
पुणे जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीला लगाम लावण्यासाठी नव्याने पदभार स्विकारलेले पोलिस अधिक्षक डाॅ.अभिनव देशमुख यांनी चांगलीच कंबर कसली आहे.
पाटस : पाटस (ता.दौंड) येथे बेकायदेशीर गावठी पिस्तूल बाळगणाऱ्यांच्या पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चांगल्या मुसक्या आवळल्या. संबंधित व्यक्तीकडून एक पिस्तूल व दोन काडतुसे जप्त करण्यात आली. या प्रकरणी लक्ष्मण दत्तात्रय सपकाळ (वय ३५) रा.कानगाव, ता.दौंड, जि.पुणे याला अटक करण्यात आली, अशी माहीती पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिली.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
पुणे जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीला लगाम लावण्यासाठी नव्याने पदभार स्विकारलेले पोलिस अधिक्षक डाॅ.अभिनव देशमुख यांनी चांगलीच कंबर कसली आहे. शुक्रवारी (ता.१३) सायंकाळी पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पथक यवत पोलिस ठाण्याच्या हद्दीत गस्तीवर होते. त्यावेळी पाटस येथील उड्डाणपुलाशेजारी एक व्यक्ती कमरेला गावठी पिस्तूल लावून पल्सर मोटारसायकलवर (एमएच४२ एएल११३९) फिरत असल्याची माहिती पथकाला मिळाली. काही वेळातच पथकाने संबंधित ठिकाणी धाव घेतली.
सदर वर्णनाप्रमाणे व्यक्तीचा शोध घेतला. त्यावेळी बसस्थानक परिसरात एक व्यक्ती संशयास्पद दिसून आला. पोलिसांना पाहून त्याने पळ काढण्यास सुरुवात केली. मात्र पोलिस पथकाने मोठया शिताफिने आरोपी लक्ष्मण सपकाळ यास पकडले. यावेळी त्यांच्याकडे बेकादेशीर एक गावठी पिस्तूल, दोन काडतुसे दिसून आली. पोलिसांनी सदर पिस्तूल, काडतुसे, मोबाइल, मोटारसायकल असा १ लाख १८ हजार सहाशे रुपयांचा माल जप्त करण्यात आला.
पिंपरी चिचंवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
दरम्यान, आरोपी लक्ष्मण सपकाळ याने गावठी पिस्तूल दिपक पासलकर यांच्याकडून घेतल्याचे सांगितले. दिपक हा रेकाॅडवरील सराइत गुन्हेगार असून त्याच्यावर वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहे, असे पोलिसांनी सांगितले. आरोपी सपकाळ यास पुढील कारवाईसाठी यवत पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. आरोपीने सदर पिस्तूल कोणत्या कारणासाठी आणले. यामध्ये आणखी कितीजण सहभागी आहेत. या हत्याराचा वापर कुठे केला आहे का? याबाबत अधिक तपास यवत पोलिस तपास करीत आहे.
पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे पथकाचे पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक पुथ्वीराज ताटे, हवालदार महेश गायकवाड, निलेश कदम, विदयाधर निचित, गुरु गायकवाड, सुभाष राऊत, काशिनाथ राजापुरे यांनी ही कारवाई केली. दौंड न्यायालयात हजर केले असता आरोपी सपकाळ यास तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहीती पोलिस उपनिरीक्षक रामभाऊ घाडगे यांनी दिली.
संपादन - सुस्मिता वडतिले