esakal | पर्यटकांची पावले वळू लागली निसर्गाच्या कुशीत | Pune
sakal

बोलून बातमी शोधा

mtdc

पर्यटकांची पावले वळू लागली निसर्गाच्या कुशीत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : कोरोनाचा प्रभाव कमी होत असल्यामुळे राज्य सरकारने सर्व पर्यटनस्थळे पर्यटकांसाठी खुली केली आहेत. महाराष्ट्र पर्यटन विकास (एमटीडीसी) महामंडळानेही पर्यटकांसाठी विशेष सवलती जाहीर केल्या आहेत. त्यामुळे आता पर्यटनाला बहर येणार आहे. गुलाबी थंडीची चाहुल आणि दिवाळीची आगामी सुटी पाहता पर्यटकांची पावले निसर्गाच्या कुशीत थंड हवेच्या ठिकाणी वळू लागली आहेत.

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने काही दिवसांपूर्वीच नवीन संकेतस्थळ सुरू केले आहे. पर्यटक केंद्रस्थानी ठेवून ‘अतिथी देवो भव’ या नात्याने पर्यटकांना नेहमीच सुविधा देण्यासाठी तयार असलेल्या महामंडळाची नव्याने ओळख होत आहे. बऱ्याच नवीन सुविधांसह संकेतस्थळ अद्ययावत करण्यात आले आहे. आता नवीन संकेतस्थळावरुन तत्काळ आरक्षण करता येणार आहे. पर्यटक निवासे आणि प्रशिक्षित कर्मचारी पर्यटकांचा दीपावलीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. दसरा आणि दीपावलीच्या सुटीसाठी पर्यटकांनी नियोजन सुरु केल्याचे दिसून येत आहे. नोकरदार वर्ग आणि पर्यटन व्यावसायिकही पर्यटनाचे नियोजन करीत आहेत. कोरोना काही प्रमाणात नियंत्रणात आल्यामुळे ऑक्टोबरपासून नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात पर्यटनाचा हंगामाला गती येणार आहे.

हिवाळी पर्यटनासाठी पर्यटकांकडून महामंडळाच्या पर्यटक निवासांचे बुकिंग सुरु करण्यात येत आहे. निसर्गरम्य असलेल्या पर्यटक निवासामध्ये गुलाबी थंडीचा आनंद घेण्यासाठी पर्यटकही उत्सुक असल्याचे दिसून येत आहे. पर्यटकांसाठी अनोख्या सवलती जाहीर केलेल्या आहेत. ज्येष्ठ नागरिक आणि सरकारी कर्मचाऱ्यांना आगाऊ बुकिंगसाठी सवलती जाहीर केल्या आहेत. सामाजिक बांधिलकी जपताना आजी-माजी सैनिक आणि दिव्यांगासाठी तसेच शालेय सहलीसाठी विशेष सवलती दिल्या आहेत. ग्रुप बुकिंगसाठी २० खोल्यांपेक्षा जास्त बुकिंग असल्यास सवलत देण्यात येत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन पर्यटक निवासात करण्यात येत आहे. उपाहारगृह, रिसॉर्ट परिसराचे निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. तसेच, कर्मचाऱ्यांचे कोरोना लसीकरण करण्यात आल्याची माहिती पर्यटन महामंडळाकडून देण्यात आली.

नवीन संकेतस्थळ

www.mtdc.co

‘एमटीडीसी’कडून पर्यटक निवासाच्या आरक्षणासाठी ऑनलाइन बुकिंग सुरु करण्यात आले आहे. पर्यटकांचा ओढा लक्षात घेता विशेष सवलती देण्यात येणार आहेत. पर्यटकांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी ‘कॉम्लीमेंटरी ब्रेकफास्ट’ ची सुरवात केली आहे. यासोबतच नावीन्यपूर्ण ‘वर्क फ्रॉम नेचर’ संकल्पनेअंतर्गत काही रिसॉर्टवर वाय-फाय सुविधा पुरविण्यात आली आहे.

- दीपक हरणे, प्रादेशिक व्यवस्थापक, एमटीडीसी

loading image
go to top