
जिल्हा परिषदेने पुण्यातील ओपन लिंक्स फाउंडेशनच्या मदतीने हे खास मोबाईल अॅप विकसित केले आहे. या अॅपच्या माध्यमातून आचार्य विनोबा भावे शिक्षक सहायक कार्यक्रम राबविण्यात येत आहे.
पुणे - बदलत्या काळानुसार अध्यापन पद्धतीत होणारे बदल प्रत्येक शिक्षकाला घरबसल्या कळावेत, या बदलांचा स्विकार सर्व शिक्षकांना करता यावा, या उद्देशाने पुणे जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांना तंत्रस्नेही करण्यासाठी प्रोत्साहन देणारा नवा प्लॅटफॉर्म पुणे जिल्हा परिषदेने निर्माण केला आहे. या प्लॅटफॉर्मचा उपयोग विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढ आणि शिक्षकांच्या अध्यापन पद्धतीत सुधारणा करण्यासाठी होत आहे. यासाठी 'विनोबा' हे खास मोबाईल अॅप विकसित करण्यात आले आहे. हे अॅप जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांसाठी संज्ञापनाचे ऑनलाइन व्यासपीठ बनले आहे.
या प्लॅटफॉर्ममुळे सर्व प्राथमिक शिक्षकांना आता एका क्लिकवर एकमेकांशी अध्यापनविषयक ऑनलाइन संवाद साधणे, नवे नवे अध्यापन कौशल्य विकसित करणे, अध्यापन पध्दतीत सुधारणा करणे, विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठीच्या आवश्यक साहित्याबाबत चर्चा करणे आता एका सोपे झाले आहे. परिणामी, यामुळे शैक्षणिक अध्यापन आणि गुणवत्तेचा दर्जा सुधारण्यास मदत होऊ लागली आहे.
जिल्हा परिषदेने पुण्यातील ओपन लिंक्स फाउंडेशनच्या मदतीने हे खास मोबाईल अॅप विकसित केले आहे. या अॅपच्या माध्यमातून आचार्य विनोबा भावे शिक्षक सहायक कार्यक्रम राबविण्यात येत आहे. यामुळे शिक्षकांना शैक्षणिक मदत मिळणे, प्रतिबद्धता (एंगेजमेंट) कायम ठेवणे आणि स्वतः ची स्वतंत्र ओळख (रेकग्नाईझेशन) निर्माण करण्यासाठी फायदा होणार आहे.
जिल्ह्यातील प्राथमिक शाळा संक्षिप्त माहिती
- पुणे शहर व जिल्ह्यातील प्राथमिक शाळांची संख्या ---- ३७०३.
- जिल्ह्यातील एकूण प्राथमिक शिक्षक ---- ११,४९२.
- आतापर्यंत या अॅपवर नोंदणी केलेल्या शाळा ---- २४९५.
अॅपवरील नोंदणीकृत शिक्षक ----- ७१२९.
'विनोबा' अॅपचे प्रमुख फायदे
- दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी उपयुक्त.
- प्राथमिक शिक्षकांना अध्यापन पद्धतीत सुधारणा करण्यासाठी फायदेशीर.
- पुणे झेडपीला जिल्ह्यातील शैक्षणिक गुणवत्तेवर देखरेख व नियंत्रण ठेवता येणार.
- जिल्ह्यातील विविध शाळांमधील, कला, संगीत, शाळांमधील विविध उपक्रमांची देवाणघेवाण करणे सोपे.
- शाळांना शैक्षणिक, क्रीडाविषयक, आर्ट, क्राफ्ट्स आणि अन्य उपक्रमांची माहिती मिळणार.
- दिव्यांग विद्यार्थ्यांच्या मदतीत सुधारणा करणे सोपे होणार.
- शिक्षकांना प्रोत्साहन मिळण्यासाठी फायदेशीर.
- शाळा पातळीपासून जिल्हा पातळीवरील शिक्षणाशी संबंधित विविध घटकांशी संपर्क साधता येणार.
- शिक्षकांना अध्यापनविषयक साप्ताहिक नियोजन, अॅक्टिव्हीटी आणि वर्कसीटमध्ये अधिकाधिक सुधारणा करणे सोपे.
विनोबा अॅपवरील विविध उपक्रम
- शिक्षकांची आणि विद्यार्थ्यांची ऑनलाइन मॉक चाचणी घेणे.
- गुणवत्ता सुधार कार्यक्रमांतर्गत मुख्याध्यापकांनी तयार केलेल्या नियोजनाचे सादरीकरण.
- शालेय व्यवस्थापन समिती बैठकीचा अहवाल सादर करणे.
- विषय साधन व्यक्तींचे मासिक अहवाल सादर करणे.
- केंद्रस्तरीय शिक्षण परिषद पूर्व व उत्तर चाचणी.
- साधन व्यक्ती व विशेष शिक्षकांचे शाळाभेट प्रपत्र सादर करणे.
विनोबा अॅप हे शिक्षक आणि विद्यार्थी या दोन्हींसाठी फायदेशीर आहे. यामुळे शिक्षकांना गुणवत्ता वाढीसाठी एक चांगला सोशल मिडिया प्लॅटफॉर्म उपलब्ध झाला आहे.
- आशा मकवान, पदवीधर शिक्षिका, माण, ता. मुळशी.
जिल्ह्यातील विविध शाळांमधील शैक्षणिक उपक्रम, अध्यापन कौशल्य आदींची देवाणघेवाण करण्यासाठी विनोबा अॅप उपयुक्त आहे. यामुळे शिक्षकांना गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रोत्साहन मिळू लागले आहे.
- शुभांगी भोसले, उपशिक्षिका, निगडे बुद्रुक,ता. वेल्हे.
प्राथमिक शाळांमधील शिक्षकांना गुणवत्ता सुधारण्यासाठी एक स्वतंत्र सोशल मिडिया प्लॅटफॉर्म उपलब्ध व्हावा, अशी आमची भावना होती. ती पुणे जिल्हा परिषदेच्या सहकार्याने पुर्ण करण्यात यश आले आले.
- संजय दालमिया, ओपन लिंक्स फाउंडेशन.