शिक्षक राबतात कधी आपल्या शेतात, तर कधी दुसऱ्याच्या शेतात; वाचा सविस्तर

सकाळ वृत्तसेवा
Monday, 18 May 2020

अन्‌ शिक्षक बनले भाजीवाले
श्रीगोंदा येथील विनाअनुदानित महाविद्यालयात गेल्या १६ वर्षांपासून शिक्षक म्हणून काम करणाऱ्या देविदास नष्टे यांच्यावर भाजीपाला विकण्याची वेळ आली आहे. लॉकडाउनपूर्वी चहाची टपरी होती, मात्र लॉकडाउनमध्ये ही टपरी बंद असल्यामुळे दीड महिन्यापासून ते भाजीपाला विकत आहेत. त्यांचा मुलगा एका खासगी कंपनीत काम करता होता; परंतु लॉकडाउन दरम्यान त्याची नोकरी गेल्यामुळे संसाराचा गाढा चालविण्याची जबाबदारी नष्टे यांच्यावर आली आणि विद्येचे दान करणाऱ्या या शिक्षकाने भाजीचा व्यवसाय सुरू केला.

पुणे - पोटाची खळगी भरण्यासाठी अनेक शिक्षकांनी नांगर हाती धरला आहे. कधी आपल्या शेतात, तर कधी दुसऱ्याच्या शेतात मजूर म्हणून ते राबत आहेत. हक्काचा पगार मिळत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा 

घोडेगावमधील जनता विद्या मंदिर कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षक असणारे समीर काळे सध्या स्वत:च्या शेतात काम करत आहे. ‘‘महाविद्यालयात गेल्या दहा वर्षांपासून विनावेतन काम करत आहे. परिणामी कुटुंबाची आर्थिक गणिते जुळवून आणण्यासाठी पार्ट टाईम काम करतो. लॉकडाउनपूर्वी दुसऱ्यांच्या शेतात मजुरीला जात होतो. घराचा खर्च भागविण्यासाठी पाणीपुरीची गाडी सुरू करावी लागली,’’ असे काळे यांनी सांगितले. 

गेल्या पंधराहुन अधिक वर्षांपासून कनिष्ठ महाविद्यालयात ज्ञानदानाची सेवा करणाऱ्या शिक्षकांना विनावेतन काम करावे लागत आहे. परिणामी हे शिक्षक पार्ट टाइम काम करून आपला उदरनिर्वाह करत आहेत; परंतु लॉकडाउनमुळे या शिक्षकांवर उपासमारीची वेळ आली आहे.

श्रीगोंदा येथील व्यंकनाथ विद्यालय कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक निसार शेख म्हणाले, ‘‘शिक्षक म्हणून समाजात एक वेगळी प्रतिमा असते. त्यामुळे रेशनवर सामान आणायला गेलो, तरी ते मिळत नाही. लॉकडाऊनमध्ये हाताला काम नाही. त्यामुळे स्वत:च्या शेतातच पिकवून खावे लागत आहे.''

चंदननगर येथील पठारे महाविद्यालयातील शिक्षक दिलीप मोडक म्हणाले, ‘‘वेतनासाठी अनुदान मंजुर झाले, मात्र अद्याप त्यांचे वितरण करण्यात आले नाही. वारंवार मागणी करूनही सरकार या प्रश्‍नाकडे गांभीर्याने पाहत नाही. पुण्यातील शिक्षकांची स्थिती बरी आहे; परंतु सोलापूर, बीड, सातारा, सांगली, कोल्हापूरमधील शिक्षकांची स्थिती दयनीय आहे.’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: teacher labour work in farm by lockdown