पदाधिकाऱ्यांच्या गावात गळाले घड्याळाचे काटे

पदाधिकाऱ्यांच्या गावात गळाले घड्याळाचे काटे

महेंद्र शिंदे : सकाळ वृत्तसेवा
कडूस, ता. ६ : आमदार दिलीप मोहिते यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेनेच्या (शिंदे) पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार आढळराव पाटील यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली, परंतु ही निवडणूक जनतेने हातात घेतल्याचे मतमोजणीतून स्पष्ट झाले. मतदारांच्या मतांच्या वावटळीत आढळराव यांचा प्रचार करणाऱ्या प्रमुख पुढाऱ्यांच्या गावातील मतदान पालापाचोळ्यासारखे भुर्रर्र उडून विरोधी उमेदवाराच्या बाजूने पडले. तालुक्यातील राष्ट्रवादी व शिवसेनेतील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या गावात घड्याळाचे काटे गळून पडले.
ठाकरे यांची साथ सोडल्यानंतर शिवसैनिकांच्या मनामध्ये आढळराव यांच्याबाबत प्रचंड चीड होती, ती लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने बाहेर पडली. त्यांना पराभूत करण्यासाठी आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांना निवडून आणण्यासाठी शिवसैनिकांनी जिवाचे रान केले. त्यामुळे कोल्हे यांना तालुक्यात ४६ हजार २६३ मतांचे मताधिक्य मिळाले. पहिल्या फेरीपासून खेड तालुक्याने डॉ. कोल्हे यांना मताधिक्य दिले. तालुक्यात एकूण २ लाख ३ हजार ३८५ मतदान झाले होते. त्यापैकी आढळराव यांना ७० हजार २८६; तर डॉ. कोल्हे यांना १ लाख १६ हजार ५४९ मते मिळाली.
आमदार दिलीप मोहिते यांच्या शेलपिंपळगाव येथे घड्याळ ४४३ मतांनी पिछाडीवर पडले. याठिकाणी घड्याळाला ६०१; तर तुतारीला १०४४ मते पडली. आमदार मोहिते यांचे निवासस्थान असलेल्या सातकरस्थळ गावात घड्याळाला ५६१; तर तुतारीला ११३६ मते पडली. याठिकाणीसुद्धा तुतारीने ५७५ मतांनी घडाळ्याला मागे टाकले.
भाजपचे जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे यांचा अपवाद वगळता सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या गावात डॉ. अमोल कोल्हे यांना मताधिक्य मिळाले. बुट्टे यांच्या वराळे गावात अगदी तुटपुंजे म्हणजे आढळराव यांना फक्त नऊ मते जास्त आहेत. येथे आढळराव यांना २६७; तर डॉ. कोल्हे यांना २५८ मते मिळाली. भाजपचे तालुकाप्रमुख शांताराम भोसले यांच्या भाम-संतोषनगर येथे आढळराव ४७६ मतांनी पिछाडीवर आहेत.
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आणि आढळराव यांची सावली व पंचायत समितीचे माजी सभापती भगवान पोखरकर यांच्या वाळद गावात आढळराव ८८ मतांनी पिछाडीवर पडले. शिवसेनेचे तालुकाप्रमुख राजू जवळेकर यांच्या वाफगावातील तीन बूथ मिळून आढळराव ४८२ मतांनी पिछाडीवर आहेत. आढळराव यांचे खंदे समर्थक व शिवसेनेचे जिल्हा संघटक अशोक भुजबळ यांच्या चाकणच्या झित्राईमळा येथील मतदानात आढळराव ३०२ मतांनी मागे पडले. येथे आढळराव यांना ५०१; तर कोल्हे यांना ८०३ मते मिळाली. शिवसेनेचे युवासेना जिल्हाप्रमुख धनंजय पठारे, आढळराव यांचे खंदे समर्थक व शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख प्रकाश वाडेकर तसेच जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा निर्मला पानसरे यांच्या बहुळ गावात घड्याळ ७८६ मतांनी पिछाडीवर पडले. याठिकाणी तुतारीला १२८१ मते मिळाली, तर घड्याळाला ४९५ मते मिळाली.

नगरपालिकांमध्ये कोल्हे यांनाच आघाडी
खेड तालुक्यातील राजगुरुनगर, चाकण, आळंदी नगरपरिषदेच्या भागात सुद्धा डॉ. कोल्हे हे आढळराव यांना भारी पडले. राजगुरुनगर नगरपरिषदेतील १९ मतदान केंद्रात मिळून आढळराव हे डॉ. कोल्हे यांच्यापेक्षा १२६३ मतांनी मागे पडले. याठिकाणी कोल्हे यांना ५७२३; तर आढळराव यांना ४४६० मते मिळाली. चाकण नगरपरिषदेच्या २५ मतदान केंद्रावर डॉ. कोल्हे यांना २६३९ मतांची आघाडी मिळाली, तर आळंदी नगरपरिषदेच्या १६ बुथवर आढळराव यांना २१५ मतांची आघाडी मिळाली.


‘खेड ज्याच्या पाठी तोच खासदार’
शिरूर लोकसभा मतदार संघातील ज्या खेड तालुक्यातील मतदारांनी शिवाजीराव आढळराव यांना तीन वेळा डोक्यावर घेत खासदार करण्यात महत्त्वाची भूमिका निभावली, त्याच खेड तालुक्यातील जनतेने यंदाच्या लोकसभा निवडणुकीत त्यांना धूळ चारण्यासाठी तेवढीच महत्त्वाची भूमिका बजावली. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांना खेड तालुक्याने मोठे मताधिक्य मिळवून दिले. ते आढळराव यांच्यासाठी ‘भारी’ पडले. त्यामुळे ‘ज्याच्या पाठी खेड
तालुक्याचे मतदार, तोच शिरूरचा खासदार’ हे पुन्हा अधोरेखित झाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com