ठाकरे सरकारकडून २८ कोटींची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा : आमदार बेनके

रवींद्र पाटे
Monday, 9 November 2020

पंचनामे झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सुमारे २८ कोटी रुपयांची रक्कम महसूल विभागाने नुकतीच वर्ग केली आहे. अशी माहिती आमदार अतुल बेनके यांनी दिली.

नारायणगाव : निसर्ग चक्रीवादळाच्या नुकसान भरपाई पासून वंचित राहिलेल्या गुळुंचवाडी (ता. जुन्नर) येथील घरे, समाजमंदिर आदी मालमत्तेच्या झालेल्या नुकसानीचे फेर पंचनामे करण्याचे आदेश महसूल विभागाला देण्यात आले आहेत. पंचनामे झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सुमारे २८ कोटी रुपयांची रक्कम महसूल विभागाने नुकतीच वर्ग केली आहे. अशी माहिती आमदार अतुल बेनके यांनी दिली.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आमदार बेनके यांनी रविवारी(ता.८) गुळुंचवाडी भागाचा दौरा केला. या वेळी स्वराज्य सोशल फाउंडेशन व अतुल भांबेरे मित्र परिवार यांच्या वतीने येथील गरीब कुटुंबाना दिवाळी फराळाचे वाटप आमदार बेनके, जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार यांच्या हस्ते करण्यात आले.या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे विजय कुऱ्हाडे, अतुल भांबेरे आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.

आमदार बेनके म्हणाले, ''जुन्नर तालुक्यात बागायती क्षेत्र जास्त असल्याने उत्तर पुणे जिल्ह्यात निसर्ग चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका तालुक्यातील शेतकऱ्यांना बसला आहे.कोरोनाची पार्श्वभूमी असताना उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी नुकसानीची पाहणी करून तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले होते.'' 

त्या नुसार  महसूल, कृषी व पंचायत समितीच्या पथकाने केलेल्या पंचनाम्या नुसार घरगुती वस्तु, कपडे आदींच्या नुकसानीपोटी २ कोटी १९ लाख २० हजार रुपये,घरांच्या नुकसानी पोटी ४ कोटी २२ लाख ७० हजार रुपये, पिकांच्या नुकसान भरपाईपोटी २१ कोटी ८७ लाख २१ हजार ६४५ रुपयाचा मदत निधी महसूल विभागाकडे जमा झाला होता. ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकतीच जमा करण्यात आली आहे.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

दरम्यान, पंचनामे न झाल्याने गुळुंचवाडी व इतर भागातील  काही मालमत्तेची नुकसानीची मदत मिळाली  नसल्याच्या तक्रारी आहेत.या नुकसानीचे फेर पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.

(संपादन : सागर डी. शेलार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Thackeray government deposits Rs 28 crore in farmers' bank accounts