुम्ही चांगले काम करा, तुम्हाला अधिकाधिक सुविधा देऊ. गृहपकल्प राबवू, चांगली वाहने उपलब्ध करून देऊ. पण एवढे सांगितल्यानंतरही यंत्रणा गतीने हलणार नसेल आणि त्याबाबत पुन्हा माझ्याकडे तक्रार येणार असेल तर मग मी सहन करणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

loading image
go to top