खेड तालुक्यातही १० दिवसांचा लॉकडाउन, कंपन्या सुरू राहणार

khed
khed

राजगुरूनगर (पुणे) :  खेड तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या वेगाने वाढू लागली आहे. त्यामुळे तालुक्यात १३ जुलैपासून १० दिवसांचा लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. तसेच, राजगुरूनगर, चाकण व आळंदी या तीन नगरपरिषदा आणि १९ गावे १४ दिवसांसाठी, प्रतिबंधित क्षेत्रे घोषित करण्यात आली आहेत. 

खेड तालुक्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी आज आमदार दिलीप मोहिते आणि प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात झाली, त्यावेळी हे निर्णय घेण्यात आले. या लॉकडाउनमध्ये कंपन्या बंद राहणार नाहीत.  कामगारांना पास देण्यात येतील. किराणा, भाजीपाला, दवाखाने, औषध दुकाने आदी अत्यावश्यक सेवा सुरू राहतील, असे बैठकीत ठरले. मोहिते यांच्या प्रयत्नातून उपलब्ध झालेल्या १० लाख रुपयांच्या निधीतून, तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना सुरक्षा कीट आणि रुग्णांवर उपचार करताना वापरावयाच्या साहित्याचे वितरण यावेळी करण्यात आले. 

चांडोली (राजगुरूनगर), चाकण आणि आळंदी येथे कोविड केअर सेंटर सुरू करणार आहे. चांडोली ग्रामीण रुग्णालयात स्वॅब घेण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. लवकरच आळंदी, चाकणच्या केंद्रात सुद्धा ही सुविधा उपलब्ध करून दिली जाईल, असे यावेळी सांगण्यात आले. मेदनकरवाडी व पिंपरी बुद्रुक येथील कोरोनाबधित सध्या शासनाच्या अखत्यारीत असलेल्या क्रिटिकेअर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे दगावले आहेत. त्यामुळे संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी आमदार मोहिते यांनी या वेळी अधिकाऱ्यांकडे केली. संशयित रुग्णांच्या कोविड चाचण्यांमध्ये सरकारी प्रयोगशाळा आणि खासगी प्रयोगशाळांच्या अहवालांमध्ये मोठी तफावत येत असल्याचे मत सभापती अंकुश राक्षे यांनी व्यक्त केले. खासगी प्रयोगशाळांमध्ये अहवाल पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण जास्त आहे, असे ते म्हणाले.

अधिकाऱ्यांना इशारा
आळंदी ग्रामीण रुग्णालयाला वेळोवेळी भेट देऊन आणि सूचना देऊनही कारभार सुधारत नाही. कोरोना साथीचे गांभीर्य नसून ढिसाळ कामकाज सुरू असल्याची तक्रार खुद्द जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे यांनी केली. त्यावरून वैद्यकीय अधिकारी डॉ. जी. जी. जाधव यांना आमदार मोहिते यांनी बैठकीत खडसावले व गंभीर परिणाम होतील, असा इशारा दिला. 

कंटेंनमेंट झोन गावे
कडूस, पाईट, येलवाडी, निघोजे, दावडी, सोळू, मरकळ, काळूस, मेदनकरवाडी, खराबवाडी, कडाचीवाडी, नाणेकरवाडी, सातकरस्थळ, पिंपरी बुद्रुक, वाकी खुर्द, शेलपिंपळगाव, चिंबळी, मोई.  
  
Edited by : Nilesh Shende
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com