‘डीपी’तील आरक्षित जागांसाठी जमीनमालकांना टीडीआर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 जानेवारी 2020

यासाठी ठेवला प्रस्ताव
विकासकामांसाठी खासगी जागा ताब्यात घेण्याच्या मोबदल्यात भरपाई देण्याच्या नियमाचा गैरवापर सुरू आहे. असे प्रकार यापुढेही सुरू राहिल्यास महापालिकेच्या तिजोरीवर दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा भार पडेल व आर्थिक स्थितीवर परिणाम होईल. नागरिकांना मूलभूत सोयीसुविधा पुरविण्यात येणार नाहीत. त्यामुळे नागरीहिताला प्राधान्य देऊन डीपीतील आरक्षित जागा ताब्यात घ्याव्यात. मोबदला टीडीआरच्या माध्यमातून द्यावा, यामुळे मालमत्ताधारक टीडीआर स्वीकारण्यास प्रवृत्त होतील व त्यांना योग्य मोबदलाही मिळण्यास मदत होईल, या उद्देशाने ऐनवेळी प्रस्ताव मांडण्यात आला. त्याला मान्यता देण्यात आल्याचे स्थायी समिती अध्यक्ष विलास मडिगेरी यांनी सांगितले.

पिंपरी - विकास आराखड्यातील (डीपी) जागा ताब्यात घेताना विकास हक्काच्या हस्तांतरास (टीडीआर) प्राधान्य देण्याचा ऐनवेळचा विषय महापालिका स्थायी समिती सभेने बुधवारी (ता. १५) मंजूर केला. यामुळे शहरातील रखडलेले भूसंपादन व विकासकामे मार्गी लागतील.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

महापालिका १९८२ मध्ये अस्तित्वात आल्यानंतर व त्यात १९९८ मध्ये १८ गावे समाविष्ट झाल्यानंतर विविध विकासकामांसाठी आराखडे करण्यात आले. मात्र नोकरी-व्यवसायासाठी आलेल्या नागरिकांनी गुंठा-अर्धा गुंठा जागा घेऊन घरे बांधली. यासह स्थानिक भूमिपुत्रांच्या शेती व मोकळ्या जागांवर अनेक ठिकाणी ‘डीपी’ची आरक्षणे आहेत. त्यांच्या विकासासाठी या जागा महापालिकेच्या ताब्यात येणे आवश्‍यक आहे. त्यासाठी भूसंपादन करावे लागणार आहे. बहुतांश जागा या खासगी वाटाघाटीतून संपादन कराव्यात, असा विषय २०१३ पासून प्रलंबित आहे.

बारामतीच्या कृषी प्रदर्शनाचा आमिरलाही आवरला नाही मोह... 

यातून मार्ग काढण्यासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणजे ‘टीडीआर’च्या माध्यमातून जागा ताब्यात घेण्याचा प्रश्‍न सोडविण्यासाठी स्थायी समितीत याविषयी चर्चा झाली. नागरिकांना मूलभूत व पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ‘डीपी’तील भूखंड आरक्षित करण्यात आले आहेत. त्यांचा विकास करण्यासाठी जागा ताब्यात घेताना महापालिकेतर्फे भरपाई देण्याऐवजी ‘टीडीआर’ला प्राधान्य द्यावे, असा प्रस्ताव त्यात ठेवण्यात आला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: TDR to landowners for reserved seats in DP