स्मार्ट इंडिया हॅकेथॉनमध्ये एआयटी'च्या 'द पॅक' मारले बाजी

mit
mit

पुणे - दिघी येथील आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या (एआयटी) 'द पॅक' टीमने स्मार्ट इंडिया हॅकेथॉनमध्ये प्रथम क्रमांकाचे एक लाखाचे पारितोषिक मिळवले आहे. 'द पॅक'ने 'ग्रामीण आणि मागास वर्गातील मुलांचे शिक्षण' यावर सॉफ्टवेअर तयार केले आहे.

एआयटी समवेत अंतिम फेरीत २० टीम पोहोचल्या होत्या. त्यात 'एआयटी'ने हैदराबादच्या एमएलआर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीला मात दिली. भारत सरकारच्या केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय आणि अखिल भारतीय तंत्रशिक्षण मंडळ (एआयसीटीई) यांच्या वतीने 1 ते 3 ऑगस्ट 2020 या कालावधीत या हॅकेथॉनचे आयोजन केले होते.

या हॅकेथॉनमध्ये सॉफ्टवेअर प्रकारात 256 खासगी व सरकारी संस्थांमधून अनेक संघ सहभागी झाले होते. साधारणपणे एक लाख विद्यार्थ्यांचा यात सहभाग होता. विविध समस्यांवर उपाय करण्याचे सॉफ्टवेअर बनविण्याचे आव्हान विद्यार्थ्यांपुढे होते. 'एआयटी'च्या रिशव शर्माच्या नेतृत्वात अक्षय शर्मा, सत्य प्रकाश, हर्ष चौहान, दीपशिखा त्रिपाठी, शुवम कुमार यांच्या 'द पॅक' टीमने हे सॉफ्टवेअर तयार केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही स्पर्धा ऑनलाईन झाली. ग्रामीण भागात इंटरनेट कनेक्टिव्हिटीचा अभाव आणि विविध ठिकाणाहून होणाऱ्या व्हिडीओ व्याख्यानाचा मोठा खर्च यामुळे ग्रामीण व आर्थिक मागास विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत आहेत. त्यावर उपाय म्हणून या विद्यार्थ्यांनी एक अप्लिकेशन तयार केले आहे. कमी इंटरनेट बँडविड्थमध्येही याचा वापर करता येतो. स्वयंचलित ऑनलाईन शिक्षणाच्या दिशेने हे पहिले पाऊल असणार आहे. तसेच या अप्लिकेशनमधील सध्याच्या ई-लर्निंग प्लॅटफॉर्मवरील सर्व सुविधा एकत्रितरित्या उपलब्ध असणार आहेत. 'द पॅक'सह 'एआयटी'च्या 'हेक्साडा', 'माधवाज' आणि लोरा एसवायएनसी या आणखी तीन संघानी अंतिम फेरीत स्थान मिळवले.

"स्मार्ट इंडिया हॅकेथॉनचे विजेतेपद आणि एक लाख रुपयाचे प्रथम पारितोषिक मिळवणाऱ्या एआयटी 'द पॅक' टीमची कामगिरी अभिमानास्पद आहे. केवळ भारतातच नाही, तर जगभरात ही स्मार्ट इंडिया हॅकेथॉन मानाची समजली जाते. गेल्या दोन वर्षांपासून 'एआयटी' विविध तांत्रिक स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत आहे. हे यश विद्यार्थ्यांचे कष्ट, त्यांच्यातील गुणवत्ता दर्शवते. समाजातील विविध समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी विद्यार्थी प्रयत्न करताहेत."
- ब्रिगेडियर (निवृत्त) अभय भट, 'एआयटी'चे संचालक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com