शिक्षकांना वरिष्ठ अन्‌ निवडश्रेणीसाठी ‘टीईटी’चे बंधन

शिक्षकांना वरिष्ठ अन्‌ निवडश्रेणीसाठी ‘टीईटी’चे बंधन
Published on

सकाळ एक्सक्ल्युझिव्ह
-------------
शिक्षकांना वरिष्ठ अन्‌ निवडश्रेणीसाठी ‘टीईटी’चे बंधन
पात्र शिक्षकांचे प्रशिक्षण होणार, पण वेतनश्रेणी पात्रता पूर्ण केल्यावरच; अधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण
तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. ६ : इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गांवरील शिक्षकांसाठी ‘टीईटी’ बंधनकारक आहे. त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने ३० ऑगस्ट २०२७ पर्यंत मुदत दिली आहे. पदोन्नतीसाठी देखील ‘टीईटी’ची अट आहे. या पार्श्वभूमीवर आता ‘टीईटी’ उत्तीर्ण असलेल्या शिक्षकांनाच वरिष्ठ व निवड वेतनश्रेणीचा लाभ मिळणार आहे.
शिक्षकांना सेवेत दाखल होऊन १२ वर्षे पूर्ण झाल्यावर वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ दिला जातो. दुसरीकडे, २४ वर्षांच्या सेवेनंतर शिक्षकांना निवडश्रेणी मिळते. दोन्ही वेतनश्रेणीत शिक्षकांना शासनाकडून आर्थिक लाभ मिळतो. सर्वोच्च न्यायालयाने सेवानिवृत्तीला पाच वर्षे कमी असलेल्या शिक्षकांना वगळून बाकीच्या सर्वच शिक्षकांना ‘टीईटी’ उत्तीर्ण असण्याची अट घातली आहे. याशिवाय पदोन्नतीसाठी देखील ही अट असून आता वेतनश्रेणी लागू करण्यासाठी देखील ‘टीईटी’ आवश्यक असणार आहे. दरवर्षी सोलापूरसह राज्यभरातील एक लाख शिक्षक वरिष्ठ व निवड वेतनश्रेणीसाठी पात्र ठरतात. आता, त्यातील हे टीईटी उत्तीर्ण नसतील त्यांना पात्रता पूर्ण करेपर्यंत आर्थिक लाभ मिळणार नसल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. आता १२, २४ वर्षांची सेवा बजावूनही शिक्षकांना ‘टीईटी’ झाल्याशिवाय वेतनश्रेणी मिळणार नाही.
---
कोट:
इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गांवरील शिक्षकांना निवड व वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ घेण्यासाठी ‘टीईटी’ उत्तीर्ण असावे लागणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही अट लागू असणार आहे. ‘टीईटी’ उत्तीर्ण शिक्षकांना निवड व वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ लगेच मिळेल.
- सचिंद्र प्रताप सिंह, शिक्षण आयुक्त
---
चौकट
पदोन्नती अन्‌ आर्थिक लाभ सारखाच
पदोन्नतीस पात्र शिक्षकांना कोणाला पुढचे पद मिळते, तर कोणाला त्या प्रमाणात आर्थिक लाभ मिळतो. त्यामुळे निवड व वरिष्ठ वेतनश्रेणीसाठी देखील ‘टीईटी’ आवश्यक असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. दिवाळी सुट्ट्यांमध्ये आता वेतनश्रेणीसाठी पात्र शिक्षकांचे प्रशिक्षण होणार आहे. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने त्याचे नियोजन देखील केले आहे. पात्र सर्व शिक्षकांना वेतनश्रेणीचे प्रशिक्षण दिले जाणार आहे; पण वेतनश्रेणी देण्यापूर्वी त्या शिक्षकांना ‘टीईटी’ उत्तीर्ण व्हावी लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com