मुख्य अंक, शिक्षकांच्या वेतनासाठी ऑक्टोबरअखेरपर्यंत त्रुटी दूर करा

मुख्य अंक, शिक्षकांच्या वेतनासाठी ऑक्टोबरअखेरपर्यंत त्रुटी दूर करा
Published on: 

नोव्हेंबरपासून मंजूर पदांपेक्षा
अधिकच्या पदांचे वेतन नाही

शिक्षक, शिक्षकेतरांच्या वेतनत्रुटी दूर करण्याचे निर्देश

सकाळ वृत्तसेवा
नंदोरी (जि.वर्धा), ता. ११ : राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत शालार्थ प्रणालीतील संचमान्यतेच्या मंजूर पदांपेक्षा अधिकच्या पदांचे वेतन सप्टेंबर आणि ऑक्टोबर २०२६ या दोन महिन्यांसाठी एकस्तर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मान्यतेने देण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, १ नोव्हेंबरपासून मंजूर पदांपेक्षा अधिकच्या पदांचे वेतन कोणत्याही परिस्थितीत देण्यात येणार नाही. त्यामुळे वेतनाशी संबंधित सर्व त्रुटी ऑक्टोबरअखेरपर्यंत दूर करण्याचे निर्देश विभागीय शिक्षण उपसंचालक आणि शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

प्राथमिक शिक्षण विभागाचे संचालक शरद गोसावी अन् ‘माध्यमिक’चे संचालक डॉ. महेश पालकर यांनी दिलेल्या निर्देशानुसार शैक्षणिक वर्ष २०२४-२५ आणि २०२५- २६ च्या संचमान्यतेनुसार १ एप्रिल २०२६ पासून मंजूर पदांपेक्षा अधिकच्या पदांचे वेतन विशेष मान्यतेने अदा करण्याची सुविधा देण्यात आली होती. अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन, डिजिटलायझेशनमधील अपूर्ण कागदपत्रे, जन्मदिनांक व रुजू दिनांकाच्या चुकीच्या नोंदी, संचमान्यता आणि शालार्थ प्रणालीतील यू-डायस क्रमांकातील तफावत, शाळा बंद होणे तसेच न्यायालयीन प्रकरणे, अशा विविध कारणांमुळे ही सवलत देण्यात आली होती. परंतु, सणासुदीचा कालावधी आणि प्रशासकीय कामकाजाची व्याप्ती लक्षात घेऊन सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यांसाठीच ही मुदतवाढ देण्यात आली आहे.

या कालावधीत संबंधित अधिकाऱ्यांनी शालार्थ प्रणालीतील त्रुटी दूर करणे, वेतन न झालेल्या कर्मचाऱ्यांच्या सेवानोंदी तपासणे, आवश्यकतेनुसार नावे कमी करणे आणि समायोजित शाळांमध्ये अतिरिक्त शिक्षकांना रुजू करून घेणे बंधनकारक आहे. १ नोव्हेंबरपासून नियमांची कठोर अंमलबजावणी होणार असल्याने सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी निर्धारित मुदतीत कार्यवाही पूर्ण करावी, असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com