
Pune Crime News : खडकवासला येथे सराईत गुन्हेगारांचा हैदोस
खडकवासला : काही दिवसांपूर्वी खडकवासला भाजी मंडई येथे कोयते फिरवत दहशत माजविणाऱ्या सराईत गुन्हेगारांनी पुन्हा हैदोस घातला असून कोयता, लोखंडी रॉड व दगडांनी सहा चारचाकी वाहनांची तोडफोड केली आहे.
खडकवासला येथे सातत्याने घडत असलेल्या गुन्हेगारी घटनांमुळे स्थानिक नागरिक संताप व्यक्त करत आहेत. तसेच अवैध धंद्यांमुळे सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचाही आरोप नागरिक करत आहेत.

खडकवासला येथील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात पहाटे चार वाजण्याच्या सुमारास दोन सराईत गुन्हेगारांनी दहशत माजवित ही तोडफोड केली आहे. इमारतींच्या समोर मुख्य रस्त्याच्या कडेने उभ्या असलेल्या पाच कार व एका टेंपोची तोडफोड करण्यात आली आहे.
तोडफोड करणाऱ्या दोन्ही आरोपींची नावे निष्पन्न झाली असून हवेली पोलीसांची पथके त्यांच्या शोधासाठी रवाना करण्यात आली असल्याची माहिती हवेली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांनी दिली आहे.
अवैध धंदे आमच्या मुळावर खडकवासला येथे अवैध धंदे मोठ्या प्रमाणात असून अवैध धंद्यांमुळे गुन्हेगारी वाढली आहे. अवैध धंदे आमच्या मुळावर उठले आहेत. पोलीस काहीही कारवाई करत नाहीत.
अवैध धंदे बंद झाल्याशिवाय गुन्हेगारी थांबणार नाही असा संताप स्थानिक रहिवासी साहेबराव मते यांनी व्यक्त केला आहे. साडेनऊ नंतर आम्ही येऊ वाहनांची तोडफोड झाल्याचे समजताच संबंधित वाहनमालकांकडून हवेली पोलीस ठाण्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
अनेक वेळा फोन करुनही फोनला उत्तर मिळत नव्हते व फोन उचलला तेव्हा आम्ही सकाळी साडेनऊ नंतर घटनास्थळी येऊ असे अजब उत्तर पोलीसांकडून देण्यात आल्याचे वाहन मालकांनी सांगितले.