esakal | हवेली : दारूड्या मुलानेच केला आपल्या वडिलांचा खून
sakal

बोलून बातमी शोधा

हवेली : दारूड्या मुलानेच केला आपल्या वडिलांचा खून

हवेली : दारूड्या मुलानेच केला आपल्या वडिलांचा खून

sakal_logo
By
जनार्दन दांडगे.

उरुळी कांचन : दारुड्या मुलाने आपल्या ६७ वर्षीय बापाचा गळा आवळून खून केला. बापाचा प्राण गेला की नाही हे पाहण्यासाठी ब्लेडच्या साहय्याने गळा कापला. व त्यानंतर आपण केलेले कृत्य लपविण्यासाठी मृतदेह दोन दिवस घरात लपवून ठेवला. मात्र, दोन दिवसानंतर मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेत असताना दारुड्या मुलाच्या हालचालीबाबत त्याच्या पत्नीला संशय आल्याने वरील प्रकरणाचा भांडाफोड झाला. वरील धक्कादायक प्रकार उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील तुपे वस्ती परिसरात उघडकीस आला आहे. रहीम गुलाब शेख (वय-६७, रा. तुपे वस्ती, उरुळी कांचन, ता. हवेली) हे त्या खून झालेल्या इसमाचे नाव आहे. वरील खुनाचा प्रकार मंगळवारी (ता. ८) मध्यरात्रीच्या सुमारास घडला असून, रहीम शेख यांचा मृतदेह आज (गुरुवारी) दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास दफन करण्यासाठी नेत असताना उघडकीस आला आहे.

याप्रकरणी नयीम रहीम शेख (वय-३५) या दारुड्या मुलास लोणी काळभोर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. धक्कादायक बाब म्हणजे नयीम शेख याने सात वर्षांपूर्वी अशाच प्रकारे ब्लेडच्या साहय्याने आपल्या पत्नीवर वार करून तिचा खून करण्याचा प्रयत्न केला होता. लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रहीम शेख हे मागील काही वर्षांपासून आजारी असल्याने घरात झोपून होते. तर नयीम शेख हा दिवसभर दारू पिऊन गावात फिरत होता तर त्याची बहीण शहनाज रशीदखान इनामदार ही धुनीभांडी करून वरील दोघांना संभाळत होती. नयीम याने सात वर्षांपूर्वी बायकोवर ब्लेडने वार करून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याने ती तिच्या माहेरी राहते.

हेही वाचा: पुणे जिल्ह्यात शिवसेना, राष्ट्रवादी जुगलबंदी पुन्हा रंगणार?

दरम्यान, नयीम याने मंगळवारी मध्यरात्री किरकोळ कारणावरून रहीम शेख यांना मारहाण करून त्यांचा गळा आवळला. गळा आवळल्यानंतर रहीम शेख यांची हालचाल बंद झाल्यानंतर नयीम याने ब्लेडच्या साहय्याने बापाचा गळा कापला. या भांडणात नयीम याची बहिण शहनाज वडिलांना सोडविण्यासाठी आली असता, नयीम याने बहिणीला जीवे मारण्याची धमकी देऊन गप्प बसवले. व रहिम शेख यांचा मृतदेह कपड्यात गुंडाळून ठेवला. वडिलांना मारल्यानंतर मागील ३६ तासांपासून मृतदेह कपड्यात गुंडाळलेल्या अवस्थेत घरात पडून होता. आज गुरुवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास नयीम याने वडील मयत झाल्याची माहिती नातेवाईकांना दिली. व चार वाजता वडिलांना दफन करणार असल्याचे नातेवाईकांना कळविले. ही बाब नयीम याच्या पत्नीला समजल्याने तीही सासऱ्याच्या अंत्यसंस्कारासाठी घरी आली होती.

हेही वाचा: पुणे जिल्ह्यातील ग्रामसेवकांच्या प्रवास भत्त्यात वाढ

दरम्यान, नयीम याची पत्नी सासरे, रहीम यांचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी रहीम यांच्या मृतदेहाजवळ गेली असता, तिला रहीम यांच्या गळ्यावर वार असल्याचे लक्षात आले. यावर नयीम याच्या पत्नीने शहनाजला बाजूला घेऊन रहीम यांच्या गळ्यावरील जखमेबाबत विचारणा केली असता, शहनाजने नयीम याने आपल्या वडिलांच्या समवेत केलेल्या धक्कादायक कृत्याची माहिती नयीमच्या पत्नीला दिली. यानंतर नयीमच्या पत्नीने शहनाज समवेत साहय्यक पोलीस निरीक्षक दादाराजे पवार यांची भेट घेऊन घडलेल्या घटनेची माहिती दिली. याप्रकरणी नयीम याला रहीम यांचा खून केलेल्या संशयावरून ताब्यात घेतले असून, पुढील तपास लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांच्या मार्गदर्शनाखाली साहय्यक पोलिस निरीक्षक दादाराजे पवार करीत आहेत.

हेही वाचा: नाशिक-पुणे रेल्वे प्रकल्पास जमीन देण्यास शेतकऱ्यांचा नकार