शिंदेंच्या समर्थनार्थ शिवसैनिक रस्त्यावर

शिंदेंच्या समर्थनार्थ शिवसैनिक रस्त्यावर
Published on: 

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २९ : प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येवरून ठाण्यातील राजकीय संघर्ष तीव्र झाला असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ गुरुवारी शिवसैनिक रस्त्यावर उतरले. टेंभीनाक्यावरील आनंदाश्रमासमोर मुंबई, ठाणे, पालघर, नवी मुंबईसह विविध भागांतील शिवसेनेचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकत्र आले. या वेळी शिवसेना (यूबीटी) नेत्यांविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. या राजकीय शक्तिप्रदर्शनाचा फटका मात्र सर्वसामान्य ठाणेकरांना बसला. जांभळी नाका, कोर्टनाका, चरई, सिव्हिल रुग्णालय आणि आंबेडकर रोड परिसरात वाहतूक कोंडी झाल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला.
पूर्णेकर कुटुंबाला न्याय मिळावा आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी महाविकास आघाडीकडून जांभळी नाका येथील चिंतामणी चौकात आंदोलन जाहीर करण्यात आले. यासाठी नेते आदित्य ठाकरे आणि संजय राऊत येत असल्याने विरोधकांच्या आंदोलनाला प्रत्युत्तर देण्यासाठी शिवसेनेनेही आक्रमक भूमिका घेतली. टेंभी नाका येथील आनंदाश्रमासमोर विविध जिल्ह्यांतील विभागप्रमुख, नगरसेवक, पदाधिकारी जमले. त्यांनी संजय राऊत यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. पोलिसांनी शिवसैनिकांना मुख्य रस्त्यावरून बाजूला केले. काही कार्यकर्ते बी. जे. हायस्कूलच्या आवारात जाऊन घोषणाबाजी करू लागल्याने परिसरात गोंधळ निर्माण झाला. अखेर पोलिसांनी जमावाला रस्त्याच्या एका बाजूला केले. मात्र, तोपर्यंत मुख्य रस्त्यांसह अंतर्गत मार्गांवरील वाहतूक विस्कळित झाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com