अण्णाद्रमुकच्या मतांची घसरण

अण्णाद्रमुकच्या मतांची घसरण
Published on: 

अण्णाद्रमुकच्या मतांची घसरण
तमिळनाडू पोटनिवडणूक; रणनीती बदलून उभारी घेण्याचा निर्धार
चेन्नई, ता. १२ (पीटीआय) : मदुरंतकम आणि धारापुरम येथील पोटनिवडणुकांमध्ये झालेल्या पराभवामुळे अण्णाद्रमुकला मोठा धक्का बसला आहे. पक्षाच्या पारंपरिक मतदारांमध्ये मोठी घट झाल्याने नेतृत्व, स्थानिक पातळीवरील संघटन आणि तमिळनाडूच्या बदलत्या राजकीय समीकरणांतील पक्षाचे स्थान यांबाबतचे संकट अधिक गडद झाले आहे.
एप्रिलमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत अण्णाद्रमुकच्या उमेदवारांनी या दोन्ही जागा जिंकल्या होत्या. मात्र, त्यानंतर आमदारकीचा राजीनामा देऊन ते मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी तमिळगा वेत्री कळघममध्ये (टीव्हीके) दाखल झाले. त्यामुळे सहा ऑक्टोबरला झालेल्या पोटनिवडणुकीत अण्णाद्रमुकला दोन्ही जागांवर तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. पश्चिम तमिळनाडूतील कोंगू पट्ट्यातील धारापुरम हा अण्णाद्रमुकचा बालेकिल्ला मानला जातो. पक्षाचे सरचिटणीस एडापड्डी के. पलानीस्वामी यांचाही या भागात प्रभाव आहे. मात्र, येथे पक्षाची मतांची टक्केवारी एप्रिलमधील ४०.५६ टक्क्यांवरून पोटनिवडणुकीत २५.०८ टक्क्यांपर्यंत घसरली. म्हणजेच १५.४८ टक्क्यांची घट झाली. मदुरंतकममध्येही पक्षाच्या मतांच्या टक्केवारीत ९.३४ टक्क्यांची घट झाली. एप्रिलमध्ये ३४.९५ टक्के मते मिळविणाऱ्या अण्णाद्रमुकला पोटनिवडणुकीत मोठा फटका बसला. दोन्ही मतदारसंघांमध्ये सत्ताधारी टीव्हीकेने विजय मिळविला, तर द्रमुक दुसऱ्या क्रमांकावर राहिला. धारापुरममध्ये द्रमुकला ३१.७८ टक्के, तर मदुरंतकममध्ये २९.१४ टक्के मते मिळाली. त्यामुळे आगामी काळातील लढत टीव्हीके आणि द्रमुक यांच्यातच होईल, असा दावा द्रमुकच्या नेत्यांकडून केला जात आहे.
चिन्हाचाही आधार अपुरा
अण्णाद्रमुकला एम. जी. रामचंद्रन व जे. जयललिता यांच्या वारशाचा तसेच पक्षाच्या ‘दोन पाने’ या चिन्हाचा दीर्घकाळ फायदा झाला. मात्र, ग्रामीण भागातील आणि अनुसूचित जातींच्या मतदारांनी अल्पावधीत ‘टीव्हीके’कडे वळविलेला मोर्चा पक्षासाठी चिंतेचा विषय ठरला आहे. केवळ पक्षाचे चिन्ह आणि ऐतिहासिक वारसा पुरेसा नसून मजबूत स्थानिक नेतृत्व आणि प्रभावी प्रचारयंत्रणाही आवश्यक असल्याचे या निकालांतून दिसून आले. दरम्यान, कोंगू भागातील अण्णाद्रमुकच्या एका ज्येष्ठ नेत्याने पोटनिवडणुकीतील कमी मतदानाचा अर्थ राज्यभरातील मतदारांच्या बदललेल्या भूमिकेशी जोडता येणार नसल्याचे म्हटले. टीव्हीके सरकारने निर्माण केलेल्या तात्पुरत्या भ्रमामुळे मतदार प्रभावित झाले असून, पक्षाकडे अजूनही मोठा पारंपरिक मतदारवर्ग असल्याचा दावा त्यांनी केला. पक्षाची रणनीती बदलून पुन्हा उभारी घेण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. अण्णाद्रमुकच्या एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, १७ ऑक्टोबरला होणाऱ्या पक्षाच्या ५५व्या स्थापना दिनानिमित्त पलानीस्वामी पक्षाला नवसंजीवनी देण्यासाठीची योजना जाहीर करणार आहेत. या योजनेत संघटनात्मक बदल आणि तरुण मतदारांवर विशेष लक्ष केंद्रित केले जाण्याची शक्यता आहे.
पोटनिवडणुकीतही विजयी
एप्रिलमधील विधानसभा निवडणुकीत मदुरंतकममधून मरगथम् कुमारवेल आणि धारापुरममधून पी. सत्यभामा या अण्णाद्रमुकच्या उमेदवार विजयी झाल्या होत्या. आमदारकीचा राजीनामा देऊन टीव्हीकेमध्ये प्रवेश केल्यानंतर विजय यांनी त्यांनाच पुन्हा उमेदवारी दिली. दोघींनीही पोटनिवडणुकीत विजय मिळविला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com