पुणे महापालिकेच्या प्रभागरचनेत बदलाची धाकधूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune Municipal Corporation

गेल्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाने पुढील दोन आठवड्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू करा असे आदेश दिले होते.

पुणे महापालिकेच्या प्रभागरचनेत बदलाची धाकधूक

पुणे - राज्य निवडणूक आयोगाने (State Election Commission) १७ मे रोजी पुणे महापालिकेच्या (Pune Municipal) अंतिम प्रभाग रचना (Ward Structure) जाहीर होणार असल्याने प्रारूप रचनेत दाखविलेल्या प्रभागांऐवजी समितीने सुचविलेल्या शिफारशींनुसार त्यात आता काय बदल होणार याची धाकधूक इच्छुक उमेदवारांमध्ये आहे. तसेच आता प्रभाग रचना जाहीर झाली तरी निवडणूक कधी होणार याची स्पष्टता नसल्याने ‘भाऊ निवडणूक कधी होणार जून मध्ये की पावसाळ्यानंतर?’ असा संभ्रमावस्थेतील प्रश्‍न प्रत्येक कार्यकर्ताच्या ओठी असल्याने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.

गेल्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाने पुढील दोन आठवड्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू करा असे आदेश दिले होते. त्यानुसार कामाला लागलेल्या निवडणूक आयोगाने आज (ता.१७) अचानक अंतिम प्रभाग रचना जाहीर होण्याची तारीख जाहीर केल्याने प्रशासकीय यंत्रणा आणि सुस्तावलेले राजकीय कार्यकर्ते ताडकन जागे झाले.

पुणे महापालिकेसाठी तीन सदस्यांचा प्रभाग तयार करताना मोठ्याप्रमाणात गडबड झाली आहे. अनेक प्रभाग नैसर्गिक हद्दींचे उल्लंघन करून तयार केले आहेत. त्यामध्ये सर्वपक्षीय मातब्बर नगरसेवकांनी विरोधी पक्षांशी साटेलोटे करून स्वतःचे प्रभाग सुरक्षीत केल्याने पक्षांमध्ये धुसफूस आहे. या प्रारूप रचनेवर साडे तीन हजारपेक्षा जास्त हरकती सूचना आल्या. त्यावर यशदाचे महासंचालक एस. चोकलिंगम यांच्या समितीने सुनावणी घेऊन सुमारे दीड आठवडा या हरकती-सूचनांवर अभ्यास करून त्याचा अहवाल आयोगाला सादर केला होता.

प्रभाग क्रमांक १३ कडे लक्ष

यामध्ये शहरात एकूण ५८ प्रभाग असून, त्यातील ५७ प्रभाग तीन सदस्यांचे आहेत. त्यात पहिला किंवा शेवटचा प्रभाग दोन सदस्यांचा असावा असे संकेत आहेत. पण बाणेर-सूस म्हाळुंगे हा प्रभाग क्रमांक १३ दोन सदस्यांचा केल्याने त्याबाबत प्रश्‍न उपस्थित झाले होते. त्यामुळे या प्रभागाच्या रचनेत बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अंतिम प्रभाग रचनेत हा प्रभाग बदलला गेला तर त्याचा परिणाम बाणेर, बालेवाडी, औंध, पाषाण, गोखलेनगर, एरंडवणे, कोथरूड, बावधन भागातील प्रभागांच्या रचनेवर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आरक्षणांचेही गणित बदलणार आहे.

हडपसर भागातील सय्यदनगर, रामटेकडी, येरवडा, नगर रस्ता, धायरी-आंबेगाव, शिवाजीनगर गावठाण- संगमवाडी या या भागातही बदलांची शक्यता असल्याने त्या परिसरातील इतर प्रभागांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. सुनावणीनंतर समितीच्या बैठकांच्या वेळेस झाली होती. मार्च महिन्यास चोकलिंगम यांच्या समितीने त्यांचा अहवाल निवडणूक आयोगाला सादर केला आहे. त्यानंतर दोन महिन्यानंतर तब्बल दोन महिन्यानंतर १७ मे रोजी अंतिम प्रभाग रचना जाहीर होणार आहे. त्यामुळे एस. चोकलिंगम यांच्या समितीने सुचविलेले बदल, शिफारशींनुसार आयोगाकडून किती बदल केला जाईल हे स्पष्ट होणार आहे. तो पर्यंत प्रभाग रचनेबाबत राजकीय चर्चांना उधाण येणार आहे.

Web Title: Tension For Change In Ward Structure Of Pune Municipal Corporation

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top