
धनकवडीच्या यात्रेत टेम्पोने वाहनांना उडविले, अल्पवयीन मुलाचा मृत्यु
पुणे - यात्रेसाठी साऊंड सिस्टीम घेऊन आलेल्या टेम्पोचा ब्रेक न लागल्याने टेम्पो यात्रेत घुसून झालेल्या अपघातात एका अल्पवयीन मुलाचा मृत्यु झाला. भरधाव टेम्पोने अनेक वाहनांना उडविल्याने यात्रेत अक्षरशः गोंधळ उडाला. हि घटना रविवारी (ता.15) दुपारी दिड वाजता धनकवडीतील सावरकर चौकात घडली.
सनी दत्ता ढावरे (वय 16, रा. सहकारनगर) असे अपघातात मृत्यु झालेल्या मुलाचे नाव आहे. तर रूपेश बळीराम मालुसरे (वय 19 , रा. कोंढवा) असे अटक केलेल्या टेम्पो चालकाचे नाव आहे. दरम्यान, चालकासह टेम्पोचा मालक दत्ता घनवट याच्याविरूद्धही सहकारनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिस कर्मचारी विनोद होनराव यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी धनकवडी येथील जानुबाई मातेची यात्रा होती. त्यामुळे या यात्रेत परिसरातील भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दरम्यान, रूपेश मालुसरे हा यात्रेसाठी साऊंड सिस्टीमचे साहित्य घेऊन यात्रेच्या ठिकाणी येत होता.
धनकवडीत सावरकर चौकात ग्रांमपचायतीच्या समोरील रस्त्यावरुन उतारावरुन टेम्पो जात होता. त्यावेळी चालकाला टेम्पोचा ब्रेक लागला नाही. त्यामुळे रस्त्याच्याकडेला लावलेल्या व्हिडीओ स्क्रिीनला धडक दिली. त्यानंतर रस्त्याच्याकडेला उभ्या असलेल्या दोन दुचाकींना धडक देऊन टेम्पो राजभवानी कॉम्प्लेक्समधील सचिन मासे विक्री केंद्राच्या शेडला जाऊन धडकला. त्यावेळी सनी चालवित असलेल्या दुचाकीलाही टेम्पोने धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झाल्यामुळे सनीचा मृत्यु झाला. दरम्यान, अचानक घडलेल्या या अपघातामुळे यात्रेत मोठ्या प्रमाणात गोंधळ उडाला. तसेच भितीने नागरीकांची धावपळ झाली. या घटनेची माहिती मिळताच सहकारनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी चालक रुपेश मालुसरे यास तत्काळ अटक केली. या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक यु.एन.लोंढे करीत आहे.