esakal | आरोपी पोलिसांच्या तावडीतून पळाला ; पुन्हा तपास सुरु | Pune
sakal

बोलून बातमी शोधा

crime news

आरोपी पोलिसांच्या तावडीतून पळाला ; पुन्हा तपास सुरु

sakal_logo
By
महेंद्र शिंदे

खेड-शिवापूर : चरस तस्करी प्रकरणी राजगड पोलिसांनी पकडलेला आरोपी मुस्ताकी रज्जाक धुनिया हा तपासकामासाठी गोव्याला नेले असताना पोलिसांच्या तावडीतून सोमवारी पळून गेल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणाला राजगडचे पोलिस निरीक्षक सचिन पाटील यांनीही दुजोरा दिला असून गोव्यात सदर आरोपीचा तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

मुंबईहून गोव्याला निघालेल्या लक्झरी बसमधून 8 ऑगस्ट रोजी सुमारे 32 लाख रुपयांचे सहा किलो चरस राजगड पोलिसांनी जप्त केले होते. याप्रकरणी मुस्ताकी रज्जाक धुनिया याला ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. धुनिया हा नेपाळचा असल्याने चरसची आंतरराष्ट्रीय तस्करी आहे की काय? याचा तपास करण्यासाठी धुनिया याला पोलिस कोठडी सूनविण्यात आली होती.

त्यानुसार पुढील तपासासाठी रविवारी राजगड पोलिस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांचे पथक धुनिया याला घेऊन गोव्याला गेले होते. मात्र त्याठिकाणी आरोपीला घेऊन एका खासगी हॉटेलमध्ये पोलिस पथक मुक्कामासाठी थांबले होते. यावेळी धुनिया सोमवारी पहाटे पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून गेला. विशेष म्हणजे राजगड पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस अशा सुमारे आठ ते दहा पोलिसांचा पहारा असतानाही सदर आरोपी पळून गेल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या प्रकाराने आरोपीच्या पलायनाबाबत तसेच पोलिसांच्या कामगिरीवर वेगवेगळे तर्कवितर्क उपस्थित केले जात आहेत.

याबाबत राजगडचे पोलिस निरीक्षक सचिन पाटील यांना विचारले असता त्यांनीही आरोपी पळून गेल्याच्या प्रकाराला दुजोरा दिला आहे. तसेच सदर आरोपीचा गोव्यात शोध सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

loading image
go to top