
Teacher Recruitment Scam : शिक्षक नोकरभरती घोटाळा उघडकीस
पुणे : शिक्षक पदावर नोकरी देण्याचे आमिष दाखवून ४६ जणांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांच्यासह भावाविरुध्द हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या कथित नोकरभरती गैरव्यवहारामुळे शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे.
या संदर्भात शिक्षक पोपट सुखदेव सूर्यवंशी (रा. खानजोडवाडी, ता. आटपाडी, जि. सांगली) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून हडपसर पोलिसांनी शैलजा रामचंद्र दराडे (रा. रेव्हेरायीन ग्रीन्स, पाषाण, पुणे) आणि दादासाहेब रामचंद्र दराडे (रा. अकोले, ता. इंदापूर) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार १५ जून २०१९ पासून सुरु होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शैलजा दराडे परीक्षा परिषदेच्या आयुक्त आहेत. तर, दादासाहेब दराडे हे त्यांचे भाऊ आहेत. दादासाहेब दराडे याने त्यांची बहीण शैलजा दराडे या शिक्षण विभागात प्रशासन अधिकारी आहेत, असे सांगून फिर्यादीचा विश्वास संपादन केला. फिर्यादीच्या दोन नातेवाइकांना शिक्षक पदावर नोकरी लावतो,
असे सांगून त्याने प्रत्येकी १२ लाख आणि १५ लाख रुपये घेतले. परंतु त्यांना आजपर्यंत शिक्षक म्हणून नोकरी लावली नाही. त्यामुळे फिर्यादीने पैसे परत करण्याची मागणी केली. मात्र, आरोपींनी दोघांचेही पैसे परत केले नाहीत.
प्राथमिक तपासात या दोघांसमवेत इतर ४४ जणांची फसवणूक झाल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. दरम्यान, आयुक्त शैलजा दराडे यांनी त्यांचा भाऊ दादासाहेब दराडे याच्याशी काहीही संबंध नाही. परीक्षा परिषदेचा आयुक्त असल्याचा गैरफायदा घेऊन तो लोकांना नोकरी लावून देतो, असे सांगत आहे.
दादासाहेब दराडे याच्यासोबत कोणीही कसलाही व्यवहार करु नये, अशी जाहीर नोटीस शैलजा दराडे यांनी ऑगस्ट २०२० मध्ये दिली होती, असे सांगण्यात आले. याबाबत आयुक्त शैलजा दराडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांचा फोन बंद असल्यामुळे तो होऊ शकला नाही.