
Pune News : गारपिटग्रस्त भागातील नुकसानीचे पंचनामे सुरू; तहसीलदार सबनीस
नारायणगाव : शनिवारी दुपारी जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील निमगाव सावा, खोडद, हिवरे तर्फे नारायणगाव, पारगाव तर्फे आळे, झापवाडी, मंगरूळ, साकोरी, रानमळा, आर्वी, गुंजाळवाडी या गावात गारपिटीसह झालेल्या वादळी पावसामुळे शेती पिकांचे नुकसान झाले आहे.शेती पिकांचे पंचनामे आज पासून सुरू करण्यात आले आहेत. अशी माहिती तहसीलदार रवींद्र सबनीस यांनी दिली.
दरम्यान गारपीट व अवेळी पाऊस या मुळे नुकसान झालेल्या जुन्नर तालुक्यातील पिकांचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने व आर्थिक मदत करून दिलासा द्यावा. अशी मागणी आमदार अतुल बेनके यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याकडे केली आहे.
शनिवारी दुपारी तालुक्याच्या पूर्व भागातील निमगाव सावा, खोडद, हिवरे तर्फे नारायणगाव, पारगाव तर्फे आळे, झापवाडी, मंगरूळ, साकोरी, रानमळा परिसरात गारांचा वर्षाव झाला. गारांच्या तडाख्यामुळे द्राक्ष , कांदा, कलिंगड, गव्हू या प्रमुख पिकांसह आंबा व इतर उभ्या भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
हाता तोंडाशी आलेल्या पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे.मागील पाच दिवस सातत्याने मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडत असल्याने निर्यातक्षम परिपक्व द्राक्ष मण्यांना तडे गेले आहेत.या मुळे ही द्राक्ष मातीमोल झाली आहेत.
आज तहसीलदार सबनीस, गटविकास अधिकारी रमेश चंद्र माळी यांनी पथकासह पिकांच्या नुकसानीची पहाणी केली. त्या नंतर पंचनामे सुरू करण्याचे आदेश दिले. शेतकऱ्यांनी आपल्या भागातील गावकामगार तलाठी यांना नुकसानीची माहिती कळवावी असे आवाहन तहसीलदार सबनीस यांनी केले आहे.