esakal | पथारी व्यवसायिकांचे हडपसर उड्डाणपूलाखाली तात्पुरते पुनर्वसन IHadapsar
sakal

बोलून बातमी शोधा

हडपसर

पथारी व्यवसायिकांचे हडपसर उड्डाणपूलाखाली तात्पुरते पुनर्वसन

sakal_logo
By
कृष्णकांत कोबल

हडपसर : थेट रस्त्यावर मांडलेली पथारी, समोर होणारी गर्दी, रस्त्यावर वाहने उभी करून खरेदी करणारे ग्राहक यामुळे गांधी चौक ते गाडीतळ परिसरात वाहतूक कोंडी नित्याचीच झाली होती. सकाळने याबाबत "पथारीवाल्यांना अतिक्रमणाचा फटका' असे वृत्त ११ ऑगस्टला प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेऊन लोकप्रतिनिधी, पालिका व पोलीस प्रशासनाने बैठक घेऊन पथारी व्यवसायिकांचे येथील उड्डाणपूलाखाली तात्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन केले आहे. त्यामुळे परिसरात होणारी गर्दी कमी होऊन वाहतूक कोंडी सुटण्यास मदत झाली आहे.

गेल्या महिन्यात सकाळने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर पथारी व्वयसायीक संघटनेचे पदाधिकारी, सहाय्यक पालिका आयुक्त, अतिक्रमण विभाग, पोलीस प्रशासन व लोकप्रतिनिधी यांची बैठक झाली. या बैठकीत परवानाधारक पथारी व्यवसायिकांचे तात्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन करण्याचा निर्णय झाला होता. मात्र, ते उड्डाणपूलाखाली की विठ्ठलराव तुपे नाट्यगृहासमोरील रस्त्यावर याबाबत मतभेद होते. अखेर आमदार चेतन तुपे यांनी अतिक्रमण आयुक्त माधव जगताप यांच्याशी चर्चा करून उड्डाणपूलाखालील जागा निश्चित केली. पंधरा ऑगस्ट रोजी हडपसर पथारी व्यवसायिक पंचायतचे अध्यक्ष मोहन चिंचकर यांच्या नेतृत्वाखाली या व्यवसायिकांनी आपला व्यवसाय पूलाखाली स्थलांतरित केला.

दरम्यान, झालेल्या पावसाने पूलाच्या सांध्यातून गळणाऱ्या पाण्यामुळे अनेक व्यवसायिकांचा माल साचलेल्या पाण्यात बुडाला. त्यामध्ये अनेकांचे मोठे नुकसान झाले. याशिवाय येथे प्रकाश व्यवस्था नसल्याने विक्रेते व ग्राहकांना मोठा त्रास सहन करावा लागला. ही दुरवस्था लक्षात आल्याने पालिकेने पूलाच्या छताला दिवे लावून नुकतीच येथे प्रकाश व्यवस्था केली आहे. झालेल्या बदलामुळे ग्राहकांवर कोणताही परिणाम झाला नसल्याने हे व्यवसायिक समाधानी असल्याचे जाणवले.

सध्यातरी व्यवस्था चांगली, पण.......

उड्डाणपूलाखाली पुनर्वसन झाल्याने एक हक्काची जागा आम्हाला मिळालेली आहे. येथे प्रकाश व्यवस्था झाली आहे. ग्राहकही चांगला आहे. त्याबद्दल आम्ही समाधानी आहोत. मात्र, पूलाच्या सांध्यातून येणारे पावसाचे पाणी थेट पथारीवर पडते. ते पाणी साचून राहते. अशावेळी आमच्याबरोबर ग्राहकांनाही त्रास सहन करावा लागतो. त्यासाठी छताला पन्हाळे बसवून पाणी काढून देण्याची गरज आहे. अनाधिकृत व्यवसायिकांनिही या जागेवर अतिक्रमण केले आहे. त्यांना शोधून बाहेर काढावे. आम्हाला पूलाखाली जागा दिली असली तरी बाहेर अनाधिकृत पथारीवाले बसत आहेत. त्यांच्यामुळे आमच्या व्यवसायावर मोठा परिणाम होत आहे. अतिक्रमण विभागाने त्यांवर वेळोवेळी कारवाई करावी, अशी मागणी हडपसर विभाग पथारी व्यावसायिक पंचायतचे पदाधिकारी सचिव राजेश साखरे, खजिंदार आनिल अग्रवाल सभासद मालन साळुंके, छाया गवई, पुष्पा अग्रवाल यांनी केली आहे.

हेही वाचा: वारंवार रस्ते कसे अडवले जाऊ शकतात? SCचा केंद्राला सवाल

"पूर्वी फूटपाथवर व्यवसाय करता येत होता. त्यानंतर व्यवसायिकांची संख्या वाढत गेली. कोरोनाच्या काळात अनाधिकृत पथारीवाले वाढले आहेत. १९९५ साली हडपसर पथारी संघटना स्थापन झाली. २००० साली सर्व्हे होऊन ओळखपत्रे मिळाली. हडपसर मतदार संघात २०१४ सालच्या सर्व्हेनुसार सुमारे आठराशे ते दोन हजार ओळखपत्रधारक पथारी व्यवसायिक आहेत. त्यातील काहींचे अ‍ॅमिनिटी स्पेसवर पुनर्वसन झाले आहे. राहीलेल्या इतरांचेही योग्य व सुविधा मिळतील अशा जागेवर पुनर्वसन व्हावे."

- मोहन चिंचकर अध्यक्ष, पथारी व्यावसायिक पंचायत, हडपसर विभाग

"पथारी व्यवसायिकांचे मुख्य रस्त्यावर अतिक्रमण होत होते. त्यामुळे वाहतूक कोंडी होत होती. ही परिस्थिती सुधारण्यासाठी ओळखपत्रधारक व्यवसायिकांना पूलाखाली जागा उपलब्ध करून दिली आहे. त्याठिकाणी प्रकाश व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय पूलावरून गळणाऱ्या पावसाच्या पाण्याचीही व्यवस्था करण्यात येणार आहे. अनाधिकृत व्यवसायिकांवर वेळोवेळी कारवाईत केली जात आहे.''

- माधव जगताप आयुक्त, अतिक्रमण विभाग

loading image
go to top