हिरव्या भाज्यांनी बहरणार टेरेस गार्डन

अमित गद्रे 
बुधवार, 2 ऑक्टोबर 2019

शहरातील नागरिकांपुढे ओला कचरा घरच्या घरी कसा जिरवावा, ही मोठी समस्या आहे. ही समस्या सोडविण्यासाठी ओल्या कचऱ्याचे कंपोस्ट खत करून बंगला तसेच सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांच्या टेरेसवर बाग तयार करून वापरणे सहजशक्‍य आहे. हे महापालिका आणि परसबागप्रेमींनी पथदर्शी प्रकल्पातून दाखवून दिले आहे.

पुणे - शहरातील नागरिकांपुढे ओला कचरा घरच्या घरी कसा जिरवावा, ही मोठी समस्या आहे. ही समस्या सोडविण्यासाठी ओल्या कचऱ्याचे कंपोस्ट खत करून बंगला तसेच सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांच्या टेरेसवर बाग तयार करून वापरणे सहजशक्‍य आहे. हे महापालिका आणि परसबागप्रेमींनी पथदर्शी प्रकल्पातून दाखवून दिले आहे.

यामुळे ओला कचरा जिरेल; त्याचबरोबर विविध हंगामी भाजीपाल्यांनी टेरेस गार्डन वर्षभर हिरवीगार राहील. हाच दृष्टिकोन डोळ्यांसमोर ठेवून पुणे महापालिका आणि हौशी परसबागप्रेमींच्या सहवर्धन समूहातर्फे टेरेस गार्डनच्या माध्यमातून नागरिकांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने शहरातील पहिला पथदर्शक प्रकल्प महापालिकेच्या घोले रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या टेरेसवर उभारण्यात आला आहे.

बुधवारी (ता. २) महात्मा गांधी जयंतीच्या निमित्ताने महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते या टेरेस गार्डनचे उद्‌घाटन होत आहे. सरकारी इमारती, बंगले तसेच सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांचे टेरेस मोकळे आहेत. नागरिकांनी ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट खत तयार करून त्याचा वापर टेरेस गार्डनमधील भाजीपाला तसेच सोसायटीमधील झाडांसाठी करावा, अशी संकल्पना आहे. यासाठी महापालिकेच्या घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या १२०० चौरस फूट आकाराच्या टेरेसवर कंपोस्ट खत, शेणखत, पालापाचोळ्याचा वापर करून वाया गेलेल्या प्लॅस्टिक क्रेटचा पुनर्वापर करीत त्यामध्ये वांगी, मिरची, टोमॅटो, कोबी, फ्लॉवर, भेंडी, ढोबळी मिरची, शेवगा, गवती चहा, स्ट्रॉबेरी तसेच विविध वेलवर्गीय भाजीपाल्याची लागवड केली आहे. या पथदर्शक टेरेस गार्डनची उभारणी हौशी परसबागप्रेमींच्या सहवर्धन समूहाने केली आहे.

प्रकल्पासाठी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त शंतनू गोयल, ज्ञानेश्वर मोळक, माधव जगताप, डॉ. केतकी घाडगे, किशोरी शिंदे, आय. एस. इनामदार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मार्गदर्शन केले आहे, अशी माहिती सहवर्धन समूहाचे सदस्य डॉ. राम दातार यांनी दिली. येत्या काळात शहरातील १५ क्षेत्रीय कार्यालये तसेच शहराच्या विविध भागांतील आठ सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांच्या टेरेसवर गार्डन विकसित करणार आहे. या ठिकाणी हंगामनिहाय भाजीपाला लागवड आणि व्यवस्थापन, कंपोस्ट खत, गांडूळ खतनिर्मिती, व्हर्टिकल गार्डन, जिवामृत आणि दशपर्णी अर्क वापर तसेच मधमाशीपालनाबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Terrace Garden