esakal | उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विरोधकांवर टीका
sakal

बोलून बातमी शोधा

ajit pawar

निवडणुका डोळ्यासमोर ठेवून विरोधकांकडून मंदिरे सुरू करण्याचा भावनिक मुद्दा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून विरोधकांकडून मंदिरे सुरू करण्याचा भावनिक मुद्दा पुढे करण्यात येत असल्याची टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.

महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेच्या अध्यक्षपदाचा कार्यभार विद्याधर अनास्कर यांनी शुक्रवारी (ता. 3) स्वीकारला. या वेळी आयोजित कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

हेही वाचा: अंगणवाडी सेविकांची निम्मी रिक्त पदे भरण्यास सरकारची परवानगी

भाजप आणि मनसे राज्यात मंदिरे सुरू करण्याबाबत आक्रमक झाली आहेत. या संदर्भात पवार म्हणाले, कोणी किती आक्रमक व्हावे, हा त्यांचा प्रश्न आहे. येत्या काही महिन्यांत राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. त्यामुळे स्वतःचे अस्तित्व दाखविण्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करणार. सध्या मंदिरे सुरू करण्याचा भावनिक मुद्दा उपस्थित करून काही साध्य करता येईल का, याचा प्रयत्न विरोधक करीत आहेत.

देशातील काही इतर राज्यांमध्ये शाळा सुरू झाल्या आहेत. महाराष्ट्रातील शाळा सुरू करण्याबाबत राज्य सरकारची भूमिका काय, या संदर्भात पवार म्हणाले, कोरोनामुळे सध्या दिवाळीनंतर शाळा सुरू कराव्यात, असा एक मतप्रवाह आहे. तर पॉझिटिव्ह रुग्णदर शून्यावर आल्यानंतरच शाळा सुरू कराव्यात असा दुसरा मतप्रवाह आहे. याबाबत मुख्यमंत्री टास्क फोर्सच्या तज्ज्ञांशी चर्चा करून शाळा नक्की कधी सुरू करायच्या याबाबत अंतिम निर्णय घेतील.

ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. या संदर्भात पवार म्हणाले, ग्रामीण भागात लोकांच्या मनात कोरोनाची आता भीतीच राहिली नाही. बरेच नागरिक मास्क वापरत नाहीत. नियम पाळले जात नाहीत. याबाबत मुख्यमंत्र्यांनी आवाहन करूनही यामध्ये काहीजण सार्वजनिक सण, उत्सव साजरे करून राजकारण करीत आहेत. हे कोठेतरी थांबले पाहिजे. पुन्हा कोरोनाची तिसरी लाट आल्यास सर्वच बंद करण्याची वेळ राज्य सरकार आणि प्रशासनावर आणू नये, असे आवाहन त्यांनी या वेळी केले.

हेही वाचा: दहावीत विशेष प्रावीण्य मिळविणाऱ्यांना पाच हजार रुपयांचे बक्षीस

राज्यपालांकडे दिलेल्या यादीतील 12 आमदारांपैकी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्यासह काहींची नावे वगळल्याची चर्चा आहे. याबाबत विचारले असता, पवार यांनी त्यामध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे स्पष्ट केले. राज्य सहकारी बँकेच्या संबंधितांवर ईडी तपास यंत्रणेकडून छापे टाकण्यात आल्याची बातमी एका चॅनेलने दाखवली. परंतु ही बातमी धादांत खोटी, निराधार होती. अशा निराधार बातम्यांमुळे प्रसारमाध्यमांबाबत जनतेच्या मनातील असलेली विश्वासार्हता कमी होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

loading image
go to top